ETV Bharat / bharat

Top १० @ ११ AM : सकाळी अकरा वाजेपर्यंतच्या ठळक बातम्या...

author img

By

Published : Jun 27, 2020, 11:03 AM IST

सकाळी अकरा वाजेपर्यंतच्या ठळक बातम्या

Top 10 At 11 AM
Top १० @ ११ AM : सकाळी अकरा वाजेपर्यंतच्या ठळक बातम्या...

मुंबई - देशात कोरोना रुग्णांच्या संख्येने ५ लाख लाखांचा आकडा पार केला... लेह येथे पूल उभारण्याच्या कामादरम्यान दरीत कोसळून वीरमरण आलेले, नाईक सचिन मोरे यांच्या पार्थिवावर आज अंत्यसंस्कार करण्यात येणार आहे... सांगलीत एका राष्ट्रवादी नगरसेवकाने आमदार पडळकर यांचे स्वागत करत चक्क दुचाकीवर शहरभर घेऊन फिरल्याचा प्रकार घडला आहे... मोठ्या बहिणीने मोबाईल दिला नाही या रागातून १४ वर्षीय मुलाने गळफास घेत आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली, यासह महत्वाच्या बातम्या...

  • नवी दिल्ली - देशात कोरोना रुग्णांच्या संख्येत झपाट्याने वाढ होत आहे. देशातील रुग्णांच्या संख्येने ५ लाखांचा आकडा पार केला आहे. यात मागील २४ तासांमध्ये तब्बल १८ हजार ५५२ नव्या रुग्णांची भर पडली आहे, आरोग्य विभागाने ही माहिती दिली.

सविस्तर वाचा - देशात कोरोना रुग्णांची संख्या पोहोचली पाच लाख पार, महाराष्ट्रात सर्वाधिक रुग्ण

  • पुणे - लेह येथे पूल उभारण्याच्या कामादरम्यान दरीत कोसळून वीरमरण आलेले लष्कराच्या 115 इंजिनिअर्सच्या तुकडीतील नाईक सचिन मोरे यांचे पार्थिव शुक्रवारी (दि. 26 जून) सायंकाळी पुणे विमानतळावर खासगी विमानाने आणण्यात आले. यावेळी लष्कराच्या दक्षिण मुख्यालयातर्फे आणि हवाई दलातर्फे त्यांना मानवंदना देण्यात आली. त्यांचे पार्थिव पुण्यातून लष्करी वाहनाने मालेगाव तालुक्यातील त्यांच्या मूळगावी येथे नेण्यात आले. त्या ठिकाणी लष्करी इतमामात त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार होणार आहेत.

सविस्तर वाचा - पुणे विमानतळावर हुतात्मा सचिन मोरे यांना लष्कराकडून मानवंदना; आज मुळगावी होणार अंत्यसंस्कार

  • मुंबई - बाळासाहेब ठाकरे यांचे डॉक्टर जलील पारकर यांनी सहकारी संस्थांच्या पदाधिकाऱ्यांनी विरोधात कारवाईची मागणी केली होती. त्यानंतर आता घर कामगार व वाहन चालक यांना प्रवेश प्रतिबंधित न करण्याबाबत सहकार विभागाने एक पत्रक जारी केले आहे. लॉकडाऊनच्या काळात अनेक सोसायट्यांमध्ये प्रवेश बंदी केल्याने वयोवृद्ध रहिवासी आणि घर कामगारांचे हाल होत होते. मात्र आता सहकार विभागाने सोसायटीच्या आवारात या श्रमिक वर्गाला प्रवेश बंदी नसल्याचे स्पष्ट केले आहे. तसेच शासनाने जारी केलेल्या मार्गदर्शक सूचनांचे पालन करावे आणि मनमानी नियम करु नये, अशा स्पष्ट सूचना गृहनिर्माण संस्थांना देण्यात आल्या आहेत.

सविस्तर वाचा - सोसायटी पदाधिकाऱ्यांना चाप; आता वृत्तपत्र, दूध विक्रेत्यांसह कामगारांना मज्जाव करता येणार नाही

  • नाशिक - सिडको परिसरातील पाटील नगर येथे राहणाऱ्या एका विवाहितेने आत्महत्या केली होती. या प्रकरणी पतीसह पाच जणांवर आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा अंबड पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आला आहे.

सविस्तर वाचा - मरण कोणाला आवडतं? पण, मला आता जगायचं नाही म्हणत विवाहितेची आत्महत्या

  • मुंबई - देशासह राज्यात कोरोनाबाधितांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. तर एकीकडे बरे होण्याचे प्रमाण वाढत आहे. अशा परिस्थितीत प्लाझ्मा थेरपीमुळे मुंबई महानगरपालिकेच्या नायर रुग्णालयातून 15 जणांनी कोरोनावर मात केल्याची माहिती रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. मोहन जोशी यांनी दिली. तसेच प्लाझ्मा थेरपी यशस्वी झाल्यामुळे केईएम, सायन, जेजे रुग्णालयातही प्लाझ्मा थेरपी करण्यासाठी दात्यांकडून अँटीबॉडीज मिळवण्याचे प्रयत्न सुरु आहेत.

सविस्तर वाचा - मुंबईत 'प्लाझ्मा' थेरपी यशस्वी; नायर रुग्णालयातील 15 रुग्णांची कोरोनावर मात

  • सांगली - शरद पवारांवर टीका केल्या प्रकरणी राष्ट्रवादी काँग्रेसकडून भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांचा निषेध होत आहे. मात्र, सांगलीत एका राष्ट्रवादी नगरसेवकाने आमदार पडळकर यांचे स्वागत करत चक्क दुचाकीवर शहरभर घेऊन फिरल्याचा प्रकार घडला आहे. जत नगरपालिकेचे नगरसेवक लक्ष्मण उर्फ टीमु एडके या राष्ट्रवादीच्या नगरसेवकाने हे धाडस केले आहे. त्यामुळे सांगली जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस याची दखल घेणार का? हा प्रश्न निर्माण झाला आहे.

सविस्तर वाचा - राष्ट्रवादीच्या 'या' नगरसेवकाकडून पडळकरांचे समर्थन.. दुचाकीवरून शहरभर फिरवले

  • रत्नागिरी - मुंबई गोवा महामार्गाच्या चौपदरीकरणाच्या कामाचा मुद्दा पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. सध्या संथ गतीने सुरू असलेल्या आणि नागरिकांचा विरोध डावलून ठेकेदारांकडून काम सुरू असलेल्या ठिकाणांची पाहणी माजी खासदार निलेश राणेंनी शुक्रवारी केली. रत्नागिरी जिल्ह्यातील लांजा आणि राजापूर या दोन तालुक्यातील कामांचा आढावा त्यांनी घेतला. यावेळी कामातील त्रृटी लक्षात घेत त्यांनी ठेकेदारांची कानउघडणी केली.

सविस्तर वाचा - मुंबई-गोवा महामार्गाच्या कामावरून निलेश राणेंनी अधिकाऱ्यांना झापलं, तर ठेकेदारांना धरलं धारेवर

  • नागपूर - मोठ्या बहिणीने मोबाईल दिला नाही या रागातून १४ वर्षीय मुलाने गळफास घेत आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली. ही घटना शहरातील जरीपटका परिसरात घडली आहे. नयन मगनाणी असे मृताचे नाव आहे. तो नवव्या वर्गात शिकत होता.

सविस्तर वाचा - धक्कादायक...! बहिणीने मोबाईल दिला नाही म्हणून भावाची आत्महत्या

  • मुंबई - कोरोनाचे अभूतपूर्व संकट लक्षात घेऊन राज्य सरकारने विद्यापीठ आणि महाविद्यालयांच्या अंतिम वर्षांच्या परीक्षा रद्द करण्याचा निर्णय घेतला. असे असतानाच मुंबईतील एका नामांकित महाविद्यालयाने अकरावील तब्बल ६० विद्यार्थ्यांना नापास केले आहे. नापास करण्यात आलेले सर्व विद्यार्थी हे विज्ञान शाखेतील आहेत.

सविस्तर वाचा - सरासरी गुणांच्या आधारे 11वीच्या 60 विद्यार्थ्यांना रूपारेल महाविद्यालयाने केलं नापास, विद्यार्थ्यांत संताप

  • पुणे - शहरातील रहदारी आणि वाहनांच्या प्रदूषणाचा प्रश्न ही मोठी डोकेदुखी आहे. यावर उपाय काढण्याचे वेगवेगळे प्रयत्न सुरू असतात. पुणे महापालिकेने शहारातील प्रदूषणावर नियंत्रण आणण्यासाठी आता 'इलेक्ट्रिक बाइक ऑन रेंट'ही योजना राबवण्याचा निर्णय घेतला आहे.

सविस्तर वाचा - आता पुण्यात मिळणार 'इलेक्ट्रिक बाइक ऑन रेंट', प्रदूषणाला बसणार आळा

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.