ETV Bharat / state

Ramzan Eid 2023: आशियातील सर्वात मोठ्या पशुवधगृहात बकरी ईदची तयारी सुरू; बसविण्यात येणार 300 सीसीटीव्ही कॅमेरे

author img

By

Published : Apr 21, 2023, 9:29 AM IST

मुस्लिम धर्मियांचा पवित्र असा बकरी ईद म्हणजेच ईद - उल - झुहा हा सण जून महिन्यात साजरा केला जाणार आहे. यासाठी मुंबई महानगरपालिकेचे देवनार येथील आशिया खंडातील सर्वात मोठे पशुवधगृह सज्ज करण्याचे काम आतापासून सुरु झाले आहे. पशुवधगृहात देशाच्या कानाकोपऱ्यातून विक्रेते येतात. त्यामुळे कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून ३०० सीसीटीव्ही लावले जाणार आहेत.

Ramzan Eid 2023
देवनार पशुवधगृह

मुंबई : देवनार पशुवधगृहाच्‍या ६४ एकराच्‍या प्रशस्‍त जागेत बकरी ईद निमित्‍त लाखो नागरिक एकत्र येतात. महानगरपालिकेच्‍यावतीने या ठिकाणी बकरे व म्‍हैसवर्गीय जनावरांच्‍या स्‍थायी स्‍वरूपातील निवास क्षमतेसह अतिरिक्‍त निवारा केंद्र (शेल्‍टर्स) उभारण्‍यात येतात. जनावरांसाठी पाणी, चारा, प्राथमिक पशुवैदयकीय आरोग्‍य केंद्र यांची व्‍यवस्‍था करण्‍यात येते. यंदा २८ जून २०२३ रोजी बकरी ईद सण अपेक्षित असून त्‍या दृष्‍टीने यंदा ७७ हजार चौरस मीटर जागेवर तात्‍पुरते निवारा केंद्र, मंडप इत्‍यादीदेखील उभारण्‍यात येणार आहे. या सणाच्या आधी १० ते १५ दिवस आधी बकरी विक्रेते देवनार पशुवधगृहात दाखल होतात. यांच्‍यासोबतच दोन ते अडीच लाख बकरे, १२ ते १५ हजार म्‍हैसवर्गीय जनावरेही दाखल होत असतात.

बकरी ईद साठी सीसीटीव्ही : मोठया संख्‍येने खरेदीदार देखील या ठिकाणी येत असतात. या ठिकाणी सुरक्षा व्‍यवस्‍था असणे गरजेचे असल्‍याने यंदा देवनार पशुवधगृह परिसरात साधारणपणे ३०० क्‍लोज सर्किट टेलीव्हिजन कॅमेरे (सीसीटीव्‍ही) कॅमेरे लावण्‍यात येणार आहेत. सीसीटीव्ही कॅमेऱ्यांसह पशुवधगृहात लावण्यात येणारी अत्याधुनिक यंत्रणा कार्यान्वित करण्याची कार्यवाही महापालिकेच्या यांत्रिकी व विद्युत विभागाद्वारे करण्यात येणार आहे, अशी माहिती पशुवधगृहाचे महाव्यवस्थापक डाॅ. कलीमपाशा पठाण यांनी दिली. यांत्रिकी व विद्युत विभागाचे प्रमुख अभियंता कृष्‍णा पेरेकर यांनी दिलेल्या माहितीनुसार, देवनार पशुधगृह परिसरात सीसीटीव्ही कॅमे-यांसह पॅन - टिल्‍ट - झूमची सुविधा असणारे १२ टेहाळणी कॅमेरे, २ व्हिडिओ वॉल, ५ एलईडी स्‍क्रीनही लावण्‍यात येणार आहेत.




१५ दिवसांच्‍या कालावधीसाठी भाडेतत्‍त्‍वावर : बकरी ईद कालावधी दरम्‍यान देवनार पशुवधगृहाची सुरक्षा व्‍यवस्‍था अधिक चोख ठेवण्‍याच्‍या दृष्‍टीने सीसीटीव्‍ही कॅमेरे व संबंधित अत्‍याधुनिक यंत्रणा ही साधारणपणे १५ दिवसांच्‍या कालावधीसाठी भाडेतत्‍त्‍वावर बसविण्‍यात येणार आहे. या कामाची निविदा प्रक्रिया नुकतीच सुरू झाली आहे. याबाबतची सविस्‍तर माहिती बृहन्‍मुंबई महानगरपालिकेच्‍या संकेतस्‍थळावर उपलब्‍ध करून देण्‍यात आली आहे. सदर निविदेमध्‍ये सीसीटीव्‍ही कॅमेरे व संबंधित यंत्रणेसह अभियंता, पर्यवेक्षक नेमण्‍याची जबाबदारीही संबंधित सेवा पुरवठादार संस्‍थेची असेल. पावसाळयात सीसीटीव्‍ही यंत्रणा कार्यान्वित केली जाणार असल्‍याने चित्रीकरणावर कोणताही प्रतिकूल परिणाम होणार नाही, याची काळजी देखील संबंधित सेवा पुरवठादार संस्‍थेला घ्‍यावी लागणार आहे.


परिसरावर देखरेख ठेवणे सहज शक्‍य : ३०० पैकी काही सीसीटीव्‍ही हे पोल माऊंटेड असतील त्‍याचबरोबर व्हिडिओ वॉल ५ बाय ८ फुटाच्‍या आकाराची असेल. फायबर ऑप्टिकल केबलदेखील बसविण्‍यात येणार आहेत. यामुळे अधिक चांगल्‍या गुणवत्‍तेचे चित्रीकरण करता येणार आहे. तसेच, निविदेमध्‍ये पीटीझेड कॅमेरे उपलब्‍ध करून देण्‍याची बाबही समाविष्‍ट करण्‍यात आली आहे. या कॅमेऱ्याचे वैशिष्‍टय म्‍हणजे हे कॅमेरे वरती - खाली व वेगवेगळ्या अँगलने फिरवता येतात. एखादया ठिकाणी एखादी बाब संशयास्‍पद वाटत असेल तर नियंत्रण कक्षातूनच कॅमेरा झूम करून खातरजमा करता येणार आहे. यामुळे महानगरपालिकेच्‍या सुरक्षा विभागाला आणि मुंबई पोलिस दलास नियंत्रण कक्षातून देवनार पशुवधगृह परिसरावर देखरेख ठेवणे सहज शक्‍य होणार आहे.

हेही वाचा: Ramzan Eid 2023 कधी आहे रमजान ईद का साजरी करण्यात येते रमजान ईद

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.