ETV Bharat / state

आमदार देवेंद्र भुयारांसह शेकडो शेतकऱ्यांची दिल्लीत धडक

author img

By

Published : Dec 11, 2020, 10:27 AM IST

गेल्या १६ दिवसांपासून कृषी कायद्यांविरोधात शेतकरी दिल्लीमध्ये आंदोलन करत आहेत. या आंदोलनाला देशभरातून पाठिंबा मिळत आहे. अमरावतीच्या वरुड-मोर्शी मतदान संघाचे स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे आमदार देवेंद्र भुयार हे देखील आपल्या शेकडो शेतकरी व कार्यकर्त्यांना घेऊन दिल्लीला रवाना झाले आहेत.

Devendra Bhuyar
देवेंद्र भुयार

अमरावती - केंद्र सरकारच्या कृषी कायद्या विरोधात दिल्लीत लाखो शेतकऱ्यांचे आंदोलन सुरू आहे. त्यांना पाठिंबा देण्यासाठी अमरावतीच्या वरुड-मोर्शी मतदान संघाचे स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे आमदार देवेंद्र भुयार आपल्या शेकडो शेतकरी व कार्यकर्त्यांना घेऊन दिल्लीला रवाना झाले आहेत. बुधवारी वरुड-मोर्शी तालुक्यातील शेतकरी आणि आमदार तामिळनाडू एक्सप्रेसने दिल्लीला गेले. आता ते दिल्लीत पोहचले असून तेथील आंदोलनात सहभागी झाले आहेत.

आमदार देवेंद्र भुयार शेकडो शेतकऱ्यांसह दिल्लीला पोहचले

भारत बंदच्या वेळी काढला होता मोर्चा -

८ डिसेंबरला भारत बंद आंदोलनामध्ये आमदार देवेंद्र भुयार यांनी वरुड मोर्शी तालुक्यात रास्ता रोको आंदोलन करत मोर्चा काढला होता. त्यानंतर ते आपल्या शेकडो कार्यकर्त्यांसह राजधानी दिल्लीत दाखल झाले आहेत. केंद्र सरकारच्या कृषी कायद्याविरोधात गेल्या १६ दिवसापासून दिल्लीच्या सीमेवर पंजाब व हरयाणा येथील शेतकरी आंदोलन करत आहेत. केंद्र सरकारने आणलेल्या नव्या कृषी कायद्याला कुठल्याही शेतकर्‍यांचे समर्थन नसल्याने भारतभर विविध पक्ष व संघटनांनी आंदोलन पुकारले आहे. आमदार देवेंद्र भुयार यांनी केंद्र सरकारला आंदोलनकर्त्या शेतकर्‍यांशी चर्चा करून तोडगा काढण्याचा इशारा दिला होता. अन्यथा आपल्या हजारो कार्यकर्त्यांसह दिल्लीला येऊन शेतकर्‍यांसोबत आंदोलन करू असेही म्हटले होते.

मोदींनी केला शेतकऱ्यांचा विश्वासघात -

लोकसभा निवडणुकीत शेतकऱ्यांच्या कर्जमुक्तीसह विविध आश्वासन देऊन भाजपा सरकार सत्तेवर आले. पण, गेल्या तीन वर्षांत शेतकऱ्यांच्या प्रश्नांचा त्यांना विसर पडला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी शेतकऱयांचा विश्वासघात केल्याचा आरोप स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे आमदार देवेंद्र भुयार यांनी केला. इतिहासात देशपातळीवर पहिल्यांदाच शेतकरी या आंदोलनानिमित्त एकत्र आला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी उत्पादन खर्चावर दीडपट हमीभावाचे आश्वासन दिले, पण त्यांनी ते पाळले नाही. स्वामिनाथन आयोगाची अंमलबजावणी केली नाही, उत्पादन खर्चावर आधारित दीडपट हमीभाव दिला नाही, सर्व शेतकऱ्यांचा ७-१२ कोरा केला नाही त्यामुळे शेतकरी संतापला आहे, असेही भुयार म्हणाले.

लोकवर्गणीतून आंदोलक पोहचले दिल्लीत -

लोकवर्गणीतून हजारो शेतकरी दिल्लीला आले आहे. असे देशाच्या इतिहासात पहिल्यांदाच घडत आहे. या आंदोलनासाठी मोठ्या संख्येने शेतकरी दिल्लीत दाखल झाले आहेत. केंद्र सरकारने मागण्यांबाबत ठोस निर्णय घेतल्याशिवाय आता माघार घेणार नाही, असा इशाराही नरेंद्र भुयार यांनी दिला.

TAGGED:

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.