ETV Bharat / city

बारा आमदारांचे निलंबन मागे घेतल्यास राज्यसभेची पोटनिवडणूक बिनविरोध?

author img

By

Published : Sep 24, 2021, 7:16 AM IST

काँग्रेसने त्यांच्या उमेदवाराचे अर्ज भरले आहेत. त्यावेळी काँग्रेसकडून रजनी पाटील तर भारतीय जनता पक्षाकडून संजय उपाध्याय यांचा उमेदवारी अर्ज भरण्यात आला आहे. ही निवडणूक बिनविरोध व्हावी, यासाठी काँग्रेसकडून प्रयत्न सुरू झाले आहेत.

राज्यसभेची पोटनिवडणूक बिनविरोध?
राज्यसभेची पोटनिवडणूक बिनविरोध?

मुंबई - काँग्रेसचे खासदार राजीव सातव यांच्या निधनानंतर राज्यसभेवरील एक जागेसाठी आघाडी सरकारकडून आणि भारतीय जनता पक्षाकडून उमेदवार देण्यात आले आहेत. मात्र ही निवडणूक बिनविरोध व्हावी यासाठी काँग्रेसचे नेते प्रदेशाध्यक्ष नाना पटोले आणि महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन राज्यसभेवरची निवडणूक बिनविरोध व्हावी यासाठी विनंती केली आहे. मात्र राज्यसभेची निवडणूक बिनविरोध व्हावी यासाठी देवेंद्र फडणीस यांनी आघाडी सरकार समोर एक प्रस्ताव ठेवला आहे. या प्रस्तावानुसार भारतीय जनता पक्षाचे निलंबित बारा आमदारांचे निलंबन मागे घेतल्यास निवडणूक बिनविरोध करण्याचा प्रस्ताव देवेंद्र फडणवीस यांनी आघाडी सरकार समोर ठेवला असल्याची माहिती सूत्रांकडून मिळत आहे. राज्यातील नक्षलवाद आणि ओबीसी आरक्षण अध्यादेश बाबत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी बैठक बोलावली होती सह्याद्री अतिथीगृहात असलेल्या बैठकीत राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील उपमुख्यमंत्री अजित पवार विधानसभेचे विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस उपस्थित होते. काँग्रेस नेत्यांनी देवेंद्र फडणीस यांची घरी जाऊन भेट घेतल्यामुळे देखील दोन्ही पक्षाची नाराजी असल्याचे सांगितले जात आहे.

प्रस्तावाबाबत शिवसेना आणि राष्ट्रवादी नाराज

राज्यसभेवरील निवडणूक बिनविरोध व्हावी यासाठी भाजपाकडून ठेवण्यात आलेल्या प्रस्तावाबाबत काँग्रेस सकारात्मक असली तरी आघाडी सरकार मधील शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसला हा प्रस्ताव मंजूर नसल्याचं सूत्रांकडून माहिती मिळत आहे. याआधीही राज्यसभेवरील एक जागेसाठी असलेली निवडणूक संख्याबळावर आपण जिंकू असा विश्वास सार्वजनिक बांधकाम मंत्री एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केला होता. त्यामुळे भारतीय जनता पक्षाने ठेवलेल्या या प्रस्तावाबाबत शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसला फारसा रस दिसत नाही.

भाजपाकडून कोणताही प्रस्ताव नाही -

राज्यसभेवरील निवडणूक बिनविरोध व्हावी यासाठी भारतीय जनता पक्षाकडून कोणताही प्रस्ताव ठेवला आले नसल्याची माहिती राज्याचे महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी दिली आहे. तसेच निवडणूक लढवावी किंवा लढू नये यासाठी भारतीय जनता पक्षाची कोर कमिटी निर्णय घेत असते. त्यामुळे यासंबंधी कोर कमिटीची चर्चा करून निर्णय घेऊ असे देवेंद्र फडणीस यांच्याकडून सांगण्यात आले असल्याचं पत्रकारांशी संवाद साधताना बाळासाहेब थोरात यांनी सांगितले.

थोरात, पटोलेंनी घेतली फडणवीसांची भेट -

काँग्रेस खासदार राजू सातव यांच्या निधनानंतर राज्यसभेवर एका जागेसाठी होणारी पोटनिवडणूक बिनविरोध होण्यासाठी काँग्रेसकडून प्रयत्न सुरू आहेत. काँग्रेस नेते आणि प्रदेशाध्यक्ष नाना पटोले आणि महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी विधानसभा विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांच्या शासकीय निवासस्थानी जाऊन भेट घातली. निवडणूक बिनविरोध व्हावी यासाठी काँग्रेस नेत्यांनी देवेंद्र फडणवीस यांना विनंती केली आहे.काँग्रेसने त्यांच्या उमेदवाराचे अर्ज भरले आहेत. त्यावेळी काँग्रेसकडून रजनी पाटील तर भारतीय जनता पक्षाकडून संजय उपाध्याय यांचा उमेदवारी अर्ज भरण्यात आला आहे. ही निवडणूक बिनविरोध व्हावी, यासाठी काँग्रेसकडून प्रयत्न सुरू झाले आहेत.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.