महाराष्ट्र

maharashtra

Protest For Police Inspector Suspension: पोलीस निरीक्षकांच्या निलंबनासाठी अक्कलकुव्यात रास्ता रोको

By

Published : Feb 27, 2023, 11:51 AM IST

नंदुरबार जिल्ह्यातील अतिदुर्गम तालुका म्हणून ओळख आहे. पोलीस प्रशासनाच्या वतीने समाजातील जेष्ठ नागरिकांना अपशब्द व असभ्य वागणूक देऊन पोलीस स्टेशनबाहेर काढण्यात आले. या कारणातून आदिवासी समाज बांधवांनी पोलीस ठाण्यासमोर ठिय्या आंदोलन करीत रास्ता रोको केला. या प्रसंगी विधान परिषदेचे आमदार आमश्या पाडवी यांच्यासह असंख्य समाज बांधव उपस्थित होते.

Protest For Police Inspector Suspension
पोलीस निरीक्षकांच्या निलंबनासाठी अक्कलकुव्यात रास्ता रोको

प्रतिक्रिया देताना बाईट- आ. आमश्या पाडवी विधान परिषद सदस्य

नंदुरबार : यावेळी आंदोलकांकडून अक्कलकुवा पोलीस ठाण्यात नवनियुक्त पोलीस निरीक्षकांनी अर्वाच्च भाषा वापरल्यामुळे त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करण्यात येऊन त्यांना त्वरित निलंबित करावे, या मागणीसाठी पोलीस ठाण्यासमोर सायंकाळी रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. अखेर रात्री उशिरा वरिष्ठ अधिकाऱ्यांनी मध्यस्थी करीत सदर आंदोलन स्थगित केले. अक्कलकुवा तालुक्यातील एका गावातील तरुणीला 14 फेब्रुवारी रोजी एका समाजातील तरुणाने पळवून नेले होते.


रास्ता रोको आंदोलन :याबाबत तरुणीच्या कुटुंबीयांनी मुलीला फुस लावून पळविल्याची फिर्याद दिली होती. मात्र अक्कलकुवा पोलिसांनी हरविल्याची नोंद केली. या तरुणीच्या पोलिसांनी तात्काळ शोध लावण्याची मागणी केली होती. याबाबत रास्ता रोको आंदोलनाचा इशारा देण्यात आला होता. पोलिसांनी तपासाची गती वाढवून मुलीच्या तपास लावून नंदुरबार येथे मुलीच्या कुटुंबीयांना सुपूर्द करण्यासाठी बोलाविण्यात आले होते. मात्र मुलीचे कुटुंबीय तसेच गावचे सरपंच व प्रतिष्ठितांनी मुलीला अक्कलकुवा येथील पोलीस ठाण्यामार्फत पालकांना का देत नाही, अशा प्रश्‍न उपस्थित केला.

अपशब्द वापरल्याचा निषेध :यावेळी अक्कलकुवा पोलीस ठाण्याचा नवीनच पदभार स्वीकारलेल्या पोलीस निरीक्षक दीपक बुधवंत यांनी अपशब्द वापरला. याचा निषेध व्यक्त करीत असभ्य पोलीस अधिकार्‍यावर कारवाई करुन गुन्हा दाखल करावा, या मागणीसाठी शेवाळी-नेत्रंग महामार्गावर रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. सुमारे अडीच तास चाललेल्या या रास्ता रोकोनंतर उपविभागीय पोलीस अधिकारी संभाजी सावंत यांनी संबंधित अधिकार्‍यावर कायदेशीर कारवाई करण्यात येईल. त्याबाबत वरिष्ठांना अहवाल सादर करून वरिष्ठ योग्य ती कारवाई करतील, यापुढे पोलीस अधिकारी व कर्मचार्‍यांकडून प्रत्येकाला चांगली वागणूक दिली जाईल, असे आश्‍वासन दिल्याने रात्री आठ वाजता आंदोलन स्थगित करण्यात आले.



आंदोलनात 'हे' उपस्थित :यावेळी आमदार आमश्या पाडवी, आदिवासी एकता परिषदेचे नागेश पाडवी, आदिवासी महासंघाचे किसन महाराज, हिरामण पाडवी, जे. डी. पाडवी, पंचायत समिती सदस्य जेकमसिंग पाडवी, सरपंच वसंत वसावे, कान्हा नाईक, विनोद वळवी, कुवरसिंग वळवी, भूपेंद्र पाडवी, मंगलसिंग वळवी, पृथ्वीसिंग पाडवी, केतन पाडवी, राजेंद्र वसावे, सुनीलराव, अश्‍विन तडवी, विकेश पाडवी, राजू तडवी, नटवर पाडवी, अ‍ॅड. रुपसिंग वसावे आदिंसह विविध आदिवासी संघटनांचे पदाधिकारी कार्यकर्ते ग्रामस्थ तसेच पीडित मुलीचे कुटुंबीय उपस्थित होते.


वरिष्ठांनी घेतली दखल :रास्ता रोको आंदोलन स्थगित झाल्यानंतर घटनास्थळी अतिरिक्त पोलीस अधीक्षक निलेश तांबे अक्कलकुवा पोलीस ठाण्यात दाखल झाले. त्यांनी पोलीस निरीक्षकांच्या दालनात पोलीस अधिकार्‍यांची बैठक घेतली. ते नेमकी काय कारवाई करतात? याकडे आंदोलनकर्त्यांचे लक्ष लागले होते. पोलीस अधिकार्‍याने पोलीस ठाण्यात येणार्‍यांशी अश्‍लील भाषा वापरणे, कायद्याच्या चौकटीत न बसणारे आहे. त्यामुळे या अधिकार्‍यावर कठोर कारवाई न झाल्यास उद्यापासून होणार्‍या अर्थसंकल्पीय अधिवेशनात कठोर कारवाई करून त्वरित निलंबन करण्यात यावे, अशी मागणी करणार असल्याचे आमदार आमश्या पाडवी यांनी सांगितले.


वाहनांच्या रांगा :सायंकाळी सहा वाजेपासून आदिवासी समाजातर्फे रास्ता रोको आंदोलन सुरू करण्यात आले. यावेळी नेत्रंग - शेवाळी महामार्गावर मोठ्या प्रमाणावर वाहनांच्या रांगा लागल्या होत्या. त्यामुळे काही काळ वाहतूक ठप्प झाली होती. रात्री उशिरा आंदोलन संपल्यानंतर वाहतूक सुरळीत करण्यात आली. वरिष्ठ अधिकाऱ्यांनी मध्यस्थी केल्यानंतर हे आंदोलन स्थगित करण्यात आले. वरिष्ठ अधिकाऱ्यांनी योग्य कारवाई करण्याचे आश्वासन दिले.

हेही वाचा : Bada Hanuman Mandir Beed: बीड जिल्ह्यात प्रसिद्ध असलेला बडा हनुमान; जाणून घ्या काय आहे ख्याती

ABOUT THE AUTHOR

...view details