जालना - कोरोना संकटामुळे नागरिक भयभीत झाले असून, लॉकडाऊन वाढत असल्याने ग्रामीण भागातील कामधंद्यासाठी शहरात गेलेले नागरिक गावाकडे परत येत असल्याने ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. इतर शहरातून तालुक्यात दररोज अनेक नागरिक दुचाकी, चारचाकी वाहनाने तर काही जण पायी येत आहेत. मात्र, चेक पोस्टवर या लोकांची नोंदणी केली जात नसल्यामुळे बाहेरून येणारे थेट गावात प्रवेश करत असले तरी गावात आरोग्यविभाग कर्मचाऱ्यांकडे होम क्वारंटाईन शिक्का नसल्याने अडचणी निर्माण होत आहे.
बदनापूर येथील ग्रामीण रुग्णालयात तपासणी न करता तपासणीसाठी जालना शासकीय रुग्णालयात जा, असा सल्ला वैद्यकीय कर्मचारी देत असल्यामुळे अनेक जण तपासणी न करता गावात वास्तव्य करत आहेत.
बदनापूर तालुक्यात इतर शहरातून लोक येत असल्याने ग्रामस्थांनी अशा लोकांसाठी गावाबाहेर शाळांमध्ये होम क्वारंटाईन करण्याची व्यवस्था केली आहे. मात्र, काही नागरिक विरोध दर्शवून थेट गावात प्रवेश करत आहेत. असाच प्रकार १५ मे रोजी रात्री ८ वाजेदरम्यान धोपटेश्वर येथे घडला. मुंबईहून आलेली महिला आणि सोबत एक जण यांनी शाळेत होम क्वारंटाईन होण्यास विरोध करून गावात घरी जाण्याचा हट्ट धरला.
विशेष म्हणजे ही महिला गावाच्या हद्दीत येण्यापूर्वी आरोग्य विभागाने चेक पोस्टवर होम क्वारंटाईन शिक्के मारणे आवश्यक होते. मात्र, तसे झाले नाही. शेवटी पोलिसांना पाचारण केल्यानंतर पोलीस निरीक्षक एम. बी. खेडकर यांनी धोपटेश्वर गाठून तंबी दिल्यानंतर ही महिला शाळेत थांबली. मात्र, १६ मे रोजी तपासणीसाठी बदनापूर ग्रामीण रुग्णालयात पाठविले असता ग्रामीण रुग्णालयातील आरोग्य कर्मचाऱ्यांनी तपासणी न करता जालना शासकीय रुग्णालयात घेऊन जा असा सल्ला दिला.
बदनापूर ग्रामीण रुग्णालयात कोरोना संशयित व इतरांची आरोग्य तपासणी केली जात नसल्यामुळे आश्चर्य व्यक्त केले जात असून, सध्या खासगी वाहनांना परवानगी दिलेली नसल्यामुळे बाहेरून आलेल्या लोकांना जालना शासकीय रुग्नालयात तपासणीसाठी कोणत्या वाहनाने घेऊन जायचे? असा प्रश्न ग्रामपंचायतींना पडला आहे. तसेच बाहेरून येणाऱ्या नागरिकांना होम क्वारंटाईनचे शिक्के मारण्यासाठी केवळ चेक पोस्ट आणि प्राथमिक आरोग्य केंद्रावर व्यवस्था करण्यात आलेली आहे. त्यामुळे ग्रामीण भागातील आरोग्य कर्मचारी देखील हताश झालेले आहेत.