महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

Bhagat Singh Koshyari : पदमुक्त करण्यासाठी राज्यपालांचे पंतप्रधानांना पत्र; विरोधकांच्या खोचक प्रतिक्रिया

महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी राज्यपाल पदावरून मुक्त होण्याची इच्छा व्यक्त केली आहे. त्यांनी ट्विट करत माहिती दिली की, माननीय पंतप्रधानांच्या नुकत्याच झालेल्या मुंबई भेटीदरम्यान, मी त्यांना सर्व राजकीय जबाबदाऱ्या सोडण्याची आणि माझे उर्वरित आयुष्य वाचन, लेखन आणि इतर कार्यात घालवण्याची इच्छा व्यक्त केली आहे. यावर आता राजकीय स्तरातून प्रतिक्रिया व्यक्त केल्या जात आहेत.

Bhagat Singh Koshyari Resignation Letter to PM
राज्यपालांचे पंतप्रधांनाना पदमुक्त होण्याचे पत्र

By

Published : Jan 23, 2023, 11:03 PM IST

Updated : Jan 24, 2023, 7:07 AM IST

विरोधक प्रतिक्रिया व्यक्त करताना

मुंबई : राज्यपाल पदावरून मुक्त करा, अशी विनंती भगतसिंह कोश्यारी यांची पंतप्रधान मोदी यांच्याकडे केली आहे. या संदर्भात राजभवनाने जारी केलेल्या प्रसिद्धीपत्रकातून राज्यपाल कोश्यारी यांनी ही माहिती दिली. त्यामुळे राज्यपाल राजीनामा देण्याच्या तयारी असल्याची चर्चा आहे. महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी राज्यपाल पदावरून मुक्त होण्याची इच्छा व्यक्त केली असताना यावर विरोधकांकडून तिखट स्वरूपाच्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या जात आहेत.

राज्यपालांचे ट्विट : महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी राज्यपाल पदावरून मुक्त होण्याची इच्छा व्यक्त केली आहे. त्यांनी ट्विट करत माहिती दिली की, माननीय पंतप्रधानांच्या नुकत्याच झालेल्या मुंबई भेटीदरम्यान, मी त्यांना सर्व राजकीय जबाबदाऱ्या सोडण्याची आणि माझे उर्वरित आयुष्य वाचन, लेखन आणि इतर कार्यात घालवण्याची इच्छा व्यक्त केली आहे, असे ट्विट महाराष्ट्राचे राज्यपाल भगत यांनी केले आहे.

राज्यपालांना कार्यमुक्त नको हकालपट्टी करा - अंबादास दानवे

राज्यपालांनी मागील काळापासून भाजपचा कार्यकर्ता म्हणून काम केले आहे. इतकेच नव्हे तर महापुरुषांचा अवमान आणि मराठी माणसाला कमी लेखण्याचा प्रयत्न केला. अशा माणसाला कार्यमुक्त नको त्यांची हकालपट्टी करायला हवी, अशी तिखट प्रतिक्रिया विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी दिली. रिगल टॉकीज येथे बाळासाहेबांच्या पुतळ्याला अभिवादन केल्यानंतर ते प्रसार माध्यमांशी बोलत होते.

ते पुढे म्हणाले की, खरेतर राज्यपालांना कार्यमुक्त करण्याऐवजी त्यांची हाकलपट्टी करायला हवी. राज्यपालांना वाटत असेल तर त्यांनी स्वतःहून राजीनामा द्यायला हवा, असा सल्ला दानवे यांनी दिला. तसेच राज्यपालांनी मागील काळापासून आजवर भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता म्हणून काम केले आहे. शिवाय, महापुरुषांच्या अवमान केला असून मराठी माणसाला कमी लेखले आहे. त्यामुळे त्यांना कार्यमुक्त करण्याऐवजी त्यांची थेट हाकलपट्टी करायला हवी, असे दानवे म्हणाले.



भाजपचा पत्रापत्रीचा खेळ - सुषमा अंधारे

राज्यात महत्त्वाच्या घडामोडी होत असताना भारतीय जनता पक्षाकडून जाणून बुजून अशी पत्र बाहेर काढली जातात. महत्त्वाचे मुद्दे बाजूला काढण्यासाठीच अशी पत्र लिहिली जात असल्याचा आरोप शिवसेना उपनेत्या सुषमा अंधारे यांनी केला आहे. अंधेरी पूर्व येथे असलेल्या पोटनिवडणुकीच्या वेळी देखील भारतीय जनता पक्षाला आपला पराभव स्पष्ट दिसत असतानाच मध्येच पोस्टमेंनने पत्र लिहून, भारतीय जनता पक्षाला उमेदवारी मागे घेण्याची विनंती केली. भारतीय जनता पक्षाने देखील लगेच त्या पत्राच्या नंतर आपली उमेदवारी माग घेतली होती. राज्यपाल हे महाराष्ट्राचे पालक आहेत, जेव्हा ते हस्तक म्हणून वागायला लागले त्यामुळे आता राज्यपालांची गच्छंती तर करायची आहे. मात्र हे करत असताना आपल्या पक्षाची प्रतिमा मलिन होऊ नये, यासाठीच भाजपनेच हे पत्र समोर आणला असल्याचे सुषमा अंधारे यांनी सांगितले.

राज्यपालांनी माफी मागावी - संभाजी ब्रिगेड

राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांना उशिरा का होईना? शहाणपण आले ते चांगलीच गोष्ट आहे. राजीनामा देण्याची विनंती करून पंतप्रधानांना पत्र देण्यात आले आहे. परंतु राज्यपालाने महाराष्ट्राची अगोदर माफी मागितली पाहिजे. छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान केल्यानंतर महाराष्ट्रच नाही तर तमाम भारतातली जनता भाजपविरोधात आहे. हे लक्षात आल्यानंतर राज्यपालांनी ही विनंती केली असून, त्या अगोदर राज्यपालने महाराष्ट्राची नाक घासून माफी मागितली पाहिजे तसेच त्यानंतरच त्यांचा राजीनामा मंजूर करा, अशी मागणी संभाजी ब्रिगेड प्रदेश संघटक संतोष शिंदे यांनी केली आहे.

आता त्यांच्या विनंतीचा विचार करावा - जयंत पाटील

महाविकास आघाडी सत्तेत असताना देखील राज्यपालांच्या भेटीवेळी त्यांनी "मुझे जाने का है" असे म्हणत राज्यपाल पदावरून जाण्याची इच्छा व्यक्त केली होती. आता त्यांनी लेखी विनंती केली आहे तर केंद्र सरकार लेखी निवेदनातील विनंतीचा विचार करेल, असे मत राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष मंत्री जयंत पाटील यांनी व्यक्त केले आहे. ते पुढे म्हणाले की, मधल्या काळात राज्यपालांनी जी वक्तव्ये केली ती बघता महाराष्ट्रातील राजकीय पक्षांनीही आपल्या भावना व्यक्त केल्या होत्या. आता राज्यपालांनीच इच्छा व्यक्त केली आहे यामुळे त्यांचा विचार झाला पाहिजे, असेही जयंत पाटील म्हणाले. केंद्रसरकारच्या काही प्रोसीजर बाबी असतील किंवा त्यांना नवीन राज्यपाल रिप्लेस करण्यासाठी माणूस मिळाला नसेल, असाही टोला जयंत पाटील यांनी लगावला.

राज्यपालांना उशिरा सुचलेले शहाणपण - रविकांत तुपकर

राज्यपालांच्या पदमुक्त होण्याच्या पत्रावर शेतकरी नेते रविकांत तुपकर यांनी प्रतिक्रिया दिली आहे. ते म्हणाले की, कोश्यारी स्वतःला कार्यमुक्त करीत असल्याची माहिती जर खरी असेल तर ती आनंदाची बाब आहे. आतापर्यंत अनेक राज्यपाल लाभले परंतु त्यांचे वाद किंवा राज्यात अस्थिरता निर्माण झाली नाही. कोश्यारी यांच्या अनेक वादग्रस्त वक्तव्याने जन आक्रोश निर्माण होऊन अस्थिरतेचे वातावरण निर्माण झाले. महापुरुषांबद्दल वादग्रस्त विधान अनेकांच्या जिव्हारी लागले. ते स्वतःहून कार्यमुक्त होत असेल तर कोश्यारी यांनाही उशिरा सुचलेले शहाणपण म्हणावे लागेल. राज्यपाल हे पद जबाबदारीचे आहे. या जबाबदारीच्या पदावर जबाबदारीने वागावे लागते. राज्यपालांनी कमी बोलायचे असते आणि जास्त काम करायचे असते. राज्यपाल पदाची गरिमा सांभाळता यायला हवी. येणाऱ्या माणसाने ती सांभाळावी, अशी अपेक्षाही रविकांत तुपकर यांनी यावेळी व्यक्त केली.

राज्यपालांची हकालपट्टी व्हायला पाहिजे - नाना पटोले

राजभवनाने जारी केलेल्या प्रसिद्धीपत्रकातून राज्यपाल कोश्यारी यांनी पदमुक्त होण्याची माहिती दिली. यावर काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी आपले मत व्यक्त केले आहे. ते म्हणाले की, राज्यपाल यांनी पंतप्रधान यांना पत्र लिहिले आहे काँग्रेसचा पहिल्यापासूनच आक्षेप होता की राज्यपाल हे राष्ट्रपतींच्या अधिपत्त्यामध्ये येतात. पण आपण पाहिले तर राज्यातील राज्यपाल भवन हे भाजप भवन झालेला आहे आणि ही भूमिका आम्ही सातत्याने मांडत होतो. सर्व महापुरुषांबाबत राज्यपाल महोदय यांनी केलेले वक्तव्य पाहता राज्यपाल हटाव अशी मागणी काँग्रेसने केली होती. आमची राष्ट्रपती महोदय यांना मागणी आहे की त्यांना स्वइच्छेने जाऊ देऊ नका तर त्यांची हकालपट्टीच व्हायला पाहिजे, असे यावेळी पटोले यांनी सांगितले.

हेही वाचा : Governor Koshyari Offers to Resign : राज्यपालांनी पदमुक्त होण्यासाठी पंतप्रधानांकडेच का केली विनंती?

Last Updated : Jan 24, 2023, 7:07 AM IST

ABOUT THE AUTHOR

...view details