नंदुरबार - गणेशोत्सव आणि मोहरमच्या पार्श्वभूमीवर नंदुरबार जिल्हा पोलीस दलाच्या वतीने नंदुरबार शहरात पथसंचलन करत शक्तिप्रदर्शन केले. त्याच्यासोबत पोलिसांनी शहरातील मुख्य चौकांमध्ये दंगा काबू प्रात्यक्षिकही सादर केलीत.
नंदुरबार जिल्ह्यात गणेशोत्सवाच्या काळात कायदा सुव्यवस्था अबाधित राहावी म्हणून पोलीस दलाच्या वतीने मोठ्या शहरांमध्ये पथसंचलन केले जात असून नागरिकांना शांततेचे आव्हानही करण्यात आले. या पथसंचलनात जिल्हा पोलीस दल व राज्य राखीव पोलीस दल त्याच्यासोबत गृहरक्षक दलाचे जवान सहभागी झाले होते.
शहर पोलीस ठाण्यापासून काढण्यात आलेला रुटमार्च नेहरु पुतळा, गांधी पुतळा, महाराष्ट्र व्यायामशाळा, अलिसाहब मोहल्ला, माळीवाडा, इलाही चौक, मच्छीबाजार, जळका बाजार, शिवाजी रोड, दोशाह तकीया, देसाईपुरामार्गे मोठा मारुती मंदिरापर्यंत असा झाला. यावेळी शहरातील माळीवाडा व मोठा मारुती मंदिराजवळ चौकात पोलीस अधिकारी, कर्मचार्यांनी दंगाकाबुचे प्रात्यक्षिक करुन दाखविले.
या रुटमार्चमध्ये उपविभागीय पोलीस अधिकारी रमेश पवार, प्रशिक्षणार्थी पोलीस उपअधिक्षक साळुंखे, शहर पोलीस निरीक्षक सुनिल नंदवाळकर, तालुका पोलीस निरीक्षक रणदिवे, उपनगरचे पोलीस निरीक्षक भापकर, वाहतूक पोलीस निरीक्षक आदाटे यांच्यासह 119 पोलीस अधिकारी व कर्मचारी, 32 होमगार्ड आणि 1 एसआरपीची तुकडी सहभागी झाले होते.