महाराष्ट्र

maharashtra

सोलापूर : केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत पंढरपूरचा राहुल चव्हाण 109 रँक घेत उत्तीर्ण

By

Published : Aug 4, 2020, 7:14 PM IST

केंद्रीय लोकसेवा आयोगाने 2019 मध्ये घेतलेल्या परीक्षेचा निकाल आज (दि. 4 ऑगस्ट) जाहीर झाला असून पंढरपूर तालुक्यातील खर्डी येथील राहुल चव्हाण आणि कासेगाव येथील अभयसिंह देशमुख, तर माळशिरस तालुक्याच्या वाघोली गावातील सागर भारत मिसाळ यांनी घवघवीत यश संपादन केले आहे.

rahul chavan
rahul chavan

पंढरपूर (सोलापूर)- केंद्रीय लोकसेवा आयोगाने 2019 मध्ये घेतलेल्या परीक्षेचा निकाल आज (दि. 4 ऑगस्ट) जाहीर झाला असून पंढरपूर तालुक्यातील खर्डी येथील राहुल चव्हाण आणि कासेगाव येथील अभयसिंह देशमुख, तर माळशिरस तालुक्याच्या वाघोली गावातील सागर भारत मिसाळ यांनी घवघवीत यश संपादन केले आहे.

पंढरपूर तालुक्यातील खर्डी येथील राहुल चव्हाणला केंद्रीय लोकसेवा आयोग (यूपीएससी) परीक्षेत 109 वा क्रमांक मिळाला आहे, कासेगावच्या अभयसिंह देशमुख याला 151, तर वाघोली येथील सागर भारत मिसाळने 204 वी रँक मिळवित हे यश प्राप्त केले आहे.

खर्डी येथील राहुल चव्हाणचे प्राथमिक शिक्षण खर्डी येथे झाले, तर माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण पंढरपूर येथील कवठेकर शाळा आणि कर्मवीर भाऊराव पाटील महाविद्यालयात पूर्ण केले आहे. पदवीचे शिक्षण पुणे येथील वाडिया महाविद्यालयातून कला शाखेची पदवी प्राप्त केली आहे. गेल्या दोन ते तीन वर्षांपासून तो केंद्रीय लोकसेवा आयोगाचा अभ्यास करत होता. यावर्षी त्याने 109 वी रँक मिळवत हे यश संपादित केले.

पंढरपूर तालुक्यातील कासेगाव येथील अभयसिंह देशमुख यांचा जन्म शेतकरी कुटुंबात झाला. शालेय शिक्षण गावातील शाळेत शिक्षण पूर्ण झाले, तर उच्च माध्यमिक शिक्षण कवठेकर प्रशाला व कर्मवीर भाऊराव पाटील महाविद्यालयात झाले आहे. पुढील शिक्षण पुणे येथील कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग मधून सिव्हिल शाखेतून पदवी प्राप्त केली. केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या परीक्षेसाठी तो तीन वर्षांपासून तयारी करत होता. गेल्या वर्षी त्याने केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत 503 वी रँक मिळवली होती. त्याची इंडियन कॉर्पोरेटमध्ये निवड झाली होती. मात्र, त्याने यावर्षी पुन्हा लोकसेवा आयोगाची परीक्षा देवून 151 वी रँक प्राप्त केली आहे.

सागर मिसाळचे शालेय शिक्षण वाघोली येथील जिल्हा परिषद शाळेत झाले आणि उच्च माध्यमिक शिक्षण हे अकलूज येथे झाले. कृषी शास्त्रात त्याने पदवी मिळवली आहे. गेल्या तीन वर्षांपासून नोकरी करत तो केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या अभ्यासाची तयारी करत होता. सागर मिसाळने दुसर्‍या प्रयत्नात यूपीएससी परीक्षेत घवघवीत यश संपादन केले आहे.

पंढरपूर तालुक्यातील कासेगाव व खर्डी, तर माळशिरस तालुक्यातील वाघोलीसारख्या ग्रामीण भागात युवकांनी शिक्षण घेऊन कठोर मेहनत आणि सरावात सातत्य राखत हे यश प्राप्त केले असल्याने त्यांच्यावर कौतुकाचा वर्षाव होत आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details