देशाच्या रक्षणासाठी उभ्या असलेल्या वीर जवानांना सलाम करणारा ‘फौजी’!
मराठी चित्रपट ‘फौजी’ हा लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या चित्रपटातीची रिलीज तारीख समोर आली आहे.
By ETV Bharat Entertainment Team
Published : August 31, 2026 at 11:34 AM IST
हैदराबाद : देशाच्या सीमेवर दिवस-रात्र जागता पहारा देणारा भारतीय जवान हा केवळ देशाच्या सुरक्षेचा आधारस्तंभ नाही, तर कोट्यवधी भारतीयांच्या विश्वासाचे आणि अभिमानाचे प्रतीक आहे. कुटुंबापासून दूर राहून देशाच्या रक्षणासाठी स्वतःचे आयुष्य पणाला लावणाऱ्या या सैनिकांच्या त्यागाची जाणीव समाजातील प्रत्येक घटकापर्यंत पोहोचणे गरजेचे आहे. सैनिकांच्या शौर्यासोबतच त्यांच्या भावना, संघर्ष आणि त्यांच्यामागे उभ्या असलेल्या कुटुंबांची कहाणी सांगण्याचा प्रयत्न ‘फौजी’ या आगामी मराठी चित्रपटातून करण्यात आला आहे. सैनिकांच्या जीवनातील वास्तव, त्यांचे बलिदान आणि देशसेवेची प्रेरणा यांना केंद्रस्थानी ठेवणारा हा चित्रपट मराठी सिनेसृष्टीत वेगळा विषय घेऊन येत आहे.
स्वप्नासाठी केलेल्या अथक संघर्ष : ‘फौजी’ची ही केवळ एका चित्रपटाच्या निर्मितीची गोष्ट नाही, तर एका सामान्य माणसानं पाहिलेल्या स्वप्नासाठी केलेल्या अथक संघर्षाची प्रेरणादायी कहाणी आहे. घनश्याम येडे यांच्या मनात लहानपणापासूनच देशासाठी काहीतरी करण्याची इच्छा होती. कॉलेजच्या काळात एनसीसीमध्ये सहभागी होत त्यांनी शिस्त, देशप्रेम आणि सैनिकांप्रती असलेला आदर अधिक दृढ केला. मात्र शारीरिक अडचणींमुळं प्रत्यक्ष सैन्यात दाखल होण्याचे त्यांचे स्वप्न पूर्ण होऊ शकले नाही. मात्र गणवेश परिधान करून देशसेवा करता आली नाही, तरी सैनिकांच्या कार्याला आणि त्यागाला समाजापर्यंत पोहोचवण्याचा मार्ग त्यांनी निवडला. याच विचारातून ‘फौजी’ची संकल्पना आकाराला आली. सैनिकांचे जीवन आणि त्यांचे योगदान अधिकाधिक लोकांपर्यंत पोहोचावे, ही प्रामाणिक भावना त्यांच्या या प्रवासामागे होती.
कोरोना महामारीमुळं चित्रपटाचे काम अडचणीत : या स्वप्नाला साथ मिळाली ती सुहास गरगडे यांची. दोघांचीही आर्थिक परिस्थिती सर्वसामान्य असतानाही काहीतरी वेगळे आणि समाजाला प्रेरणा देणारे करण्याची जिद्द मात्र मोठी होती. बँका, पतसंस्था आणि विविध माध्यमांतून आर्थिक मदत उभी करत त्यांनी चित्रपट निर्मितीचे आव्हान स्वीकारले. मात्र पुढचा प्रवास अनेक संकटांनी भरलेला होता. नोटबंदी आणि त्यानंतर आलेल्या कोरोना महामारीमुळं चित्रपटाचे काम वारंवार अडचणीत आले. आर्थिक संकटांपासून अनेक अनपेक्षित प्रसंगांपर्यंत प्रत्येक टप्प्यावर ‘फौजी’ची परीक्षा होत राहिली. मात्र वासुदेव महाराज गरुड यांचे आशीर्वाद आणि सतीश नाझरकर, अशोक नाझरकर, गणेश गुंजाळ, डॉ. शंकर तळबे, सुनील गावडे, अशोक गाडे, प्रवीण बुरुंगे, राजेंद्र करणे, विष्णुपंत नेवाळे, शिवाजी दडस, कोंडीबा नलावडे, ज्योतिबा घाडगे यांच्यासह अनेक सहकाऱ्यांच्या मदतीनं हा प्रवास पुढं सुरू राहिला.
संपूर्ण प्रकल्पाला मोठा धक्का बसला :चित्रपट अंतिम टप्प्यात पोहोचला असतानाच नियतीनं आणखी मोठा धक्का दिला. ‘फौजी’शी जोडलेले आणि घनश्याम येडे यांचे जिवलग मित्र सुहास गरगडे यांचे अपघाती निधन झाले. या दुःखद घटनेनं संपूर्ण प्रकल्पाला मोठा धक्का बसला. चित्रपटाचे काम थांबण्याची परिस्थिती निर्माण झाली आणि तो पूर्ण करण्यासाठी घनश्याम येडे यांच्यावर स्वतःचे घर आणि जमीन गहाण ठेवण्याची वेळ आली. तरीही त्यांनी माघार घेतली नाही. सुहास गरगडे यांचे स्वप्न अधुरे राहू नये म्हणून त्यांच्या धाकट्या भावाला मयूर गरगडे यांना चित्रपटात सहभागी करून घेत त्यांनी मित्राच्या स्मृतीला अनोखी आदरांजली वाहिली. वैयक्तिक नुकसान सोसूनही दिलेला शब्द कायम ठेवण्याचा त्यांचा निर्धार या संपूर्ण प्रवासाची खरी ताकद ठरला.
या कठीण काळात घनश्याम येडे यांना नाथ विश्वनाथसाहेब यांचे मोलाचे मार्गदर्शन आणि पाठबळ लाभले. ज्यांना त्यांनी वडिलांसमान मानले, त्या विश्वनाथसाहेबांनी ‘फौजी’सारख्या सामाजिक आशयाच्या चित्रपटाच्या पाठीशी ठामपणे उभे राहत आपले मार्गदर्शन दिले. सहनिर्माती सौ. स्वप्नजा विश्वनाथ यांच्या माध्यमातून या कुटुंबानेही चित्रपटाच्या निर्मितीसाठी आपला भक्कम पाठिंबा दिला. अखेर ‘फौजी’ने सेन्सॉरच्या सर्व प्रक्रिया पूर्ण केल्या आणि प्रदर्शनाचा मार्ग मोकळा झाला. मात्र प्रदर्शनाच्या काही दिवस आधीच नाथ विश्वनाथसाहेब यांच्या प्रकृतीसमोर गंभीर संकट उभे राहिले. त्यांच्या मुलीनं स्वतःच्या शरीराचा अवयव दान करून त्यांचे प्राण वाचवले. चित्रपटाचे प्रदर्शन पुढे ढकलले गेले नाही; मात्र त्या क्षणी चित्रपटापेक्षा विश्वनाथसाहेबांचे जीवन सर्वांसाठी अधिक महत्त्वाचे होते.
फौजी’च्या प्रवासाला नवी दिशा :घनश्याम येडे यांचा मात्र विश्वास कायम होता—‘साहेब जगले, तर त्यांच्या आशीर्वादानं असे अनेक चित्रपट पुन्हा उभे करता येतील.’ आज त्यांचा हा विश्वास सार्थ ठरत असून विश्वनाथसाहेबांच्या आशीर्वादानं ‘फौजी’ प्रेक्षकांसमोर येण्यास सज्ज झाला आहे. या निर्णायक टप्प्यावर एकलव्य प्रतिष्ठान आणि सुधीरदादा पाटसकर यांनी ‘फौजी’चे प्रस्तुतकर्ते म्हणून जबाबदारी स्वीकारली. चित्रपट पाहिल्यानंतर घनश्याम येडे यांचे देशप्रेम, साधेपणा आणि प्रामाणिकपणा सुधीरदादांना भावला. सैनिकांची ही कथा अधिकाधिक घरांपर्यंत पोहोचली पाहिजे, या भावनेतून त्यांनी ‘फौजी’ला सर्वतोपरी पाठिंबा देण्याचा निर्णय घेतला. विश्वनाथसाहेब आणि सुधीरदादा पाटसकर यांच्यासारख्या संवेदनशील आणि खंबीर व्यक्तींच्या साथीमुळं ‘फौजी’च्या प्रवासाला नवी दिशा आणि बळ मिळाले आहे. त्यामुळं अनेक वर्षांच्या संघर्षानंतर हा चित्रपट आता दिमाखात प्रेक्षकांसमोर येण्यासाठी सज्ज झाला आहे.
‘फौजी’ चित्रपट कधी होणार रिलीज : ‘फौजी’मध्ये सौरभ गोखले, प्राजक्ता गायकवाड, शाहबाज खान, टीनू वर्मा, संजय खापरे, नागेश भोसले, हंसराज जगताप, अश्विनी कासार आणि घनश्याम येडे यांच्या महत्त्वपूर्ण भूमिका आहेत. त्यामुळं दमदार कलाकारांची भक्कम मांदियाळी या चित्रपटातून पाहायला मिळणार आहे. चित्रपटाच्या संगीताची बाजूही तितकीच समृद्ध आहे. शान, वैशाली माडे, बेला शेंडे, आदर्श शिंदे, उर्मिला धनगर आणि कविता राम यांच्या आवाजानं ‘फौजी’च्या कथेला सुरांची भावनिक साथ लाभली आहे. ‘फौजी’ हा केवळ सैनिकांवर आधारित चित्रपट नाही, तो देशासाठी सर्वस्व अर्पण करणाऱ्या जवानांच्या त्यागाला सलाम करणारा आणि त्यांच्या भावविश्वाची ओळख करून देणारा प्रयत्न आहे. शून्यातून उभ्या राहिलेल्या या स्वप्नाची प्रेरणादायी कहाणी आणि भारतीय सैनिकांच्या शौर्याला वाहिलेली ही भावपूर्ण आदरांजली प्रेक्षकांना अनुभवता येणार आहे. भारतीय लष्कराच्या शौर्याची, त्यागाची आणि सैनिकांच्या भावविश्वाची कहाणी असलेला 'फौजी' येत्या 27 नोव्हेंबर 2026 रोजी संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित होणार आहे.