नागपूर -ओबीसी आरक्षण कोट्याला धक्का न लागू देता मराठा समाजाला आरक्षण दिल्यास आमचा विरोध नसेल. मात्र, ओबीसी कोट्याला धक्का लागल्यास सहन केलजाणार नसल्याचा इशारा राष्ट्रीय ओबीसी महासंघाने दिला होता. त्यानंतर आता राष्ट्रीय ओबीसी महासंघाकडून आज नागपूरच्या जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला होता. राष्ट्रीय अध्यक्ष बबनराव तायवाडे यांच्या नेतृत्वात काढण्यात आलेल्या मोर्चात ओबीसींच्या संवैधानिक मागण्या पूर्ण करण्याची मागणी करण्यात आली आहे.
राष्ट्रीय ओबीसी महासंघाचा नागपूर जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक मोर्चा
ओबीसींच्या न्याय मागण्यासाठी राष्ट्रीय ओबीसी महासंघाकडून आज नागपूरच्या जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला.
गेल्या काही महिन्यांपासून ओबीसी महासंघाकडून विविध प्रकारची आंदोलने केली जात आहे. गेल्या महिन्यात केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या निवासस्थानासमोर आंदोलन केल्यानंतर आता राष्ट्रीय ओबीसी महासंघ पुन्हा एकदा सक्रिय झाला आहे. पुढील वर्षी होणाऱ्या जनगननेत ओबीसी समाजात असलेल्या जातींची जातनिहाय जनगणना करावी, मराठा समाजाला ओबीसीमधून आरक्षण देऊ नये, राज्य लोकसेवा आयोगाची परीक्षा त्वरित घ्यावी, नोकरभरती सुरू करावी, या मागण्याकरीता आज नागपूर जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले.
१० नोव्हेंबरला मुंबईत ओबीसी गोलमेज परिषदेचे आयोजन
वारंवार आंदोलने करूनसुद्धा राज्य शासन ओबीसींच्या मागण्या पूर्ण करण्यासाठी प्रयत्न करत नसल्याने १० नोव्हेंबर रोजी मुंबई ओबीसी गोलमेज परिषद आयोजित करण्यात आली आहे. त्या माध्यमातून आपला आवाज बुलंद करण्याचा प्रयत्न केला जाणार असल्याचे ओबीसी नेते बबनराव तायवाडे यांनी सांगितले आहे.
हिवाळी अधिवेशनात ओबीसी करणार शक्तिप्रदर्शन
डिसेंबर महिन्यात होणाऱ्या नागपूर अधिवेशनावेळी ओबीसी समाज आपल्या न्याय मागण्यासाठी शक्तिप्रदर्शन करणार असल्याची माहिती बबनराव तायवाडे यांनी दिली.