महाराष्ट्र

maharashtra

टीआरपी घोटाळा : आरोपींना मंगळवारपर्यंत पोलीस कोठडी

By

Published : Oct 9, 2020, 7:28 PM IST

टीआरपी घोटाळ्यात अटक करण्यात आलेल्या आरोपींना मंगळवार, 13 ऑक्टोबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. मुंबईतील किल्ला न्यायालयात यासंदर्भात सुनावणी झाली.

trp scam case
टीआरपी घोटाळा प्रकरण

मुंबई - टीव्ही वाहिन्यांच्या टीआरपी (टेलिव्हिजन रेटिंग पॉईंट) घोटाळ्यासंदर्भात मुंबई पोलिसांनी कारवाई करत चार आरोपींना अटक केली आहे. या आरोपींना मुंबईतील किल्ला न्यायालयाने 13 ऑक्टोबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.

मुंबई पोलिसांनी टीआरपी घोटाळ्यासंदर्भात विशाल भंडारी (20), शिरीष शेट्टी (44), नारायण शर्मा (47), आणि बोंपेली राव मिस्त्री अशा चार आरोपींना अटक केली होती. या आरोपींच्या पोलीस चौकशीमध्ये बऱ्याच गोष्टी समोर येणार आहेत. जवळपास 32 हजार कोटी रुपयांची वार्षिक उलाढाल असलेल्या भारतातील वाहिन्यांच्या टीआरपी घोटाळ्या यासंदर्भात आणखी मोठे खुलासे व्हायचे असल्याचे मुंबई पोलिसांकडून न्यायालयात सांगण्यात आले. त्यानुसार न्यायालयाने या चार आरोपींना 13 ऑक्टोबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.

विशाल भंडारी हा आरोपी हंसा रिसर्च ग्रुपमध्ये रिलेशनशिप मॅनेजर म्हणून काम करतो. मुंबई पोलिसांनी त्याची चौकशी केली असता त्याने मुंबईतील कांदिवली परिसरामध्ये पाच व्यक्तींच्या घरांमध्ये बॅरोमीटर लावलेले होते. हे बॅरोमीटर लावत असताना त्याने एका विशिष्ट वाहिनीला दिवसभरातून तब्बल दोन तास तरी चालू ठेवावे, अशी अट घातली होती. यासाठी विशाल भंडारी संबंधित लोकांना दर महिन्याला 400 रुपये देत होता.

भंडारीने अशाच एका व्यक्तीला त्याच्या घरामध्ये बॅरोमीटर लावून बॉक्स सिनेमा नावाचे चॅनेल हे दिवसभरातून तब्बल दोन तास तरी चालू ठेवावे, अशी अट घालून महिन्याला 400 रुपये देण्याचे कबूल केले होते. गेले पाच-सहा महिने भंडारी या संबंधित व्यक्तीला दरमहा 400 रुपये देत होता. या व्यक्तीशी 'ईटीव्ही भारत'च्या प्रतिनिधींनी फोनवर संपर्क साधून या संदर्भात विचारणा केली. त्यावेळी संबंधित व्यक्तीने बॉक्स सिनेमा हे चॅनल पाहण्यासाठी महिन्याला 400 रुपये विशाल भंडारीकडून मिळत असल्याचे कबूल केले.

हंसा रिसर्च ग्रुपकडून यासंदर्भात या अगोदरही चौकशी करण्यात येत होती. त्यावेळेस विशाल भंडारी यास हंसा ग्रुपच्या ऑडिट टीमनेही याबद्दल विचारले असता, त्याने ही गोष्ट कबूल केली होती. त्यानंतर त्यास कामावरून काढून टाकण्यात आल्याचे ग्रुपकडून स्पष्ट करण्यात आले आहे. संबंधित व्यक्तीच्या विरोधात पोलिसांकडे तक्रार दाखल करण्यात आल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details