ETV Bharat / state

Womans Day Special 2023 : रोलर स्केटिंग प्रकारात अडचणींवर मात करत 'भार्गवी कराड' ची चमकदार कामगिरी

author img

By

Published : Mar 6, 2023, 7:10 AM IST

खेळाला प्राधान्य मिळावे याकरिता अनेक उपाययोजना केल्या जातात. मात्र अद्यापही छोट्या शहरांमध्ये खेळाला साजेसे यंत्रणा सज्ज नाही तरीदेखील खेळाडू आपल्या प्रतिभेने पुढे जात आहेत. पिसादेवी येथील भार्गवी कराड ही त्यातीलच एक उत्तम उदाहरण म्हणता येईल. कुठल्याही सुविधा नसताना रोलर स्केटिंग प्रकारात सहा राज्यस्तरीय आणि एक राष्ट्रीय स्पर्धा तिने खेळली आहे.

Womans Day Special 2023
भार्गवी कराड

भार्गवी कराड

छत्रपती संभाजीनगर : शंभरहून अधिक पदके भार्गवी कराडने पटकावत आजपर्यंत आपली चमकादार कामगिरी केली आहे. मात्र सुविधा मिळाल्यास आणखीन चांगली कामगिरी करता येईल असे मत भार्गवी कराडने व्यक्त केले. भार्गवी कराड रोलर स्केटिंग या प्रकारात देशपातळीवर आपले नाव कमावले आहे. अतिशय नियंत्रण ठेवून खेळला जाणारा हा खेळ प्रकार मानला जातो. अवघ्या 14 वर्षाच्या मुलीने आतापर्यंत बारा गोल्ड, तीन सिल्वर आणि दोन ब्रांझ पदकांची कमाई केली आहे. यात राष्ट्रीय पातळीवर एक ब्रांझ बदकाचा समावेश आहे.


रोलर स्केटिंग प्रकारात केली उत्तम कामगिरी : शंभरहून अधिक पदक तिने आजपर्यंत कमाविले आहेत. त्यासाठी खेळासोबतच अभ्यासाची उत्तम सांगड घालत तिने ही कामगिरी केली आहे. शहरात सराव करण्यासाठी ट्रॅक नसल्याने पहाटे उठून रस्त्यावर तर शनिवार - रविवारी सुट्टीच्या दिवशी पुण्याला जाऊन सराव करते. मात्र अडचणींवर मात करून ती आपल्या खेळात पुढे जात आहे.


असा आहे भार्गवीचा दिनक्रम : भार्गवी कराड रोलर स्केटिंग प्रकारात आपली कामगिरी दिवसेंदिवस सुधारत आहे. यासाठी कठोर परिश्रम ती घेते. सकाळी चार वाजता उठून ती मोकळ्या रस्त्यावर जाऊन सराव करते. त्यानंतर नाष्टा करून ती शाळेत जाते. दुपारी आल्यावर थोडा अभ्यास आणि थोडा वेळ आराम करून सायंकाळी आईसोबत पुन्हा एकदा चिकलठाणा परिसरात, तर कधी सावंगी परिसरात ती सरावाला जाते. मात्र सराव ट्रॅक नसल्याने हा सराव तिला रस्त्यावरच करावा लागतो. त्यानंतर रात्री आल्यावर जेवण करणे आणि झोपणे असा दिनक्रम नित्याचा झाला आहे. आपल्या आवडत्या खेळात स्वतःला झोकून देऊन ती, कसून सराव करत आहे. त्यामुळेच एवढ्या कमी वयात तिने देश पातळीवर आपले नाव कमाविले आहे.



ट्रॅक नसल्याची खंत : रोलर स्केटिंग खेळ प्रकार अतिशय मेहनतीचा खेळ प्रकार मानला जातो आपल्या शरीरावर योग्य नियंत्रण ठेवून हा खेळ प्रकार खेळावा लागतो. मात्र त्यासाठी योग्य ट्रॅक असणे देखील आवश्यक आहे. मात्र छत्रपती संभाजीनगर सारख्या शहरात रोलर स्केटिंग खेळाचा योग्य ट्रॅक अद्यापही उपलब्ध नाही. सिडको येथे बास्केट बॉल ग्राउंडमध्ये छोटासा ट्रॅक आहे. तेथे सराव करावा लागतो. तर बराचवेळ सावंगी, चिकलठाणा, शेंद्रा अशा परिसरात रस्त्यावर जाऊन सराव करावा लागतो. हा सराव करताना येणाऱ्या जाणाऱ्या गाड्यांमुळे अपघात होण्याची भीती कायम तिच्या मनात राहते. तर स्पर्धा असेल त्यावेळी पुण्याला असलेल्या व्यावसायिक ट्रॅकवर जाऊन ती सराव करते. त्यासाठी तासनतास प्रवास तिला करावा लागतो. या खडतर प्रवासात तिचे कुटुंब तिला भक्कम साथ देत आहे. मात्र सरावासाठी योग्य ट्रॅक शहरात उपलब्ध असले तर आणखीन चांगली कामगिरी होऊ शकते, असे मत भार्गवी कराड हिने व्यक्त केले आहे.


लोकप्रतिनिधींनी पुढाकार घेण्याची गरज : भार्गवीचे आई-वडील दोघेही शिक्षक आहेत. एकीकडे खेळाडू आपली प्रतिभा दाखवत आहे, मात्र त्यासाठी सुविधा उपलब्ध नाही. आपल्या मुलांना खेळात आपले प्राविण्य दाखवण्यात यावे यासाठी पालक सदैव प्रयत्न करतात. मात्र योग्य सुविधा नसल्यास चांगले खेळाडू कशी होतील? असा प्रश्न आहे. त्यामुळे लोकप्रतिनिधींनी आणि खेळ प्रेमींनी एकत्र येऊन सर्वच खेळांच्या बाबतीत परिपूर्ण सुविधा असतील यासाठी प्रयत्न करावे असे मत भार्गवीचे वडील नामदेव कराड यांनी व्यक्त केले.

हेही वाचा : Mumbai HC On Footpaths Poor People: ते गरीब असतील पण तेही माणसे आहेत, फूटपाथवरून हटवण्याचे आदेश देऊ शकत नाहीत

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.