महाराष्ट्र

maharashtra

नंदुरबार; भरधाव पिकअपच्या धडकेत दोन जिवलग मित्र ठार

By

Published : May 25, 2021, 11:03 AM IST

सोमवारी सायंकाळी 6 ते 6.30 वाजेच्या सुमारास नंदुरबारहून दोंडाईचाकडे जाणारी भरधाव वेगातील पिकअप वाहनाने दोंडाईचाकडून नंदुरबारकडे येणारी दुचाकीला जबर धडक दिली. ही धडक एवढी जोरात होती, की दुचाकीवरील अश्‍विन आणि सागर या दोघांचाही जागीच मृत्यू झाला.

अपघात
accident

नंदुरबार - भरधाव पिकअपने दुचाकीला उडविल्याने दोघा युवकांचा जागीच मृत्यू झाल्याची घटना वावद गावाच्या वळणावर घडली. श्‍विन प्रकाश सोनार (वय 36), सागर सुधाकर सोनार (वय 37) अशी मृत्यू झालेल्या दोघांची नावे आहेत. त्यांच्यावर जिल्हा रुग्णालयात शवविच्छेदन करून रात्री उशिरा अंत्यसंस्कार करण्यात आले.

सोनार समाजावर शोककळा
सोमवारी सायंकाळी 6 ते 6.30 वाजेच्या सुमारास नंदुरबारहून दोंडाईचाकडे जाणारी भरधाव वेगातील पिकअप वाहन (क्र.एम.एच.28 एच.8514) ने दोंडाईचाकडून नंदुरबारकडे येणारी दुचाकीला जबर धडक दिली. ही धडक एवढी जोरात होती, की दुचाकीवरील अश्‍विन आणि सागर या दोघांचाही जागीच मृत्यू झाला. अपघातानंतर दोघांना नंदुरबार जिल्हा रूग्णालयात दाखल करण्यात आले. तत्पुर्वी त्यांचा घटनास्थळी मृत्यू झाला होता. अश्‍विन व सागर या दोघांच्याही डोक्याला जबर इजा झाल्याने त्यांचा मृत्यू झाला असल्याचे सांगण्यात येत आहे. दरम्यान, अपघाताचे वृत्त समजल्यानंतर अश्‍विन व सागर सोनार या दोघांचा निवासस्थानी मित्र परिवार, नातवाईकांनी एकच गर्दी केली होती. अश्‍विन व सागर या दोघांचाही तरुण वर्गात दांडगा जनसंपर्क होता. हे दोघेही मितभाषी होते. अपघाताची माहिती मिळताच भाजपाचे जिल्हाध्यक्ष विजय चौधरी यांनी कै.अश्‍विन सोनार व सागर सोनार यांच्या परिवाराचे सांत्वन केले.

समाजकार्यातील उत्साही कार्यकर्ता
पिकअप वाहनाच्या धडकेत ठार झालेला अश्‍विन सोनार हा समाजकार्यात नेहमीच अग्रेसर होता. त्याचप्रमाणे समाजकार्य करीत असताना भाजपाची बुथ प्रमुखाची धुराही यशस्वीपणे सांभाळत होता. नंदनगरीतील मानाचे असलेले दादा, बाबा तसेच काका गणपतीचीही परंपरागत अश्‍विन सोनार सेवा करीत होता. गणेश उत्सवात त्याची महत्वाची भूमिका होती. पूर्वजांपासून वारसा मिळालेल्या काका गणपतीच्या गणेश उत्सवाला अश्‍विनने नवीन रुप दिले होते.

लॉकडाऊन काळात गरीबांची भुूक भागविणारे युवक
गेल्या महिन्याभरापासून नंदुरबार शहरात सुवर्ण युवाशक्ती ग्रुपच्या माध्यमातून गोरगरीबांना अन्नदान करण्यात येत आहे. या अन्नदानात सोनार समाजातील युवकांसोबतच कै.अश्‍विन सोनार व सागर सोनार अग्रेसर होते. मागील 28 दिवसांपासून एक दिवसही न खंड पडता सूवर्ण युवाशक्ती गृपकडून दुपारी व रात्री शहरातील गोरगरीबांना तसेच रूग्णालयातील रूग्ण व त्यांच्या नातेवाईकांना अन्नदान करण्यात येत आहे. या कामात कै.अश्‍विन सोनार सुरुवातीपासूनच सक्रीय होता. अन्नदानाच्या स्वयंपाकापासून तर ते गरजूंपर्यंत अन्नदान पोहोचविण्यासाठी या दोघा युवकांचा मोठ्या प्रमाणावर वाटा होता. त्यांच्या अपघाती निधनामुळे हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details