महाराष्ट्र

maharashtra

पाकिस्तानच्या निवडणुकीत हेराफेरीचे आरोप; अमेरिका, ब्रिटनची चौकशीची मागणी, आंदोलनादरम्यान पीटीआयचा नेता जखमी

By ETV Bharat Marathi Team

Published : Feb 11, 2024, 7:35 AM IST

Pakistan Election : माजी पंतप्रधान इम्रान खान आणि त्यांचे समर्थक नेते पाकिस्तानातील निवडणुकीत हेराफेरी झाल्याचे आरोप करत आहेत. याविरोधात करण्यात आलेल्या निदर्शनांत एक पीटीआयचा नेता जखमी झाला.

Pakistan Election
Pakistan Election

इस्लामाबाद : पाकिस्तानातील सार्वत्रिक निवडणुकीत हेराफेरी झाल्याचा दावा इम्रान खान यांच्या पाकिस्तान तेहरीक-ए-इन्साफ (PTI) पक्षाचे समर्थन असलेले नेते करत आहेत. यावर अमेरिका, ब्रिटन आणि युरोपियन युनियननंही प्रतिक्रिया दिल्या आहेत. निवडणुकीत मुख्य लढत नवाझ शरीफ यांचा पक्ष पीएमएल-एन आणि पीटीआय-समर्थित उमेदवारांमध्ये होती. यामध्ये इम्रान खान समर्थित उमेदवारांनी विजय नोंदवला. मात्र दोन्ही पक्षांनी आपापल्या विजयाचा दावा केला आहे.

हेराफेरीची निःपक्षपातीपणे चौकशी व्हावी : पाकिस्तानमध्ये 265 जागांवर निवडणुका झाल्या. इथे कोणत्याही पक्षाला सरकार स्थापन करण्यासाठी 133 जागांची आवश्यकता आहे. याशिवाय महिला आणि अल्पसंख्याकांसाठी 70 जागा राखीव आहेत. अमेरिका आणि युरोपियन युनियननं म्हटलं की, जर स्थानिक नेते निवडणुकीत हस्तक्षेप आणि कार्यकर्त्यांच्या अटकेचा दावा करत असतील तर निवडणुकीतील अनियमितता, हस्तक्षेप आणि हेराफेरीची निःपक्षपातीपणे चौकशी झाली पाहिजे.

हिंसाचाराचा निषेध : युरोपियन युनियननं आपल्या निवेदनात, काही नेत्यांवर निवडणूक लढविण्यावर बंदी, अभिव्यक्ती स्वातंत्र्य आणि इंटरनेटवरील निर्बंधांचा उल्लेख केला. युनियननं सर्वांना समान संधी दिली नसल्याचं म्हटलं आहे. यूएस स्टेट डिपार्टमेंटनं निवडणुकीत हिंसाचाराचा आणि प्रसारमाध्यमांवरील हल्ल्यांचा उल्लेख केला आणि इंटरनेट सेवेवरील निर्बंध चुकीचे असल्याचं म्हटलं. निवडणुकीपूर्वी, संयुक्त राष्ट्रांच्या मानवाधिकार आयोगानंही राजकारणी आणि राजकीय पक्षांवरील हिंसाचाराचा निषेध केला होता.

पीटीआयवर निवडणुकीपूर्वी बंदी : घोटाळ्याच्या आरोपांनी घेरलेले इम्रान खान यांना निवडणूक लढवण्यास बंदी घालण्यात आली होती. तसेच त्यांचा पक्ष पीटीआयवरही निवडणुकीपूर्वी बंदी घालण्यात आली. मात्र, इम्रानच्या समर्थक नेत्यांनी स्वतंत्र निवडणूक लढवली. निवडणूक आयोगानं जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार, पीटीआय समर्थित 100 अपक्ष उमेदवार विजयी झाले. तर नवाझ शरीफ यांचा पक्ष पीएमएल-एनला 75 जागांवर विजय मिळाला.

पीटीआय नेता जखमी : दुसरीकडे, निवडणुकीत कथित हेराफेरीच्या आरोपावरून पीटीआयचे कार्यकर्ते देशभरात निदर्शनं करत आहेत. अनेक पीटीआय समर्थित नेत्यांनी दावा केला आहे की त्यांचा जाणीवपूर्वक पराभव झाला. या नेत्यांनुसार, पुरेशी मतं मिळूनही त्यांचा विजय जाहीर झाला नाही. शनिवारी वझिरीस्तानमध्ये आंदोलनादरम्यान एक पीटीआय नेता गोळी लागून गंभीर जखमी झाला.

हे वाचलंत का :

  1. पाकिस्तान निवडणूक : इम्रान खानचे अपक्ष उमेदवार नवाज शरीफांवर भारी, कोणालाच स्पष्ट बहुमत नाही
  2. अमेरिकेत भारतीय विद्यार्थ्यावर भीषण हल्ला, चार जणांनी पाठलाग करुन मारलं
  3. ब्रिटनचे राजे चार्ल्स तिसरे यांना कर्करोगाचं निदान, सार्वजनिक कामापासून दूर राहण्याच्या सूचना

ABOUT THE AUTHOR

...view details