ETV Bharat / city

Goa Assembly Elections 2022 : गोवा विधानसभा निवडणुकीची तारीख जाहीर, जाणून घ्या... गोव्यातील राजकीय परिस्थितीचा आढावा

author img

By

Published : Jan 8, 2022, 2:05 PM IST

Updated : Jan 8, 2022, 5:02 PM IST

गोवा विधानसभेसह ( Goa Assembly Elections 2022 ) देशातील पाच विधानसभांचा कार्यकाळ यावर्षी संपत आहे. भारतीय निवडणूक आयोग ( Election Commission of India ) आज विधानसभा निवडणुकीची तारीख जाहीर करण्यात आली आहे. या पार्श्वभूमीवर गोव्यातील 2017 विधानसभा निवडणूक, 2019 विधानसभा निवडणूक, सध्याच्या घडीचे संख्याबळ आणि राजकीय पक्षाच्या सद्यस्थितीतील परिस्थिती काय ( Political Scenario the Party in Goa ) आहे, यावर ईटीव्ही भारतचा विशेष रिपोर्ट.

Goa Assembly Elections 2022
गोवा विधानसभा निवडणूक 2022

पणजी - गोवा विधानसभा निवडणुकीकडे ( Goa Assembly Elections 2022 ) सर्व देशाचे लक्ष लागलेले आहे. गोव्याची राजधानी पणजी ही राजकीय अस्थिरतेमुळे नेहमीच चर्चेत असते. गोवा विधानसभा निवडणूक जवळ येऊ लागली तसं तसं राज्यातील राजकारणानं वेग घेतलाय. सत्तेसाठी सर्वच पक्षांनी कंबर कसली आहे. यावेळी केवळ काँग्रेस आणि भाजपच नाही, तर ममता बॅनर्जींची टीएमसी आणि अरविंद केजरीवाल यांची 'आम आदमी पार्टी'ही आपला दबदबा आजमावण्यासाठी प्रयत्न करत आहे. आता आज ( शनिवार ) भारतीय निवडणूक आयोगाने ( Election Commission of India ) विधानसभा निवडणुकीची तारीख जाहीर केली आहे. येत्या १४ फेब्रुवारीला निवडणूक होईल. तर १० मार्चला निकाल लागणार आहे. या पार्श्वभूमीवर गोव्यातील 2017 विधानसभा निवडणूक, 2019 विधानसभा निवडणूक, सध्याच्या घडीचे संख्याबळ आणि राजकीय पक्षाच्या सद्यस्थितीतील परिस्थिती काय ( Political Scenario the Party in Goa ) आहे, यावर ईटीव्ही भारतचा विशेष रिपोर्ट.

2017 विधानसभा निवडणूक -

2017 साली झालेल्या विधानसभा निवडणुकीत ( Goa Assembly Elections 2017 ) 40 पैकी 17 जागा जिंकून काँग्रेस सर्वात मोठा पक्ष ठरला होता. मात्र, लुईझींनो फलेरो आणि दिगंबर कामत यांच्या मुख्यमंत्री पदावरून झालेल्या अंतर्गत वादात भाजपाने आपल्या 13 आमदारसह महाराष्ट्र गोमंतक पक्ष 3 आमदार, गोवा फॉरवर्ड 3 आमदार व 2 अपक्ष आमदारांच्या मदतीने राज्यात सत्ता स्थापन केली आणि तत्कालीन केंद्रीय संरक्षण मंत्री मनोहर परिकर यांनी मुख्यमंत्री पदाची शप्पथ घेतली.

2017 सालीचे पक्षीय बलाबल -

भाजपा 13 आमदार
काँग्रेस 17 आमदार
गोवा फॉरवर्ड 3 आमदार
महाराष्ट्र गोमंतक पार्टी 3 आमदार
राष्ट्रवादी काँग्रेस 1 आमदार
अपक्ष 3 आमदार

त्यानंतर काँग्रेसकडून विजयी झालेले विश्वजित राणे यांनी आपल्या आमदारकीचा राजीनामा देऊन त्यांनी भाजपात प्रवेश केला.

विश्वजित राणे यांच्या पक्षबदलानंतर बलाबल -

भाजपा 14 आमदार
काँग्रेस16 आमदार
गोवा फॉरवर्ड3 आमदार
महाराष्ट्र गोमंतक पार्टी 3 आमदार
राष्ट्रवादी काँग्रेस1 आमदार
अपक्ष 3 आमदार

2019 ला राजकीय परिस्थिती बदलली -

2019 ला ( गोवा विधानसभा निवडणूक 2019 ) भाजपचे तत्कालीन उपमुख्यमंत्री फ्रान्सिस डिसुझा व त्यानंतर मुख्यमंत्री मनोहर परिकर यांचे निधन झाले. त्यातच मांद्रेचे आमदार दयानंद सोपटे आणि शिरोडाचे आमदार सुभाष शिरोडकर या दोन काँग्रेसच्या आमदारांनी राजीनामा दिला होता, म्हणून विधानसभेतील पक्षिय बलाबल होते.

भाजपा 12 आमदार
काँग्रेस14 आमदार
गोवा फॉरवर्ड3 आमदार
महाराष्ट्र गोमंतक पार्टी 3 आमदार
राष्ट्रवादी काँग्रेस1 आमदार
अपक्ष 3 आमदार

अशा परिस्थितीतही पुन्हा एकदा भाजपने गोवा फॉरवर्ड आणि महाराष्ट्र गोमंतक पक्षांच्या आमदारांची मोट बांधून तत्कालीन विधानसभेचे सभापती डॉ. प्रमोद सावंत यांना मुख्यमंत्रीपदी विराजमान केले.

2019 ला झालेल्या पोटनिवडणुकीत -

सुभाष शिरोडकर आणि दयानंद सोपटे यांनी भाजपाकडून निवडणूक लढविली आणि ते विजयी झालेत. तर म्हापसा मतदारसंघातील फ्रान्सिस डिसुझा यांच्या निधनाने रिक्त झालेल्या जागी त्याचे पुत्र जोशुआ डिसुझा आमदार झाले. मात्र, मनोहर परिकर यांच्या निधनाने रिक्त झालेल्या जागी काँग्रेसचे बाबुश मोंसरात विजयी झाले.

त्यांनंतरचे पक्षीय बलाबल -

भाजपा 15 आमदार
काँग्रेस15 आमदार
गोवा फॉरवर्ड3 आमदार
महाराष्ट्र गोमंतक पार्टी 3 आमदार
राष्ट्रवादी काँग्रेस1 आमदार
अपक्ष 3 आमदार

दरम्यान 2019 मध्ये मुख्यमंत्री डॉ प्रमोद सावंत यांच्या अध्यक्षतेखाली राज्य चालवत असतांना 10 जुलै 2019 ला काँग्रेसच्या 15 पैकी 10 व महाराष्ट्र गोमंतक पक्षाच्या 3 पैकी 2 आमदारांच्या गटाने भाजपात प्रवेश केला आणि राज्यात भाजपाचे स्थिर सरकार आले. भाजपाने पूर्ण बहुमत राखत गोवा फॉरवर्ड आणि महाराष्ट्र गोमंतक पक्षाचे सुदिन ढवळीकर यांना बाहेरचा रस्ता दाखवला आणि काँग्रेसमधून आलेल्या बाबू कवलेकर आणि महाराष्ट्र गोमंतक पक्षाच्या बाबू आजगावकर यांना उपमुख्यमंत्री पद तर इतर आमदारांना मंत्रीपदे तर काहींना महामंडळ बहाल करण्यात आले.

जुलै 2019 नंतर पक्षीय बलाबल -

भाजपा 27 आमदार
काँग्रेस5 आमदार
गोवा फॉरवर्ड3 आमदार
महाराष्ट्र गोमंतक पार्टी 1 आमदार
राष्ट्रवादी काँग्रेस1 आमदार
अपक्ष3 आमदार

सध्याच्या घडीचे संख्याबळ -

लुईझींनो फलेरो व रवी नाईक या काँग्रेसच्या दोन, भाजपाच्या अलिना सलढणा, राष्ट्रवादी काँग्रेसचे चर्चिल अलेमाव, गोवा फॉरवर्ड चे जयेश साळगावकर व अपक्ष आमदार रोहन खवटे यांनी आपल्या आमदारकीचा राजीनामा दिला आहे. त्यामुळे विधानसभेत सध्याच्या घडीला 34 आमदार आहेत.

भाजपा 26 आमदार
काँग्रेस3 आमदार
गोवा फॉरवर्ड2 आमदार
महाराष्ट्र गोमंतक पार्टी 1 आमदार
राष्ट्रवादी काँग्रेस0 आमदार
अपक्ष2 आमदार

सध्याची राजकीय परिस्थिती -

भाजपाने सध्या विरोधी पक्षातील बड्या नेत्यांना आपल्या गळाला लावायला सुरुवात केली आहे. यात काँग्रेसचे आमदार आणि मुख्यमंत्री रवी नाईक, गोवा फॉरवर्डचे जयेश साळगावकर, पर्वरीचे अपक्ष आमदार रोहन खवटे याना आपल्या पक्षात घेऊन 2022 च्या विधानसभा निवडणुकीत एकला चलोचा नारा दिला आहे.

तृणमुल काँग्रेस आणि महाराष्ट्र गोमंतक पक्ष -

राज्याच्या राजकारणात तृणमुल काँग्रेसच्या एंट्रीने राजकीय समीकरणे बदलून गेली आहेत. तृणमुल काँग्रेसने चर्चिल आलेमाव, लुईझींनो फलेरो या माजी मुख्यमंत्र्यांसह अनेक माजी आमदारांना आपल्या पक्षात घेतल्यामुळे त्यांचे पारडे जड झाले आहे. त्यातच महाराष्ट्र गोमंतक पक्षाने तृणमूलसोबत युती केल्यामुळे दोघांचे पारडे जड झाले आहे.

काँग्रेस आणि गोवा फॉरवर्ड -

एकेकाळी राज्यातील सर्वाधिक 17 जागा असणाऱ्या काँग्रेसकडे फक्त 3 आमदार शिल्लक आहेत. त्यांनी नुकतीच गोवा फॉरवर्ड पक्षासोबत युती केली आहे. गोवा फॉरवर्डचे सध्या 2 आमदार आहेत. दोन्ही पक्ष आगामी विधानसभा निवडणूक एकत्र लढण्याच्या तयारीत आहेत. यासोबतच आम आदमी पक्ष 40 जागा स्वबळावर लढणार आहे. त्यामुळे येणारा काळच ठरवेल गोव्याचा मुख्यमंत्री कोणत्या पक्षाचा होणार.

गोव्यात भाजपाची परिस्थिती -

गोव्यात गेल्या १० वर्षांपासून भाजपची सत्ता आहे. त्यामुळे भापजला यावेळी सत्ताविरोधी लाटेचा सामना करावा लागतोय. विशेषत: कोविड-19 च्या दुसऱ्या लाटेत रुग्णालयांमधील भोंगळ कारभार आणि ऑक्सिजनअभावी रुग्णांचा मृत्यू यामुळे जनतेमध्ये सरकारबद्दल नाराजी होती. अशा स्थितीत भाजपचे अध्यक्ष जे. पी. नड्डा यांनी पूर्ण ताकद लावली आहे. त्याचवेळी गोव्यात भाजपकडे चेहरा नसल्याचे मानले जात आहे. मनोहर पर्रीकर यांच्यापेक्षा मोठा चेहरा भाजपकडे नाही.

हेही वाचा - Lifetime Cabinet Status : माजी मुख्यमंत्री प्रतापसिंह राणे यांना आजीवन कॅबिनेट मंत्री दर्जा

Last Updated : Jan 8, 2022, 5:02 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.