Raosaheb Danve News: केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांनी जालन्यात केले श्रमदान; झुडपे तोडत केली तलावाची साफसफाई
जालना : लोकसहभागातून सार्वजनिक स्वच्छता, नदीपात्रातील कचरा प्लास्टिक काढण्यासह वृक्षारोपण श्रमदान अभियान हा जालन्यातून नवीन पॅटर्न तयार झाला आहे. राज्यातील सर्व गावांत या पध्दतीने नागरिकांना सोबत घेऊन स्थानिक प्रशासन स्तरावर काम करण्याची आज सर्वाधिक आवश्यकता असल्याचे केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे म्हणाले. घाणेवाडी तलाव स्वच्छता साप्ताहिक श्रमदान अभियानाच्या प्रसंगी ते रविवारी बोलत होते. यावेळी नूतन देसाई (अध्यक्ष कुंडलिका सीना रिज्यूवनेशन फाऊंडेशन), रमेशभाई पटेल, सुनील रायठठ्ठा, संतोष खांडेकर मुख्याधिकारी, भाजप शहराध्यक्ष राजेश राऊत, अर्जुन गेही, शिवरतन मुंदडा, उदय शिंदे यांच्यासह अनेक मान्यवर नागरिक मोठ्यासंख्येने उपस्थित होते. संत गाडगेबाबा घाणेवाडी जलाशयाच्या भिंतीवरील वाढलेले गवत, झुडपे तोडण्याच्या तसेच प्लास्टिक कचरा वेचण्याच्या श्रमदान मोहिमेत दानवे रविवारी उत्स्फूर्त सहभागी झाले. हातात कुऱ्हाड, कोयता घेऊन त्यांनी घाणेवाडी तलावाच्या भिंतीवरील गवत वाढलेली झुडपे तोडून कचरा वेचला. जालन्यातील विविध सामाजिक व सांस्कृतिक संस्थांचे पदाधिकारी व कार्यकर्ते दर रविवारी समस्त महाजन ट्रस्ट मुंबई यांच्या नेतृत्वात घाणेवाडी तलावाच्या भिंतीवर सामूहिक श्रमदान करत आहेत. दानवे यांनी या श्रमदान अभियानाचे कौतुक करत समाधान व्यक्त केले. समस्त महाजन ट्रस्ट मुंबई आणि सर्व सामाजिक संस्था नागरिक यांचे अभिनंदन केले. लोकसहभागातून शासन यंत्रणा जागृत होत आहे, असे दानवे म्हणाले.