ETV Bharat / state

लोकसभा निवडणुकीचे वाजू लागले पडघम, शिवसेना शिंदे गटाचं ६ जानेवारीपासून शिवसंकल्प अभियान

author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Jan 4, 2024, 7:15 PM IST

Shiv Sankalp Abhiyan : लोकसभा निवडणुकीच्या तयारीला एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वातील शिवसेनेनं 'शिवसंकल्प अभियान' आयोजित केलं आहे. येत्या 6 जानेवारीपासून या अभियानाची सुरुवात होईल. 'मिशन ४८ लोकसभा २०२४' च्या अनुषंगाने या अभियानावेळी महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यांचे दौरे केले जाणार आहेत. तसंच काही ठिकाणी सभा आणि कार्यकर्त्यांचे मेळावे होणार असल्याचं शिंदे गटाचे नेते शिरसाट यांनी सांगितलं.

Eknath Shinde
एकनाथ शिंदे

मुंबई Shiv Sankalp Abhiyan : लोकसभा निवडणुकीसाठी राजकीय पक्षांनी रणनिती आखायला सुरुवात केली आहे. आता लोकसभा निवडणुकीच्या रणनीतीचा एक भाग म्हणून शिवसेना (शिंदे गटाचे) प्रमुख एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली २७ आणि २८ जानेवारी २०२४ रोजी कोल्हापूरमध्ये दोन दिवसीय महाअधिवेशन होणार आहे, अशी माहिती आज शिवसेना (शिंदे गटाचे) प्रवक्ते संजय शिरसाट यांनी पत्रकार परिषदेत दिली.


कसे असणार अभियान : 'शिवसंकल्प अभियान' ६ जानेवारीला शिरूर येथे सकाळी ११.०० वाजता होणाऱ्या कार्यकर्ता मेळाव्याने सुरू होणार आहे. त्यानंतर त्याच दिवशी सायंकाळी ५.०० वाजता मावळ, ८ जानेवारीला दुपारी १२.०० वाजता रत्नागिरी-सिंधुदुर्ग येथे कार्यकर्ता मेळावा होणार आहे. त्यानंतर १० जानेवारी रोजी सकाळी ११.०० वाजता हिंगोली, त्याच दिवशी सायंकाळी ५.०० वाजता धाराशिव, ११ जानेवारी रोजी सकाळी ११.०० वाजता परभणी, त्याच दिवशी सायंकाळी ५.०० वाजता छत्रपती संभाजीनगर, १३ जानेवारी सायंकाळी ५.०० वाजता बुलडाणा आणि २४ जानेवारी सकाळी ११.०० वाजता रायगड येथे शिवसेनेचे कार्यकर्ता मेळावे होणार आहेत, अशी माहिती संजय शिरसाट यांनी पत्रकार परिषदेत दिलीय.


जितका निषेध करावा तितका थोडाच : राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी प्रभू श्रीरामांबद्दल केलेल्या अपमानास्पद वक्तव्याचा निषेध करताना संजय शिरसाट म्हणाले की, जितेंद्र आव्हाड यांचा जितका निषेध करावा तितका थोडाच आहे. जितेंद्र आव्हाड यांनी प्रभू श्री रामांबद्दल केलेलं अपमानजनक वक्तव्य त्यांचं वैयक्तिक मत नसून, त्यांचे पक्षप्रमुख शरद पवार यांची ती भूमिका आहे, जी आव्हाडांच्या तोंडून वदवून घेतलेली आहे, असं आमदार संजय शिरसाट म्हणाले. स्वतःचे राजकारण करत असताना एखाद्या ठराविक समाजाची मते आणि त्यांची सहानुभूती मिळविण्यासाठी आणि राममंदिराचे उद्घाटन होत असल्यानं देशात जल्लोषाचं वातावरण आहे. हिंदू धर्मियांच्या भावना दुखावण्यासाठी जितेंद्र आव्हाड यांनी हे वक्तव्य केलं आहे. त्यांचे सहकारी उद्धव ठाकरे यांनी सुद्धा या विरोधात चकार शब्द काढला नाही, अशी टीका शिरसाट यांनी ठाकरे गटावर केली.


मंत्र्यांनी सांभाळून बोललं पाहिजे : जितेंद्र आव्हाडांनी वादग्रस्त वक्तव्य केल्यानं राज्यभर वातावरण तापलं असताना, दुसरीकडं मंत्री अब्दुल सत्तार यांनी गौतमी पाटीलच्या कार्यक्रमात हुल्लडबाजी करणाऱ्यांना अपशब्द वापरले. तसंच भर कार्यक्रमात सत्तारांनी अत्यंत खालची भाषा वापरल्यानं टीका होत आहे. यावर शिरसाट यांना विचारलं असता, याची मुख्यमंत्र्यांनी दखल घेतली असून, एखाद्या मंत्र्यांनी उघडपणे असं बोलणं चुकीचं आहे. समाजात वावरत असताना आपण सांभाळून बोललं पाहिजे, असं शिरसाट म्हणाले.

हेही वाचा -

  1. श्रीराम मंदिराच्या उद्घाटनादिवशी राज्यात सार्वजनिक सुट्टी जाहीर?
  2. भावना दुखावल्या असतील तर खेद व्यक्त करतो, पण कोणतंही भाष्य अभ्यासाशिवाय केलेलं नाही- जितेंद्र आव्हाड
  3. जितेंद्र आव्हाडांना मानसोपचार तज्ञाची गरज, खासदार नवनीत राणांचे मत
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.