ETV Bharat / bharat

पंतप्रधान मोदी वाराणसी दौऱ्यावर; 26 तासांच्या दौऱ्यात वाराणसीकरांना देणार 19 हजार कोटी रुपयांचे 'गिफ्ट'

author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Dec 17, 2023, 9:44 AM IST

PM Modi Varanasi Visit : पंतप्रधान नरेंद्र मोदी रविवार आणि सोमवारी दोन दिवसांच्या वाराणसी दौऱ्यावर जाणार आहेत. यावेळी ते जनतेला कोट्यवधींच्या विकास योजनांची भेट देणार आहेत. तसंच जनतेलाही संबोधित करतील.

PM Modi Varanasi Visit
PM Modi Varanasi Visit

पंतप्रधान मोदी वाराणसी दौऱ्यावर

वाराणसी PM Modi Varanasi visit : पंतप्रधान नरेंद्र मोदी आज त्यांचा लोकसभा मतदारसंघ वाराणसीच्या दोन दिवसांच्या दौऱ्यावर आहेत. त्यांच्या साडेनऊ वर्षांच्या कार्यकाळातील त्यांचा हा 43 वा वाराणसी दौरा असणार आहे. यादरम्यान ते वाराणसी आणि पूर्वांचलसाठी 19 हजार कोटींहून अधिक किमतीच्या 37 प्रकल्पांची पायाभरणी आणि उद्घाटन करणार आहेत. स्वरवेद मंदिराच्या उद्घाटनासोबतच ते काशी तमिळ संगमच्या दुसऱ्या आवृत्तीचं उद्घाटनही करणार आहेत. मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ आणि राज्यपाल आनंदीबेन पटेल पंतप्रधानांचं स्वागत करणार आहेत. पंतप्रधान आज दुपारी वाराणसीला पोहोचतील. ते वाराणसीत जवळपास 26 तास वाराणशीत थांबणार आहेत.

काशी तमिळ संगमाचं करणार उद्घाटन : वाराणसी दौऱ्याच्या पहिल्या दिवशी पंतप्रधान मोदी संध्याकाळी नमोघाट इथून काशी तमिळ संगमच्या दुसऱ्या आवृत्तीचं उद्घाटन करतील. पंतप्रधान मोदी कन्याकुमारी ते बनारस येथून काशी तामिळ संगम एक्सप्रेसला हिरवा झेंडा दाखवतील. 17 ते 31 डिसेंबर या कालावधीत होणाऱ्या काशी तमिळ संगमच्या दुसऱ्या आवृत्तीत, तामिळनाडू आणि पॉंडिचेरी येथील 1400 मान्यवर कला, संगीत, हातमाग, हस्तकला, ​​पाककृती आणि तमिळनाडूच्या इतर विशेष उत्पादनांचं प्रदर्शन करण्यासाठी वाराणसी, प्रयागराज आणि अयोध्येला भेट देतील. काशी इथं एक प्रदर्शनही भरवण्यात येणार आहे. याशिवाय काशी आणि तामिळनाडूच्या संस्कृतींवर आधारित सांस्कृतिक कार्यक्रमही आयोजित केले जातील. काशी तमिळ संगमाच्या दुसऱ्या आवृत्तीत साहित्य, प्राचीन ग्रंथ, तत्त्वज्ञान, अध्यात्म, संगीत, नृत्य, नाटक, योग आणि आयुर्वेद या विषयांवर व्याख्यानंही होतील. याशिवाय इनोव्हेशन, ट्रेड, नॉलेज एक्स्चेंज, एज्युटेक आणि नेक्स्ट जेन टेक्नॉलॉजी या विषयांवर सेमिनार आयोजित केले जातील. यावेळी राज्यपाल आनंदी बेन पटेल, मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ, केंद्रीय मंत्री धर्मेंद्र प्रधान, राज्याचे उपमुख्यमंत्री केशव प्रसाद मौर्य आणि केंद्रीय राज्यमंत्री डॉ. एल मुरुगन उपस्थित राहणार आहेत.

19 हजार कोटी रुपयांचे 37 प्रकल्पांच करणार उद्धाटन : पंतप्रधान नरेंद्र मोदी त्यांच्या दौऱ्याच्या दुसऱ्या दिवशी सोमवारी सेवापुरी विकास गटाच्या बर्की ग्रामसभेत विकास भारत संकल्प यात्रा कार्यक्रमात सहभागी होतील. तिथून पंतप्रधान मोदी वाराणसी आणि पूर्वांचलला 19,155 कोटी रुपयांचे 37 प्रकल्प भेट देतील. यात रस्ते आणि पूल, आरोग्य आणि शिक्षण, पोलिस कल्याण, स्मार्ट सिटी आणि नागरी विकास प्रकल्प, रेल्वे, विमानतळ यासह विविध प्रकल्पांचे उद्घाटन आणि पायाभरणी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते होणार आहे. यात नवीन पंडित दीनदयाळ उपाध्याय ते नवीन भाऊपूर या 10 हजार कोटी रुपयांपेक्षा जास्त किमतीच्या समर्पित फ्राईट कॉरिडॉर प्रकल्पाचाही समावेश आहे. याशिवाय 166 कोटी रुपये खर्चून पूर्ण झालेल्या लहरतारा-फुलवारिया-शिवपूर चौपदरी रस्त्याचं उद्धाटनही पंतप्रधान नरेंद्र मोदी करणार आहेत. सोमवारीच पंतप्रधान वाराणसीच्या चौबेपूर उमरा इथं असलेल्या स्वरवेद महामंदिर धामचं उद्धाटनही करतील. यावेळी पंतप्रधान मोदी येथे आयोजित 25 हजार कुंडिया स्वरवेद ज्ञान महायज्ञाच्या संघटनेतही सहभागी होतील. या कार्यक्रमात देश-विदेशातील तीन लाख लोक सहभागी होण्याची शक्यता आहे. पंतप्रधान श्रीकाशी विश्वनाथ धाम आणि काल भैरव मंदिरात जाऊन पूजाही करु शकतात.

अनेक क्विंटल फुलांनी पंतप्रधानांचं होणार स्वागत : पंतप्रधान मोदींचं स्वागत करुन आपली ताकद दाखवण्यासाठी भाजपा पूर्णपणं सज्ज आहे. पंतप्रधान जेव्हा लाल बहादूर शास्त्री विमानतळावरून बाहेर पडतील तेव्हा पक्षाचे हजारो कार्यकर्ते आणि वाराणसीचे रहिवासी "हर हर महादेव" च्या घोषणा देऊन त्यांचं स्वागत करतील. पंतप्रधानांच्या स्वागतासाठी विमानतळ ते वाराणसी शहरापर्यंत 100 हून अधिक स्वागत दरवाजे बनवण्यात आले आहेत. याशिवाय 100 क्विंटलहून अधिक फुलांची व्यवस्था करण्यात आलीय. भाजपचे प्रदेशाध्यक्ष दिलीप पटेल यांनी सांगितलं की, पंतप्रधान लाल बहादूर शास्त्री विमानतळावरून थेट मिंट हाऊस येथील छोटा कटिंग मेमोरियल येथे येतील.

हेही वाचा :

  1. राजकोट किल्ल्यावरील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचं पंतप्रधान मोदींच्या हस्ते अनावरण
  2. पंतप्रधान मोदी आज सिंधुदुर्ग दौऱ्यावर; 'या' कार्यक्रमांना राहणार उपस्थित
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.