मुंबई : तब्बल 38 हजार कोटींच्या विविध कामांच्या भूमिपूजन, लोकार्पण सोहळ्यासाठी मुंबईत आलेले पंतप्रधान नरेंद्र मोदीच्या सभेला गर्दी जमवण्यासाठी बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या अतिक्रमण विरोधी पथकाच्या गाड्यांमध्ये भरून फेरीवाल्यांना नेलं जात असल्याची घटना कुर्ल्यात घडली आहे. मुंबईत सुमारे 38 हजार 800 कोटी रुपयांच्या प्रकल्पांचे लोकार्पण, भूमिपूजन समारंभात पंतप्रधान नरेंद्र मोदी सहभागी झाले होते. यावेळी राज्यपाल भगतसिंग कोश्यारी, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आदी नेते उपस्थित होते.
सभेला कुर्ल्यातील फेरीवाले - पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची सभा मुंबईतील बांद्रा कुर्ला कॉम्प्लेक्स येथे घेण्यात आली. ज्या मैदानावर पंतप्रधानांची सभा घेण्यात आली त्या मैदानाची क्षमता साधारण एक लाख लोक जमू शकतील इतकी आहे. ह्या मैदानावर गर्दी जमवण्यासाठी शिंदे फडणवीस सरकारकडून ठिकठिकाणी बसेस मधून कार्यकर्ते आणण्यात आले. मात्र, या सभेला आता कुर्ल्यातील काही फेरीवाल्यांना सुद्धा बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या अतिक्रमण विभागाच्या गाड्यांमधून भरून सभास्थळी नेल्याची घटना समोर आली आहे. हे फेरीवाले कुर्ला पश्चिम येथील काजूपाडा पाईपलाईन जवळील असल्याची माहिती मिळते.