यवतमाळ- विधानसभा निवडणुकीचे नामनिर्देशन पत्र भरण्याच्या शेवटच्या दिवशी भाजपा-शिवसेना पक्षाला बंडखोरीचे ग्रहण लागले आहे. त्यामुळे कार्यकर्ते अस्ताव्यस्त होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. यवतामाळ, वणी आणि उमरखेड विधानसभा मतदारसंघाची जागा भाजपच्या वाट्याला गेल्याने शिवसेनेचे संतोष ढवळे, माजी आमदार विश्वास नांदेकर व डॉ. विश्वनाथ विणकरे यांनी बंडखोरी करून अपक्ष नामनिर्देशन पत्र दाखल केले आहे. त्यामुळे सदरील जागांवर भाजप उमेदवारांचे विजयाचे गणित बिघडण्याची शक्यता आहे.
यवतमाळ विधानसभा मतदार संघातून शिवसेनेचे विधानसभा संपर्क प्रमुख आणि गेल्या वेळेसचे शिवसेनेचे उमेदवार संतोश ढवळे यांनी बंडखोरी केली. त्यांनी अपक्ष म्हणून नामनिर्देशन पत्र दाखल केले. गेल्या विधानसभा निवडणुकीत संतोष ढवळे यांना निसटता पराभवाचा सामना करावा लागला होता. त्यावेळी भाजपचे मदन येरावार १२२७ मतांनी विजयी झाले होते.
यावेळी सदरील जागेवर शिवसेनेने दावा केला होता. मात्र, युतीमध्ये ही जागा भाजपाच्या वाट्याला गेली. त्यामुळे शिवसैनिकांमध्ये कमालीची नाराजी पसरली आहे. शेवटी कार्यकर्त्यांच्या आग्रहास्तव संतोष ढवळे निवडणुकीच्या मैदानात उतरले आहे. त्यांच्या उमेदवारीमुळे भाजपाचे मदन येरावार यांचे विजयाचे गणित बिघडू शकते.
हेही वाचा-शक्तीप्रदर्शन करत वसंत पुरकेंनी दाखल केला उमेदवारी अर्ज