महाराष्ट्र

maharashtra

Barsu Refinery Project Controversy : बारसू रिफायनरी प्रकल्पाला विरोध करण्याची सुपारी कुणाकडून? देवेंद्र फडणवीसांचा विरोधकांना सवाल

By

Published : Apr 25, 2023, 6:50 PM IST

आधी आरेला विरोध केला, मग समृद्धी महामार्गाला, मध्येच कोणत्या पोर्टला, आता रिफायनरीला विरोध करीत आहेत. शांततापूर्ण आंदोलकांशी आम्ही चर्चा करू, मात्र, केवळ राजकारणासाठी विरोध करणार्‍यांना खपवून घेणार नाही, असे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज सांगितले. बारसू रिफायनरी प्रकल्पाला विरोध करण्याची सुपारी कुणाकडून देण्यात आली असा सवाल देखील फडणवीस यांनी विचारला आहे.

Barsu Refinery Project Controversy
Barsu Refinery Project Controversy

मुंबई :कर्नाटक विधानसभा निवडणुकीच्या प्रचारासाठी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस कर्नाटकच्या दौऱ्यावर आहेत. या प्रसंगी माध्यमांनी विचारलेल्या प्रश्नांना ते उत्तरे देत होते. फडणवीस म्हणाले की, केंद्र सरकारच्या तीन कंपन्या एकत्र येऊन ही रिफायनरी करीत आहेत. प्रारंभीपासून त्यांनी रिफायनरीला विरोध केला. मग सत्तेत आले आणि ही रिफायनरी बारसूला करायचे, हे त्यांनीच ठरविले, तसे पत्र पंतप्रधानांना पाठविले. आता काम सुरु झाले, तर पुन्हा विरोध. विरोधकांचा आम्ही सन्मान करतो. त्यांच्याशी चर्चा करायला आणि त्यांचे गैरसमज दूर करायला आम्ही तयार आहोत. पण, राजकारणासाठी जे विरोध करीत आहेत, त्यांना आम्ही सहन करणार नाही. अशीच रिफायनरी जामनगरमध्ये आहे, तेथील आंबे निर्यात होतात. त्यामुळे कोणतेही नुकसान रिफायनरीमुळे होत नाही, हे सिद्ध झाले आहे.

कुणाची सुपारी घेऊन विरोध करता? :ही एक ग्रीन रिफायनरी आहे. त्यामुळे पर्यावरणाची कोणतीही हानी होणार नाही. पण, खोटे बोलून विरोधक आणखी किती मोठे नुकसान महाराष्ट्राचे करणार आहेत? एक झाड सुद्धा त्या जागेवर नाही. कातळशिल्पाची जागा सोडून देऊ, हेही आम्ही सांगितले. काही विरोध करणारे राजकारणासाठी तर, काही बाहेरच्यांना सोबत घेऊन विरोध करणारे आहेत. मग आम्हाला हा प्रश्न विचारावा लागेल की, तुम्ही कुणाची सुपारी घेऊन विरोध करता, असेही देवेंद्र फडणवीस म्हणाले.

कर्नाटकात प्रचार :पुढे देवेंद्र फडणवीस म्हणाले की, कर्नाटकात भाजपाच निवडून येणार. लोकांचे प्रचंड समर्थन भाजपाला मिळते आहे. स्पष्ट जनादेश न दिल्याने कर्नाटकात झालेली सर्कस तुम्ही अनुभवली. तुमच्या आशिर्वादाने पुन्हा सरकार तयार झाले आणि वेगाने कर्नाटक विकासाकडे धावायला लागला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्त्वात भारत ही आज जगातील पाचव्या क्रमांकांची अर्थव्यवस्था बनली आहे. २०३० पर्यंत भारत ही जगातील तिसर्‍या क्रमांकाची अर्थव्यवस्था बनेल. ग्रामीण भारतात अनेक कामे झाली. शौचालयांचे निर्माण, घरांघरात वीज, पाणी, उज्वला सिलेंडर आदी योजना राबविल्या गेल्या. गरिब कल्याणाचा एक मोठा कार्यक्रम राबविला गेला, असेही उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कर्नाटकात इंडी येथे प्रचार सभेत बोलताना सांगितले. केंद्रीय मंत्री भागवत कराड, खा. जयसिद्धेश्वर स्वामी, खा. संजयकाका पाटील आणि इतरही स्थानिक नेते या जाहीर सभेला उपस्थित होते.

हेही वाचा - Barsu Refinery Project : बारसू रिफायनरीबाबत शरद पवार आणि उदय सामंत यांच्यात फोनवर चर्चा

ABOUT THE AUTHOR

...view details