मुंबईMaratha Reservation :मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून संपूर्ण महाराष्ट्रात रान पेटवणाऱ्या मनोज जरंगे यांनी शिंदे फडणवीस सरकारला दिलेला अल्टिमेटम चार-पाच दिवसांत संपत आहे. यामुळं सरकार काय निर्णय घेणार याकडं राजकीय पक्षांसह ओबीसी समाजाचं लक्ष लागलं आहे. सरकारनं EWS मधून मराठा समाजाला मिळणाऱ्या लाभांची आकडेवारी जाहीर केलीय. त्यातून सर्वात जास्त फायदा मराठा समाजाला झाल्याचा दावा सरकरानं केलाय. मात्र, यावर मराठा समाजाला कोणताही फायदा झाला नसल्याचा दावा मनोज जरंगे पाटील यांनी ईटीव्हीशी बोलताना केला.
मराठा समाजाला सर्वात जास्त फायदा :मराठा आरक्षणासाठी महाराष्ट्र शासनानं मंत्रिमंडळ उपसमिती स्थापन केली आहे. उच्च-तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील हे या समितीचे अध्यक्ष असून त्यांच्या उपस्थितीत मंत्रालयात नियमित बैठक झाली. यावेळी गिरीश महाजन, आमदार प्रवीण दरेकर अण्णासाहेब पाटील महामंडळाचे अध्यक्ष नरेंद्र पाटील यांची उपस्थिती होती. या बैठकीत आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील लाभार्थ्यांना स्थान देण्यात आलं. सरकारनं जाहिर केलेल्या आकडेवारीनुसार, EWS म्हणजेच आर्थिकदृष्ट्या मागास वर्गाला लागू करण्यात आलेल्या आरक्षणाचा सर्वाधिक फायदा मराठा समाजाला झाल्याचं उघड झालं आहे. मराठा समाजाने शिक्षणात 75 टक्के तर, नोकरीत 85 टक्क्यांहून अधिक प्रगती केल्याची दावा सरकारनं केलाय. EWS चा सर्वाधिक फायदा मराठा समाजाला झाल्याचं मंत्री चंद्रकांत पाटील यांनी म्हटलं आहे.