ETV Bharat / city

Aurangabad Water Crisis : राज्यपालांची मुख्यमंत्र्यांवर टोलेबाजी; पंतप्रधान मोदी सोडवणार का औरंगाबादचा पाणीप्रश्न

author img

By

Published : Jun 15, 2022, 1:25 PM IST

Updated : Jun 15, 2022, 2:37 PM IST

औरंगाबाद हे शहर मराठवाड्यासह पर्यटनाची राजधानी म्हणून ओळखली जाते. मात्र नागरिकांच्या पिण्याच्या पाण्याचा मोठा प्रश्न शहरात निर्माण झाला आहे. शहराला जायकवाडीच्या धरणातून पाणीपुरवठा करण्यात येतो. मात्र दुष्काळामुळे जायकवाडीतही पुरेसा जलसाठा नसल्याने शहरातील नागरिकांना पिण्याच्या पाण्यापासून वंचित रहावे लागते. मात्र औरंगाबादचा पाणीप्रश्न आता थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दालनात गेला आहे.

Aurangabad Water Crisis
संपादित छायाचित्र

औरंगाबाद - राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर औरंगाबादच्या पाणीप्रश्नांवरुन मंगळवारी चांगलीच टोलेबाजी केली. राज्य सरकारने पाणी प्रश्न सोडवला नसल्यानेच नागरिकांनी आपल्याकडे याबाबत तक्रारी केल्या. त्यामुळे मी पाणी प्रश्नांचा आढावा घेतल्याने राज्य सरकारला ते रुचले नाही. मात्र औरंगाबादच्या नागरिकांचा पाण्याचा प्रश्न पंतप्रधान मोदींनी सोडवावा, असे आवाहन राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी पंतप्रधान मोदीकडे केले. त्यामुळे औरंगाबादेतील पाण्याच्या प्रश्नावरुन केंद्र सरकार विरुद्ध राज्य सरकार वाद रंगला आहे.

काय आहे औरंगाबादचा पाणीप्रश्न - औरंगाबाद हे शहर मराठवाड्यासह पर्यटनाची राजधानी म्हणून ओळखली जाते. मात्र नागरिकांच्या पिण्याच्या पाण्याचा मोठा प्रश्न शहरात निर्माण झाला आहे. शहराला जायकवाडीच्या धरणातून पाणीपुरवठा करण्यात येतो. मात्र दुष्काळामुळे जायकवाडीतही पुरेसा जलसाठा नसल्याने शहरातील नागरिकांना पिण्याच्या पाण्यापासून वंचित रहावे लागते. औरंगाबाद शहरात आठ दिवसाच्या आड पाणीपुरवठा करण्यात येते. त्यामुळे सत्ताधारी शिवसेनेविरोधात नागरिकांमध्ये प्रचंड रोष आहे. औरंगाबाद महापालिकेवर शिवसेनेची सत्ता आहे. मात्र तरीही शिवसेना नागरिकांना नियमित पिण्याचे पाणी देण्यात अपयशी ठरली आहे.

पाण्यासाठी भाजपचे जलआक्रोश आंदोलन - शहरातील नागरिकांना आठ दिवसाआड पाणी मिळत असल्याने भाजपने विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वात भाजपने जलआक्रोश मोर्चा काढला होता. यावेळी नागरिकांना पाणी मिळेपर्यंत स्वस्थ बसणार नाही आणि स्वस्थ बसू देणार नसल्याचे देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केले. सरकारची कुंभकर्ण झोप मोडली नाही, तर सरकारला कोणीही वाचू शकणार नसल्याचा इशारा विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी दिला होता.

शहरात 1 लाख 27 हजार नळ कनेक्शन - शहरातील नागरिकांना पाणी देत असताना अनेक अडचणीचा महापालिकेला सामना करावा लागत आहे. पैठण येथील जायकवाडी धरणातून पाणी पुरवठा लोकसंख्येच्या मानाने कमी आहे. शहरात 1 लाख 27 हजार अधिकृत नळ कनेक्शन असून पाणीपट्टी वसून अवघी 20 ते 22 टक्के इतकी आहे. अनधिकृत नळ कनेक्शन देखील मोठ्या प्रमाणात आहेत. त्यामुळे पाणी पुरवठा करताना येणारा खर्च अधिक असल्याने पाणी पट्टी जास्त असल्याची माहिती महापालिकेकडून देण्यात आली होती.

राज्यात सर्वात महाग पाणी औरंगाबाद शहरात - मागील सहा वर्षांपासून शहरातील नागरिकांना भीषण पाणी टंचाईचा सामना करावा लागत आहे. तर त्यातही राज्यात सर्वात महाग पाणी महापालिका देत आहे. पाण्याचा प्रश्न गांभीर झाल्यावर आता पाणीपट्टी कमी केली गेली. इतके दिवस अपुरे पाणी दिले आणि पैसे पूर्ण घेतलेत. पाणीपट्टी कमी करून प्रश्न सुटणार आहे का? महापालिकेने पैसे भरलेल्या नागरिकांचे पैसे परत देण्याची मागणी एमआयएम नेते खासदार इम्तियाज जलील यांनी केली आहे.

समांतर पाणीपुरवठा योजना बारगळली - औरंगाबादच्या नागरिकांना नियमित पाणी पुरवठा करण्यासाठी महापालिकेने समांतर पाणीपुरवठा योजना आणली होती. मात्र ही योजना बारगळली. समांतर पाणीपुरवठा योजनेवरुन शहरातील सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये चांगलाच वाद रंगला होता. त्यानंतर ही योजना बारगळल्याने या वादावर पडदा पडला.

Last Updated : Jun 15, 2022, 2:37 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.