वर्धा- कोरोनाचा प्रादुर्भाव जिल्ह्यात वाढत असताना अनेक प्रतिबंधात्मक उपाययोजना राबवल्या जात आहे. याच पार्श्वभूमीवर रेशन दुकानदारानी लाभार्थ्यांना घरपोच धान्य पुरवण्याचे आवाहन देवळीचे तहसीलदार राजेश सरवदे यांनी केले. याला प्रतिसाद देत घरपोच धान्य वितरण करण्यात आले.
शासनाने मुख्यमंत्री गरीब कल्याण योजनेत जाहीर केलेले मे महिन्याचा मोफत धान्य साठा दुकानात पोहोचला. मात्र, कडक निर्बंधांच्या पार्श्वभूमीवर दुकाने न उघडता लाभार्थी कुटुंबांना धान्य वेळेवर पोहोचावे या उद्देशाने तहसीलदार राजेश सरवदे यांनी पुढाकार घेतला. नायब तहसीलदार राजेंद्र देशमुख, पुरवठा निरीक्षक सोपान मस्के तसेच तालुक्यातील राशन दुकानदार संघटनेचे अध्यक्ष आणि कार्यकारणीतील सदस्यांसोबत चर्चा करून धान्य वितरणाचे नियोजन केले.
यावेळी गावातील कोतवाल इतर मजूर वर्गामार्फत तालुक्यातील 35 हजार 613 शिधापत्रिका धारकांना धान्य घररपोच वाटप करण्यात आले आहे. जिल्ह्यात रुग्णांची संख्या वाढत असून जिल्हाधिकारी यांनी 5 दिवस कडक निर्बंध लावले आल्याने हे नियोजन महत्वाचे ठरले.