नागपूर : भाजपचे १०५ आमदार जनतेने निवडून दिले, ते आता जनतेचे पैसे लुटत असल्याचा गंभीर आरोप नाना पटोले यांनी केला आहे. ते आज नागपूर येथील निवासस्थानी आयोजित पत्रकार परिषदेत बोलत होते.
निवृत्तांना काम तर बेरोजगारांवर कुऱ्हाड : राज्य सरकारने एक सुलतानी जीआर काढला आहेत. त्यात निवृत्त शिक्षकांना २० हजाराच्या मानधनावर रिक्त पदी भरती करण्यात येणार आहे. म्हणजे बेरोजगार तरुणांवर एकप्रकारे कुऱ्हाड चालवली जाणार असल्याचा आरोप त्यांनी केला आहे. निवृत्तांना कामावर लावून तरुणांवर आघात करणारे हे सरकार आहे.
राष्ट्रपती शासन लागले पाहिजे :महाराष्ट्रात कायदा व सुव्यवस्थेची परिस्थिती बरोबर नाही म्हणून महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट लागली पाहिजे अशी मागणी, नाना पटोले यांनी केली आहे. मंत्रिमंडळ विस्तारानंतर आता खाते वाटपामध्ये मलाईदार खाते कोणाला मिळणार यावर चर्चा सुरू आहे. एकीकडे राज्यातील जनता उपाशी आणि सरकार तुपाशी अशी परिस्थिती निर्माण झाल्याने तातडीने राज्यपाल, राष्ट्रपती यांनी लगेच हस्तक्षेप केला पाहिजे. विरोधकांना भीती दाखवून दाबण्याचा प्रयत्न सुरू आहे, त्यामुळे तातडीने कारवाई झाली पाहिजे असे नाना पटोले म्हणाले.
सरकार आता मायबाप राहिलेले नाही: मंत्रिमंडळात कुणाला कोणते मंत्रिपद मिळेल याच्याशी जनतेला काहीही देणे घेणे नाही. सरकार आता मायबाप राहिलेले नाही, हे जनतेला लुटणारे सरकार झाले आहे. जनतेला वाऱ्यावर सोडले आहे. अनेक भागात पेरण्या झालेल्या नाहीत. पावसाची मदत मिळाली नाही त्यामुळे शेतकरी आत्महत्या करत आहेत. राज्याचे कृषीमंत्री शेतकऱ्यांना लुटायला निघाले आहेत. नकली टीम तयार करून कृषी केंद्रावर आपलेच अधिकारी पाठवायचे व लुटायचे काम सुरू आहे.
महाराष्ट्राला भाजपने कलंक लावला: राज्यात कलंक शब्दाचा विषय निघाला आहे. महाराष्ट्राला भाजपने कलंक लावून ठेवलेला आहे. राज्यात राष्ट्रपती राजवटी लागू करण्याबद्दल आम्ही राज्यपालांना निवेदन देणार असल्याचे पटोले म्हणाले.