ETV Bharat / state

अन् ती सहा महिन्यांनी सुखरूप आली घरी...

author img

By

Published : Nov 25, 2020, 6:37 PM IST

औरंगाबाद जिल्ह्यातून हजारो मजुरांनी बिहार, उत्तर प्रदेश अशा राज्यांमध्ये आपल्या घरी परतण्याचा निर्णय घेत गाव जवळ केले. मात्र, या गोंधळात औरंगाबादची एक भोळसर महिला मजुरांसोबत झारखंडला पोहचली. कुटुंबीयांनी शोध घेतला मात्र महिला मिळत नसल्याने महिलेचा मृत्यू झाला का? अशी शंका व्यक्त होत असतानाच सहा महिन्यानंतर महिला परत आपल्या गावी पोहचली आणि गावात आनंदाचे वातावरण पसरले.

औरंगाबाद
औरंगाबाद

औरंगाबाद - टाळेबंदी लागली आणि अनेकांचे रोजगार गेले. त्यात परप्रांतीय मजुरांना राज्य सोडावे लागले. औरंगाबाद जिल्ह्यातून हजारो मजुरांनी बिहार, उत्तर प्रदेश अशा राज्यांमध्ये आपल्या घरी परतण्याचा निर्णय घेत गाव जवळ केले. मात्र, या गोंधळात औरंगाबादची एक भोळसर महिला मजुरांसोबत झारखंडला पोहचली. कुटुंबीयांनी शोध घेतला मात्र महिला मिळत नसल्याने महिलेचा मृत्यू झाला का? अशी शंका व्यक्त होत असतानाच सहा महिन्यानंतर महिला परत आपल्या गावी पोहचली आणि गावात आनंदाचे वातावरण पसरले.

औरंगाबादची विठाबाई पोहचली झारखंडला

टाळेबंदीच्या काळात परप्रांतीय मजूर आपल्या राज्यात परत जात होते, त्यावेळी श्रमिक रेल्वेची व्यवस्था करण्यात आली. करमाडहून मोठ्या संख्येने मजूर रेल्वे स्थानकात दाखल झाले, त्यात कोळघर येथील विठाबाई बाबुराव कुंबफळे ही भोळसर महिला देखील पोहचली आणि रेल्वेत बसली. झारखंडजवळ या महिलेला उतरवण्यात आले. तेथे तिला विलगीकरणात भरती करण्यात आले. विलगीकरणाचा काळ पूर्ण झाल्यावर सर्व मजूर आपल्या घरी गेले. मात्र, ही महिला जात नव्हती. तिला आपले पूर्ण नाव देखील सांगता येत नव्हते. मात्र विठाबाई यांना आपल्या गावाचे नाव माहीत होते. औरंगाबाद-कोळघर असे तिने सांगितल्यावर विठाबाईला घरी पाठवण्याच्या हालचालींला सुरुवात झाली.

उत्तराखंड येथील अधिकाऱ्यांच्या मदतीने विठाबाई सुखरूप पोहचल्या

विलगीकरण केंद्रामध्ये कार्यकाळ पूर्ण केल्यावर विठाबाईला लाटेहार जिल्ह्यातील एका गुरुकुलमध्ये हलवण्यात आले आणि तिथे तब्बल ६ महिने त्या राहिल्या. लाटेहार जिल्ह्याच्या समाज कल्याण अधिकारी प्रीती सिन्हा यांनी विठाबाईंबाबत तेथील उपायुक्त अबू इम्रान यांना माहिती दिली. त्यानंतर अबू इम्रान यांनी विठाबाईच्या कुटुंबीयांशी संपर्क करण्याचा प्रयत्न सुरू केला. विठाबाई तीन वेळा अधिकाऱ्यांची नजर चुकवून गुरुकुलमधून भरकटली होती. मात्र, तीनही वेळा तिला शोधून आणत योग्य सांभाळ अधिकाऱ्यांनी केला. उपायुक्त अबू इम्रान यांनी महाराष्ट्रातील काही लोकांना आणि मुंबईतील 'अंजुमन इस्लामिया कमिटी'ला विचारणा करत माहिती घेण्याची विनंती केली. त्यांनी या कमिटीने कोळघर येथील विठाबाई गायब असल्याची माहिती उपायुक्त इम्रान यांना दिली. त्यानंतर तेथील जिल्हाधिकाऱ्यांनी औरंगाबादच्या जिल्हाधिकाऱ्यांशी संपर्क केला आणि विठाबाईच्या नातेवाईकांना तिला न्यायला येण्यासाठी झारखंडला पाठवण्याची विनंती केली.

व्हिडिओ कॉलवर झाली ओळख परेड

लाटेहार येथील उपायुक्त अबू इम्रान यांनी औरंगाबाद जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांना संपर्क करून विठाबाईची माहिती दिली. निवासी उपजिल्हाधिकारी संजीव जाधवर, तहसीलदार किशोर देशमुख, तलाठी अशोक काशीद यांनी सदर महिला ही विठाबाईच असल्याची खात्री केली. त्यानंतर व्हिडिओ कॉल करून विठाबाई आणि नातेवाईकांची भेट घडवून ओळख पटवण्यात आली आणि विठाबाईला घरी आणण्याचा प्रवास सुरू झाला. विठाबाईला आणण्यासाठी कोळघरचे सरपंच परमेश्वर तुपे, पोलीस-पाटील अनिल वावरे आणि विठाबाईचा मुलगा पांडुरंग कुंबफळे हे महसूल विभागाच्या खर्चाने एक खासगी वाहन घेऊन झारखंडला रवाना झाले. तिथे पोहोचल्यानंतर मुलाला पाहताच विठाबाईला अश्रू अनावर झाले आणि विठाबाई परत आपल्या गावी आल्या.

गावात आनंदाचे वातावरण

विठाबाई गावात येताच कुटुंबीयांना अश्रू अनावर झाले. विठाबाई भोळसर असल्याने कुठे तरी गेली आणि कोरोनामुळे तिचे निधन झाले, असा समज झाल्याचे त्यांचे पती बाबुराव यांनी सांगितले. मात्र, ती आता परतली असून यापुढे तिची काजळी घेऊ असे आश्वासन विठाबाईच्या कुटुंबीयांनी दिले. त्यांच्या आगमनाने गावकऱ्यांनी त्यांना भेटण्यासाठी गर्दी केली. गावकऱ्यांनी देखील त्यांच्या आगमनाचा आनंद व्यक्त केला.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.