महाराष्ट्र

maharashtra

कोकण किनारपट्टीवर देवगडमध्ये झीप लाईन प्रकल्प सुरु

By

Published : Jan 1, 2021, 10:35 PM IST

झीप लाईन प्रकल्प

भारतातील समुद्र किनाऱ्यावरील पहिला आणि महाराष्ट्रातील सर्वात लांबीचा झिप लाईन सारखा प्रकल्प देवगडच्या किनारपट्टीवर सुरु झाला आहे.

सिंधुदुर्ग -भारतातील समुद्र किनाऱ्यावरील पहिला आणि महाराष्ट्रातील सर्वात लांबीचा झिप लाईन सारखा प्रकल्प देवगडच्या किनारपट्टीवर सुरु झाला आहे. आमदार नितेश राणे यांच्या हस्ते या प्रकल्पाचे उद्घाटन झाले आहे. देवगडच्या पर्यटन वाढीत हा प्रकल्प महत्वाचे पाऊल ठरेल, असा विश्वास आमदार राणे यांनी यावेळी व्यक्त केला. हा प्रकल्प देवगड नगरपंचायतीच्या सहकार्याने श्रीकांत जोईल आणि त्यांची बहीण यांनी मिळून उभारला आहे.

देवगडमध्ये झीप लाईन प्रकल्प सुरु

नामवंत निर्मात्यांच्या चित्रपटांचे चित्रीकरण देवगडमध्ये होणार-

आमदार राणे म्हणाले, झिप लाईन सारख्या अ‌ॅडव्हेंचर प्रकल्पामुळे देवगडच्या पर्यटनाला चालना मिळेल. केवळ देवगडमध्ये पर्यटन प्रकल्प न होता मालवण व वेगुर्लेमध्ये पर्यटनाचे वेगवेगळे प्रकल्प झाले पाहिजेत. येणारा पर्यटन तिन्ही तालुक्यात जायला हवा तरच जिल्ह्याचा पर्यटनातून आर्थिक विकास होईल. आगामी काळात यासाठी आपण सर्वोतोपरी प्रयत्न करणार आहोत. बॉलिवूडच्या चित्रपटांच्या चित्रीकरणास आता निर्मात्यांना देवगडमध्ये येण्यास आपण भाग पाडले आहे. लवकरच नामवंत निर्मात्यांच्या चित्रपटांचे चित्रीकरण देवगडमध्ये होणार आहे. त्यातून देवगड तालुक्यातील पर्यटन स्थळाची ओळख देशात होईल व पर्यटक येथे मोठ्या प्रमाणात येतील. देवगडमध्ये वॉटर पार्क व गो कार्टींगसारखे प्रकल्प लवकरच सुरू होणार आहेत. देवगड हा सिंधुदुर्ग जिल्ह्यातील प्रथम क्रमांकाचा पर्यटन तालुका होईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. तसेच जोईल भावंडांनी उभारलेल्या झिप लाईन प्रकल्पाचे त्यांनी कौतुक केले.

माजी आमदार अजित गोगटे ठरले पहिले साहसवीर-

झिप लाईन प्रकल्पाचे पहिले साहसवीर माजी आमदार अ‌ॅड. गोगटे यांनी झिप लाईनचा पहिला थरारक अनुभव घेतला. यावेळी बोलताना ते म्हणाले हा प्रकल्प देवगडच्या विकासात नक्कीच मार्गदर्शक आणि प्रेरणादायी ठरेल. साहसी पर्यटनातील हा अनुभव घेण्यासाठी पर्यटक निश्चितपणे येतील. अत्यंत सुरक्षितपणे या प्रकल्पात आनंद घेता येतो.

या प्रकल्पासाठी 2017 पासून प्रयत्न-

प्रकल्पाचे संयोजक श्रीकांत जोईल यांनी सांगितले की, देवगडमध्ये झिप लाईन प्रकल्पासाठी 2017 पासून आपण प्रयत्न करीत आहोत. आपण लॉकडाऊनमध्ये नोकरीमधून निवृत्ती घेऊन हा प्रकल्प उभा केला आहे. देशातील पहिला समुद्र किनाऱ्यावरील झिपलाईन प्रकल्प करण्याचा मान मला व तालुक्याला मिळाला आहे. या प्रकल्पाच्या माध्यमातून 11 जणांना रोजगार मिळाला असून 11 कुटुंबांना आधार मिळाला आहे. यापुढे देवगडचे नाव झिप लाईनसाठी ओळखले जाईल. तसेच अ‌ॅडव्हेंचरमध्ये अजून काही उपक्रम राबवून देवगडला कोकणातील अ‌ॅडव्हेंचर हब करण्याचा मानस असल्याचे ते म्हणाले. त्यांच्या भगिनी वैष्णवी या प्रकल्पाबाबत बोलताना भावूक होत भावाने लॉकडाऊनमध्ये नोकरी सोडून जमविलेली सर्व पुंजी या प्रकल्पामध्ये गुंतवली असल्याचे सांगून हा आमचा ड्रीम प्रोजेक्ट असल्याचे सांगितले.

हेही वाचा-'पर्यावरणाचे संवर्धन ही प्रत्येकाची जीवनशैली बनावी'

ABOUT THE AUTHOR

...view details