ETV Bharat / state

NCP Political Crisis : 25 हजार कोटींचा घोटाळा लपवण्यासाठी अजित पवार भाजपच्या दावनीला - शालिनीताई पाटील

author img

By

Published : Jul 8, 2023, 4:58 PM IST

राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेसविरोधात बंडखोरी करून शिंदे भाजप सरकारमध्ये प्रवेश केला आहे. त्यांनी केलेला 25 हजार कोटींचा भ्रष्टाचार पचवण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे. मात्र, आर्थिक घोटाळे फारकाळ टिकणार नाहीत. त्यांना निश्चित शिक्षा भोगावी लागेल, अशी प्रतिक्रिया माजी महसूल मंत्री शालिनीताई पाटील यांनी दिली आहे. त्या मुंबईत ईटीव्ही भारतशी बोलत होत्या.

Shalinitai Patil
Shalinitai Patil

मुंबई : राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार हे अत्यंत स्वार्थी असून त्यांनी स्वार्थापोटी पक्षातून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला आहे. त्यांनी शरद पवार यांच्या पाठीत खंजीर खुपसला आहे, असा थेट आरोप राज्याच्या माजी महसूल मंत्री शालिनीताई पाटील यांनी केला आहे. गेल्या अनेक वर्षांपासून अजित पवार यांनी आतापर्यंत हजारो कोटी रुपयांचा घोटाळा केला आहे. नरेंद्र मोदी यांनी वक्तव्य केलेला 70 हजार कोटी रुपयांचा घोटाळा राष्ट्रवादीने केल्याचे म्हटले आहे. मात्र, हा घोटाळा राष्ट्रवादीने नाही तर, अजित पवार यांनी केल्याचा आरोप शालिनीताई पाटील यांनी केला आहे.

हजारो कोटी रुपयांचा घोटाळा : अजित पवार यांनी राज्याच्या शिखर सहकारी बँकेत हजारो कोटी रुपयांचा घोटाळा केला आहे. त्यांनी जलसंधारण मंत्री असताना हजारो कोटी रुपयांचा सिंचन घोटाळा केला आहे. त्यांनी खर्च केलेल्या पाटबंधारे विभागाच्या खर्चानंतर ओलिताखाली येणाऱ्या जमिनीचा टक्का एक होता. म्हणजे जवळपास शून्य होता. त्यांच्या भ्रष्टाचाराची व्याप्ती यातून समोर येते असे पाटील म्हणाल्या. अजित पवार यांनी आतापर्यंत या घोटाळ्यापासून वाचण्यासाठी शरद पवार यांची कवच कुंडले वापरली, मात्र आता त्यांनी स्वतःची कवच कुंडले उतरवून ठेवली आहेत. ज्यादिवशी कर्णाने आपली कवच कुंडली उतरवली त्यादिवशी त्याचा पराभव झाला. त्याचप्रमाणे अजित पवार यांचाही निश्चितच पराभव होईल, असा दावा शालिनीताई पाटील यांनी केला आहे.

अजित पवारांनी कारखाने लुटले : राज्यात वसंत दादा पाटील, यशवंतराव चव्हाण, शरद पवार यांनी निर्माण केलेली सहकाराची परंपरा मोडीत काढण्याचे काम अजित पवार यांनी केले आहे. अजित पवार यांनी राज्यातील 45 साखर कारखाने चोरले असल्याचा आरोप पाटील यांनी केला. साखर कारखाने आजारी आहेत, असे दाखवून विकायला काढायचे. शिखर बँकेच्या माध्यमातून अत्यंत कमी पैशात हे कारखाने विकत घेऊन ते खासगी करायचे हा डाव गेल्या अनेक वर्षांपासून अजित पवार करत आहेत. अजित पवार यांनी राज्यातील 13 सहकारी साखर कारखाने, विविध कंपन्यांच्या माध्यमातून स्वतःच विकत घेतल्याचा आरोप पाटील यांनी केला. शेकडो कोटी रुपयांचे कारखाने केवळ 390 कोटी रुपयांमध्ये अजित पवारांसह त्यांच्या संबंधितांनी विकत घेतले असे, देखील शालिनीताई पाटील यांनी म्हटले आहे.

अजित पवार आणि संबंधितांनी खरेदी केलेल्या कथित कारखान्यांची यादी


पवारांवर तात्काळ गुन्हे दाखल करा : अजित पवार हे अत्यंत भ्रष्टाचारी आहेत. न्यायालयाच्या आदेशानंतर त्यांच्यावर एफआयआर दाखल करण्यात आले. मात्र, त्यानंतर त्यांनी भाजपशी संधान साधल्याने त्यांच्यावर ईडी, सीबीआय या यंत्रणांनी कारवाई केली नाही. शिखर बँकेची हजारो कोटी रुपयांची झालेली लूट याची पुन्हा एकदा सखोल चौकशी व्हायला पाहिजे. ती झाली तर अजित पवार निश्चितच गजाआड असतील, असेही पाटील म्हणाल्या.

प्रफुल्ल पटेल यांचीही होऊ शकते फेरचौकशी : माजी केंद्रीय हवाई वाहतूक मंत्री प्रफुल्ल पटेल यांनीही गेल्या अनेक वर्षांपासून शरद पवारांच्या आड आपली कातडी बचावली आहे. आता शरद पवार यांची कवच कुंडले त्यांनीही उतरवल्यामुळे त्यांचीही फेरचौकशी होऊ शकते. हे त्यांनी लक्षात घेतले पाहिजे. मी, त्यांना इशारा देते की, त्यांनी हे वेळीच लक्षात घेऊन सावध व्हावे. कारण आता अशा प्रकरणांची चौकशी कधीही पुन्हा सुरू होऊ शकते. अजित पवार, प्रफुल्ल पटेल हे अत्यंत भ्रष्टाचारी आहेत. त्यांनी केवळ स्वार्थासाठी सत्तेत सहभागी होण्याचा निर्णय घेतला आहे. मात्र ते फार काळ या भ्रष्टाचारापासून वाचू शकणार नाहीत. त्यांना याचे गंभीर परिणाम भोगावे लागतील असा इशाराही शालिनीताई पाटील यांनी दिला.

हेही वाचा - NCP Political Crisis: शरद पवारांच्या सभेला छगन भुजबळ रॅलीने देणार उत्तर, नाशिकमध्ये शक्तीप्रदर्शनाची जोरदार तयारी

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.