सांगली- तासगाव महसूल प्रशासन व मुरूम ठेकेदारांच्या विरोधात बहुजन रयत पार्टीच्या वतीने सांगलीमध्ये शोले स्टाईल आंदोलन करण्यात आले आहे. बहुजन रयत पार्टीच्या कार्यकर्त्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या परिसरात असणाऱ्या पाण्याच्या टाकीवर चढून अवैध उत्खनन विरोधात कारवाईची मागणी केली आहे.
कारवाईसाठी पाण्याच्या टाकीवर चढून आंदोलन
तासगाव तालुक्यात गेल्या काही महिन्यांपासून अवैधरित्या मुरूम उत्खनन सुरू आहे. मात्र, याकडे स्थानिक महसूल प्रशासनाकडून दुर्लक्ष करण्यात येत आहे. त्यामुळे प्रशासनाचा कोट्यवधी रुपयांचा महसूल बुडत असल्याचा आरोप बहुजन रयत पार्टीचे जिल्हाध्यक्ष प्रशांत केदारे यांनी केला आहे. वारंवार मागणी करूनही याबाबत दखल घेण्यात येत नसल्याने बहुजन रयत पार्टीच्या वतीने सांगली जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन करण्यात आले आहे. यावेळी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या परिसरात असणाऱ्या पाण्याची टाकीवर चढून अवैध उत्खनन प्रकरणी लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला. तातडीने अवैध उत्खनन झालेल्या ठिकाणचे पंचनामे करून संबंधित ठेकेदार आणि त्यांना पाठीशी घालणाऱ्या अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी करण्यात आली.
दरम्यान, या घटनेची माहिती मिळताच जिल्हा प्रशासनाने घटनास्थळी धाव घेत आंदोलकांशी चर्चा करून याबाबत कारवाई करण्याचे आश्वासन दिले. त्यानंतर बहुजन रयत पार्टीच्या वतीने आंदोलन स्थगित करण्यात आले. या प्रकरणी कारवाई झाली नाही तर तीव्र आंदोलन करण्यात येईल, असा इशारा जिल्हाध्यक्ष प्रशांत केदार यांनी दिला आहे.
हेही वाचा -सांगलीत रस्त्यावर ऑन द स्पॉट रॅपिड अँटीजेन टेस्टिंग, स्वतः आयुक्त उतरले रस्त्यावर