सांगली -सर्वोच्च न्यायालयाने मराठा आरक्षण रद्द केल्याने राज्यातील मराठा बांधव संतापले आहेत. या निकालाचे पडसाद सांगलीच्या मिरजेतही उमटले. 'राज्य सरकारकडून सर्वोच्च न्यायालयात मराठा समाजाची बाजू परखडपणे मांडली नाही. त्यामुळे सर्वोच्च न्यायालयात मराठा समाजाच्या विरोधात निकाल मिळाला', असा आरोपही मराठा क्रांती मोर्चा आणि अखिल भारतीय मराठा महासंघाने केला. तसेच, सरकार विरोधात आंदोलन करत निषेधही नोंदवला.
केंद्र आणि राज्य सरकारचा निषेध
मराठा आरक्षण सर्वोच्च न्यायालयाने रद्द केले आहे. या निकालानंतर राज्यभर संतप्त पडसाद उमटत आहेत. मराठा क्रांती मोर्चा आणि अखिल भारतीय मराठा महासंघाच्या वतीने राज्य सरकार आणि केंद्र सरकारच्या विरोधात आंदोलन करण्यात आले. महाविकास आघाडी सरकारच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. 'सर्वोच्च न्यायालयामध्ये मराठा आरक्षणाच्या बाजूने भक्कम भूमिका मांडण्यासाठी राज्य आणि केंद्र सरकार कमी पडले. त्यामुळे मराठा समाजाचे आरक्षण रद्द झाले', असे म्हणत केंद्र आणि राज्य सरकारचे निषेध करण्यात आला.