महाराष्ट्र

maharashtra

नंदुरबार जिल्ह्यात समाधानकारक पाऊस; धरणांतील पाणीसाठ्यामध्ये वाढ

By

Published : Aug 2, 2019, 1:34 PM IST

नंदुरबार जिल्ह्यात पावसाची संततधार सुरू असून पिकांना मुबलक पाणी मिळाल्याने शेतकरी आनंदात आहे. तर, तापी नदीच्या पात्रात जळगाव जिल्ह्यातील हतनूर धरणाचे पाणी सोडल्याने नदीला महापूर आला असून नदीकाठावरील गावांना सावधानतेचा इशारा देण्यात आला आहे. १ जून ते ३१ जुलैपर्यंत नंदुरबार जिल्ह्यात ३३५.४९ मिमी पावसाची नोंद करण्यात आली आहे.

नंदुरबार

नंदुरबार - जिल्ह्यात गेल्या चोवीस तासापासून पावसाची संततधार सुरू असून पिकांना मुबलक पाणी उपलब्ध झाल्याने बळीराजा सुखावला आहे. तसेच दमदार अशा पावसाने जिल्ह्यातील सर्वच लहान मोठ्या नदी-नाले प्रवाहित झाल्याने लघु आणि मध्यम प्रकल्पांमधील पाणीसाठ्यात वाढ झाली आहे.

जिल्ह्यातील समाधानकारक पावसाने नागरिक आनंदी


जिल्ह्यातून वाहणारी सर्वात मोठी नदी 'तापी'च्या पात्रात जळगाव जिल्ह्यातील हतनूर धरणाचे पाणी सोडल्याने नदीला महापूर आला आहे. तसेच या नदीवर सारंखेडा आणि प्रकाशा येथे उभारण्यात आलेल्या बॅरेजचे सर्व दरवाजे उघडण्यात आले आहे. त्यामुळे तापी नदीकाठावरील गावांना सावधानतेचा इशारा देण्यात आला असून जिल्हा प्रशासन तापी नदीतील पूर स्थितीवर लक्ष ठेवून आहे.


संततधार पावसामुळे जिल्ह्यातून जाणाऱ्या राष्ट्रीय महामार्ग आणि अंतर्गत रस्त्यांची चाळण झाली आहे. रस्त्यात मोठे खड्डे पडल्याने चिखल सदृश्य परिस्थिती निर्माण झाली असून महामार्गावर ट्रॅफिक जाम होत आहे. धडगाव आणि अक्कलकुवा तालुक्यातील दुर्गम भागात दरड कोसळल्याने नागरिकांना अडचणींचा सामना करावा लागत आहे.


दरम्यान १ जून ते ३१ जुलैपर्यंत नंदुरबार जिल्ह्यात ३३५.४९ मिमी पाऊस झाल्याची माहिती हवामान विभागाद्वारे देण्यात आली आहे. समाधानकारक झालेल्या पावसामुळे सध्या नागरिकांमध्ये आनंदाचे वातावरण आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details