महाराष्ट्र

maharashtra

तिसऱ्या लाटेचा फटका 60 लाख जणांना बसणार, आरोग्य मंत्र्यांनी व्यक्त केली भीती

By

Published : Aug 26, 2021, 8:48 PM IST

कोरोनाची दुसरी लाट ओसरत असतानाच आता तिसऱ्या लाटेचा धोका वर्तवला जातो आहे. पहिल्या लाटेत 20 लाख, दुसऱ्या लाटेत 40 लाख लोक बाधित झाली होती. तिसऱ्या लाटेत हा आकडा 60 लाखांच्या आसपास जाऊ शकतो, अशी भीती आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी व्यक्त केली.

c
मंत्री राजेश टोपे

मुंबई- कोरोनाची दुसरी लाट ओसरत असतानाच आता तिसऱ्या लाटेचा धोका वर्तवला जातो आहे. पहिल्या लाटेत 20 लाख, दुसऱ्या लाटेत 40 लाख लोक बाधित झाली होती. तिसऱ्या लाटेत हा आकडा 60 लाखांच्या आसपास जाऊ शकतो, अशी भीती आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी व्यक्त केली. राज्य मंत्रिमंडळाची बैठक संपल्यानंतर ते प्रसार माध्यमांशी बोलत होते. हा अंदाजित आकडा असल्याचे त्यांनी यावेळी स्पष्ट केले.

गुरुवारी (दि. 26 ऑगस्ट) राज्य मंत्रिमंडळाची बैठक पार पडली. या बैठकीत तिसऱ्या लाटेच्या पार्श्वभूमीवर चर्चा करण्यात आली. कोरोनाच्या तिसऱ्या लाटेसंदर्भात काही महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले. राज्य सरकार तिसऱ्या लाटेचा सामना करण्यासाठी सज्ज आहे. त्यानुसार ऑक्सिजनची गरज लक्षात घेण्यात घेतली आहे. दुसऱ्या लाटेत साडेसहा लाख अॅक्टिव्ह रुग्ण होते. 12 टक्के लोकांना यावेळी ऑक्सिजनची गरज भासली. तर तिसऱ्या लाटेत 13 लाख अॅक्टिव्ह रुग्ण असू शकतात, असा अंदाज लावण्यात आला असून राज्य सरकारने तशी तयारी केल्याचे आरोग्यमंत्री टोपे म्हणाले.

डॉक्टरांच्या रिक्त जागा भरणार

कोरोनाचा प्रादुर्भाव वाढल्यानंतर डॉक्टर, नर्स आणि वैद्यकीय कर्मचाऱ्यांची कमतरता भासली. दुसऱ्या लाटेचा सामना करताना मनुष्यबळाअभावी अनेक समस्यांचा सामना करावा लागला. या पार्श्वभूमीवर तिसऱ्या लाटेचा धोका लक्षात घेऊन, 5 सप्टेंबरपर्यंत बाराशे डॉक्टरांचे समुपदेशन करून त्यांची भरती केली आहे. राज्यात बाराशे ते तेराशे मेट्रिक टन ऑक्सिजनची उपलब्धता असायची ती आता 2 हजारपर्यंत वाढवली आहे. जुलै महिन्यांच्या अधिवेशनात कोरोनाच्या तिसऱ्यालाटेच्या संदर्भात आर्थिक तरतूद केली आहे. त्यानुसार औषधे, आवश्यक साधने, बेड्स, रुग्णवाहिका खरेदी केल्या आहेत. एक हजार रुग्णवाहिकांपैकी 500 दाखल झाल्या असून उर्वरीत सप्टेंबर महिन्याच्या अखेरीस प्राथमिक आरोग्यापर्यंत उपलब्ध होतील, असे आरोग्य मंत्री टोपे यांनी सांगितले. तसेच एशियन डेव्हलपमेंट बँकेच्या माध्यमातून 5 हजार कोटींचा प्रस्ताव पाठवण्यात आला आहे. ज्यात ग्रामीण रुग्णालय तसेच अपग्रेडशनच्या बांधकामांसाठी लागणाऱ्या निधीसाठी कर्ज काढण्यास आले आहे. त्यासंबंधीचा पाठपुरवठा सुरू असल्याचे आरोग्य मंत्री टोपे यांनी स्पष्ट केले.

सप्टेंबर महिन्यात 1 कोटी 70 लाख लस

राज्यातील लोकसंख्येच्या तुलनेत मिळणाऱ्या कोविड लसींचे डोस अपुरे आहेत. आता तिसऱ्या लाट येण्याची शक्यता आहे. त्यापूर्वी लसीकरण होणे गरजेचे आहे. राज्य शासनाने केंद्र शासनाकडे सातत्याने यासंदर्भात पाठपुरवठा केला असून सप्टेंबर महिन्यात 1 कोटी 70 लाख कोरोना विरोधी लसींचे डोस देण्यास मान्यता दिल्याचे टोपे याबी सांगितले.

केरळमध्ये बाधितांची नोंद कमी

प्रत्येक राज्याचा सिरो सर्वेक्षणमध्ये अभ्यास करण्यात येतो. त्यानुसार, केरळ राज्यात कोरोना बाधितांची संख्या सर्वात कमी आढळून आली आहे. केरळमध्ये 42 टक्के लोक कोरोनाग्रस्त झाले होते. तर महाराष्ट्रात 55 टक्के बाधितांची नोंद झाली आहे. मध्यप्रेदशात सर्वाधिक 89 टक्के लोकांना कोरोनाची लागण झाल्याचे त्यात नमूद असल्याचे टोपे म्हणाले.

आश्रमातील बाधित मुलांवर योग्य उपचार

मुंबई सेंट्रल, आग्रीपाडा येथील ‘सेंट जोसेफ बोर्डिंग स्कूल’ या अनाथाश्रम शाळेतील 15 लहान मुलांना व 7 कर्मचाऱ्यांना, असे एकूण 22 जणांना कोरोनाची लागण झाल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. आश्रमातील बाधित मुलांवर योग्य उपचार केले जातील, असेही राजेश टोपे यांनी म्हणाले. तसेच पहिल्या आणि दुसऱ्या लाटेतील मुलांची आकडेवारी ही 8-10 टक्के आहे आणि मृत्यूचे प्रमाणे फार नगण्य आहे. त्यामुळे घाबरण्याचे कारण नसल्याचेही ते म्हणाले.

आशा वर्करच्या पगारात वाढ

राज्यातील 71 हजार आशा वर्करच्या पगारात यावर्षी पंधराशे रुपये वाढ करुन देण्याचा निर्णय आज मंत्रीमंडळ बैठकीत घेण्यात आला. तर 3 हजार 600 गटप्रवर्तकांना सतराशे रुपये वाढवून देण्यात येणार, असे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी सांगितले.

निवडणुका घेण्याचे अधिकार आयोगाला

गर्दीमुळे कोरोनाचा प्रादुर्भाव वाढू शकतो. आगामी स्वराज्य संस्थांच्या निवडणुका येऊ घातल्या आहेत. कोविडचा विचार करता, निवडणूक घ्यायच्या की नाहीत याबाबत निर्णय घेण्याचे सर्वाधिकार निवडणूक आयोगाला आहेत. त्यानुसार निवडणूक आयोग, राज्य सरकार आणि टास्क फोर्स यांच्यात बैठक होऊन चर्चा केली जाईल. त्यांनतर निवडणुकाचा निर्णय घेण्यात येईल, असे आरोग्य मंत्री टोपे यांनी सांगितले.

हेही वाचा -महापुरात नुकसान झालेल्या चिपळूणच्या ग्रंथालयाला पुस्तकांची मदत रवाना

ABOUT THE AUTHOR

...view details