ETV Bharat / city

BMC Disaster Management App : आपत्ती व्यवस्थापनासाठी मुंबई महापालिकेचे अॅप, नागरिकांसह बचाव पथकाला होणार फायदा

author img

By

Published : Apr 22, 2022, 7:12 PM IST

एखादी आपत्ती घडल्यास त्या ठिकाणी बचाव पथकाला त्वरित पोहचता यावे, तसेच नागरिकांना त्या आपत्तीच्या धोक्यांची माहिती वेळीच मिळावी, यासाठी पालिकेकडून एक अॅप ( App For Disaster Management ) तयार केले जात असल्याची माहिती मुंबई महापालिका प्रशासनाकडून ( BMC Disaster Management App ) देण्यात आली आहे.

BMC Disaster Management App
BMC Disaster Management App

मुंबई - मुंबईत रोज आपत्तीच्या घटना घडतात. अशा घटना घडल्यावर कोणत्या उपाययोजना कराव्यात, यासाठी मुंबई महापालिकेकडून आपत्ती व्यवस्थापन आराखडा तयार केला जात आहे. एखादी आपत्ती घडल्यास त्या ठिकाणी बचाव पथकाला त्वरित पोहचता यावे, तसेच नागरिकांना त्या आपत्तीच्या धोक्यांची माहिती वेळीच मिळावी, यासाठी पालिकेकडून एक अॅप ( App For Disaster Management ) तयार केले जात आहे. त्याचा फायदा मुंबईकरांना तसेच बचाव पथकांना होणार असल्याची माहिती पालिका प्रशासनाकडून ( BMC Disaster Management App ) देण्यात आली आहे.

मुंबई दुर्घटनांचे शहर - मुंबईत पूर, इमारत कोसळणे, भूस्खलन, अतिवृष्टी, बॉम्बस्फोट, आग, रेल्वे अपघात आदी घटना घडतात. गेल्या वर्षी चेंबूर आणि विक्रोळी येथे भूस्खलन होऊन २९ जणांचा मृत्यू झाला. मुंबईत २९० भूस्खलन क्षेत्र आहेत. २२४ अतिधोकादायक इमारती आहेत. त्याठिकाणी हजारो नागरिक आपला जीव मुठीत घेऊन राहात आहेत. पावसाळ्यात काही तासात जास्त प्रमाणात पाऊस पडल्यास पूर स्थिती निर्माण होते. मुंबई शहर नेहमीच दहशतवाद्यांच्या हिट लिस्टवर राहिले आहे. मुंबईत आगीही मोठ्या प्रमाणात लागतात. अशा घटनांमध्ये नागरिक जखमी होतात. काहींचा मृत्यूही होतो. अशा घटना घडल्यास त्या परिस्थितीला त्वरित प्रतिसाद देण्यासाठी पालिकेने आपल्या २४ विभाग कार्यालयाच्या हद्दीत आपत्ती व्यवस्थापन कक्षाची स्थापना करण्याचा निर्णय घेतला आहे.

आपत्ती व्यवस्थापन आराखडा - आपत्कालीन व्यवस्थापन कक्षाचा विस्तार करण्यासाठी कृती आराखडा तयार करण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यानुसार २४ विभाग कार्यालयात पाच जणांची टीम बनवली जाणार आहे. यात आपत्ती व्यवस्थापनाचा अनुभव असलेली एक व्यक्ती, तीन सहाय्यक, स्थानिक अग्निशमन केंद्रातील अधिकारी आणि सुरक्षा कर्मचारी यांचा समावेश आहे. ही पाच जणांची टीम आपल्या विभागात कोणत्या ठिकाणी भूस्खलन होऊ शकते, कोणती इमारत पडू शकते, कोणत्या ठिकाणी पावसाचे पाणी साचू शकते आदी संभाव्य धोके ओळखून त्यांची नोंद करेल. अशा घटना घडल्यावर नागरिकांची सुटका करण्यासाठी, बचाव करण्यासाठी, त्यांचे पुनर्वसन करण्यासाठी कोणत्या जागा वापरता येऊ शकतील, आदींची माहिती असलेला आराखडा बनवला जात आहे.

आपत्ती व्यवस्थापनासाठी अॅप - आपत्ती व्यवस्थापन योग्य प्रकारे करता यावे, यासाठी धोकादायक इमारती, भूस्खलन होणारी ठिकाणे, पूर साचणारी ठिकाणे, पावसात एखाद्या ठिकणी पाणी साचले आहे का, आदींची माहिती अॅपवर असणार आहे. एखाद्या इमारतीला आग लागल्यास, इमारत पडल्यास त्याठिकाणी बचाव पथकाला पोहचण्याचे मार्ग, आजूबाजूला असलेली रुग्णालये, तातपुरता निवारा म्हणून वापरता येतील, अशी ठिकाणे, एखाद्या ठिकाणी पावसाळयात पूर आल्यास नागरिकांना कोणत्या सुरक्षा स्थळी ठेवता येऊ शकते. आदींची माहिती या अॅपवर नोंद असणार आहे. पावसाळयात कोणत्या ठिकाणी मोठा पाऊस पडला, कुठे पाणी साचले याचीही माहिती या अॅपवर असेल, त्यामुळे अशा विभागात नागरिक जाणार नाहीत. याचा फायदा नागरिकांना होणार आहे. तसेच बचाव पथकांनाही होणार आहे अशी माहिती पालिकेचे अतिरिक्त आयुक्त सुरेश काकाणी यांनी दिली.

पुढच्या आठवड्यात ट्रायल - आपत्ती व्यवस्थापनासाठी बनवण्यात येणाऱ्या अॅपची ट्रायल पुढील आठवड्यात घेतली जाणार आहे. त्यानंतर ते अॅप योग्य प्रकारे काम करत असल्याची खात्री पटल्यावर त्याचे नागरिकांसाठी लोकार्पण केले जाणार आहे. येत्या पावसाळ्यात नागरिकांना या अॅपचा फायदा घेता यावा, यासाठी लवकरात लवकर ते नागरिकांसाठी उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न पालिका प्रशासनाकडून केला जात आहे.

हेही वाचा - Rana VS Shivsena : मातोश्रीवर उद्या 9 वाजता हनुमान चालीसाचे पठण करणारच; रवी राणांचा निर्धार

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.