ETV Bharat / state

कुरखेडा स्फोटामागचा मास्टरमाईंड नक्षली दिनकर गोटाला अटक; 15 जवानांना गमवावे लागले होते प्राण

author img

By

Published : Mar 4, 2020, 7:25 PM IST

Updated : Mar 4, 2020, 7:55 PM IST

गडचिरोलीत भूसुरुंग स्फोटात 15 जवानांचा बळी घेणारा कुख्यात नक्षली दिनकर गोटाला पत्नीसह अटक करण्यात आली आहे. महाराष्ट्र दिनी नक्षलवाद्यांनी स्फोट घडवला होता. यात 15 जवानांना वीरमरण आले होते.

naxal
कुरखेडा स्फोटामागचा मास्टरमाईंड नक्षली दिनकर गोटाला अटक

गडचिरोली - कुरखेडा तालुक्यातील दादापूर येथे नक्षलींनी ३६ वाहने जाळली होती. यानंतर १ मे २०१९ ला म्हणजेच महाराष्ट्र दिनाच्या दिवशीच नक्षलवाद्यांनी भूसुरुंगाचा स्फोट घडवून आणला होता. यामध्ये गडचिरोली पोलीस दलाचे १५ जवान, १ खासगी वाहन चालक हुतात्मा झाले होते. या घटनेच्या मुख्य सुत्रधारांपैकी एक असलेला नक्षलवादी दिनकर गोटा याला त्याची पत्नी सुनंदा कोरेटीसह गडचिरोली पोलिसांच्या विशेष पथकाने अटक केली आहे.

कुरखेडा स्फोटामागचा मास्टरमाईंड नक्षली दिनकर गोटाला अटक

नक्षलवादी दिनकर गोटा हा २००५ मध्ये नक्षलवाद्यांच्या टिपागड दलममध्ये सदस्य पदावर कार्यरत होता. यानंतर वर्ष २००६ मध्ये चातगाव दलम, २००७ मध्ये टिपागड दलमचा एरिया कमिटी मेंबर, २००८ मध्ये धानोरा दलममध्ये कमांडरपदी कार्यरत, २०११ मध्ये टिपागड दलमचा एरिया कमिटी सचिव, २०१६ पासून कोरची दलममध्ये उत्तर गडचिरोली विभागीय समिती सदस्य पदावर तो कार्यरत होता. तसेच गडचिरोली जिल्ह्याच्या उत्तर भागात त्याची पकड होती.

दिनकर गोटा याच्यावर गडचिरोली पोलीस ठाण्यात एकूण १०८ गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल आहेत. यात ३३ खुनांचा समावेश आहे. त्याचबरोबर २००९ मध्ये मरकेगाव चकमकीत त्याचा सहभाग होता. दादापूर येथील वाहनांची जाळपोळ व १ मे २०१९ ला जांभूळखेडा येथे भूसुरुंग स्फोट घडवण्यात तो मुख्य सूत्रधार आहे. या ठिकाणांची रेकी व नियोजनामध्ये त्याचा सक्रिय सहभाग होता. शासनाने दिनकर गोटावर एकूण १६ लाख रुपयांचे बक्षीस जाहीर केले होते. तर, नदाली सुनंदा कोरेटी ही २००९ मध्ये नक्षल दलममध्ये भरती झाली. सध्या ती नक्षलवाद्यांच्या कोरची दलम सदस्य पदावर कार्यरत होती. तिच्यावर एकूण ३८ गंभीर गुन्ह्यांची नोंद आहे. शासनाने तिच्यावर एकूण २ लाख रुपयांचे बक्षीस जाहीर केले होते.

२८ फेब्रुवारीला पोलीस अधीक्षक शैलेश बलकवडे यांच्या समोर उत्तर गडचिरोली विभागीय समिती सदस्य पदावर कार्यरत असलेला पिलास कोल्हा याने एके-४७ शस्त्रासह आत्मसमर्पण केले होते. तर, नुकतेच चातगाव दलम कमांडरसह संपूर्ण चातगाव दलमने आत्मसमर्पण केले होते. जांभुळखेडा घटनेतील ८ आरोपींना गडचिरोली पोलीस दलाने यापूर्वीच अटक केलेली असून घटनेचा संपूर्ण तपास करून तपास 'एनआयए'कडे हस्तांतरीत करण्यात आला होता.

यानंतर आज गडचिरोली पोलीस दलाने नक्षलींच्या उत्तर गडचिरोली डिव्हीजनचा विभागीय समितीचा सदस्य असलेला आणि दादापूर, जांभूळखेडा घटनेचा कट रचण्यात व कटाची अंमलबजावणी करण्यात प्रमुख भूमिका बजावलेल्या कुख्यात नक्षली दिनकर गोटा यास अटक केली आहे. त्यामुळे उत्तर गडचिरोली भागात नक्षलवाद्यांना जबर धक्का देण्यात गडचिरोली पोलीस दलाला यश आले आहे. अटक केल्यानंतर दोघांनाही न्यायालयात हजर केले असता, न्यायालयाने दोघांनाही १४ दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.

दिनकर गोटा हा सप्टेंबर २०१९ मध्ये एका नक्षल महिलेसह दलममधून निघून गेल्याबाबतची माहिती गडचिरोली पोलीस दलास मिळाली होती. यानंतर सातत्याने गडचिरोली पोलीस दल नक्षली दिनकर गोटा याच्या मागावर होते. अखेर आज गडचिरोली पोलीस दलाच्या प्रयत्नांना यश आले आहे.

कुरखेडा भूसुरुंग स्फोटासंदर्भातल्या सर्व बातम्या वाचा येथे -

Last Updated : Mar 4, 2020, 7:55 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.