महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

अमरावती रुग्णालय आग प्रकरणाचा तपास सुरू; चौकशी समिती पोहोचली जिल्हा स्त्री रुग्णालयात

अमरावती रुग्णालयातील नवजात शिशु अतिदक्षता विभागात आग लागून तीन बालकांचा मृत्यू झाला होता. या घटनेचा तपास केला जात आहे.

Amravati hospital NICU Fire Incident
अमरावती स्त्री रुग्णालय (ETV Bharat Reporter)

By ETV Bharat Marathi Team

Published : August 25, 2026 at 12:02 PM IST

अमरावती -जिल्हा स्त्री रुग्णालयात सोमवारी पहाटे नवजात शिशु अतिदक्षता विभागात लागलेल्या आगीमुळं तीन बालकांचा मृत्यू झाला. या पार्श्वभूमीवर आज शासनानं नियुक्त केलेली चौकशी समिती जिल्हा स्त्री रुग्णालयात दाखल झाली. या समितीच्या वतीनं या संपूर्ण प्रकरणाची चौकशी सुरू झाली आहे.

आरोग्य विभाग संचालकांच्या नेतृत्वात समिती -आरोग्य विभागाच्या सहसंचालक सुनीता गोलाईत यांच्या अध्यक्षतेत ही समिती गठीत करण्यात आली. या समितीमध्ये महाराष्ट्र विद्युत महामंडळाचे अधिकारी आहेत. या समितीच्या वतीने जिल्हा स्त्री रुग्णालयात जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. विनोद पवार यांच्या दालनात घटनेच्या वेळी उपस्थित डॉक्टर, परिचारिका आणि सर्व कर्मचाऱ्यांशी संवाद साधला जातोय.


चौथ्या मजल्यावर शुकशुकाट -जिल्हा स्त्री रुग्णालयाच्या नव्या इमारतीत चौथ्या मजल्यावर आज शुकशुकाट आहे. या मजल्यावर नवजात शिशु अतिदक्षता विभागात दाखल असणाऱ्या बालकांचे पालक, नातेवाईक यांची सतत गर्दी असायची. आज मात्र प्रचंड शुकशुकाट आहे.



आग लागली तो कक्ष बंद -नवजात शिशु अतिदक्षता विभागातील ज्या कक्षाला आग लागली होती, तो कक्ष अद्यापही बंद आहे. या कक्षामध्ये एकूण नऊ बालकांवर उपचार सुरू होते. त्यापैकी आगीत एकूण तीन बालक दगावलेत.

कोणाचीही गय केली जाणार नाही - जिल्हा स्त्री रुग्णालयात नवजात शिशू अतिदक्षता विभागात लागलेल्या आगीत तीन नवजात बालकांचा मृत्यू झाल्याच्या घटनेनं आरोग्य यंत्रणेला हादरवून सोडलं आहे. "या दुर्घटनेची चौकशी करण्यासाठी राज्य सरकारनं सात सदस्य चौकशी समिती गठित केली असून आठ दिवसात सखोल चौकशी करून अहवाल सादर करण्याचे निर्देश देण्यात आलेत. चौकशीत जे कोणी दोषी आढळतील त्यांच्यावर कठोर कारवाई केली जाईल. कोणाचीही गय केली जाणार नाही," असा स्पष्ट इशारा सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री प्रकाश आबिटकर यांनी पत्रकारांशी बोलताना दिला.

हेही वाचा -

  1. अमरावतीतील जिल्हा सामान्य रुग्णालयातील आगीत तीन बालकांचा मृत्यू, आतापर्यंत कुठे कुठे घडल्या आगीच्या घटना; जाणून घ्या घटनाक्रम
  2. अमरावतीतील नवजात बालकांच्या मृत्यूची चौकशी; आठ दिवसात अहवाल द्या - आरोग्य मंत्री प्रकाश आबिटकर
  3. अमरावती रुग्णालय आग प्रकरण: 'आरोग्यमंत्री नेमकं काय करत आहेत', अंबादास दानवेंचा सरकारला सवाल