कोल्हापूर- राज्यातील महाविकास आघाडी सरकारने सत्ताधारी आणि विरोधी पक्षातील अनेक नेत्यांच्या सुरक्षेत कपात केली. यामध्ये भाजपमधील अनेक नेत्यांचा समावेश आहे. खासदार नारायण राणे आणि भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांची देखील सुरक्षा कमी करण्याचा निर्णय ठाकरे सरकारने घेतला होता. मात्र आता थेट केंद्र सरकारकडून त्यांना सुरक्षा मिळणार आहे. त्यावरून शरद पवारांनी नाव न घेता केंद्र सरकार आणि ज्यांना केंद्राची सुरक्षा मिळणार आहे, त्यांच्यावर टीकात्मक निशाणा साधला आहे.
'ज्यांना केंद्राची सुरक्षा मिळाली, त्यांना चांगली झोप लागत असेल' आता त्यांना चांगली झोप तरी लागत असेल-
पवार म्हणालेकी, कायदा आणि सुव्यवस्था राज्याचा विषय आहे. त्यात केंद्र सरकार हस्तक्षेप करत नाही. मात्र, इथे केंद्र सरकार हस्तक्षेप करत आहे, हे आश्चर्यकारक असल्याची प्रतिक्रिया राष्ट्रवादीचे अध्यक्ष खासदार शरद पवार यांनी दिली आहे. तसेच केंद्राने ज्यांना सुरक्षा पोहोचवली आहे, त्यांनी केंद्राकडे सुरक्षा मिळावी म्हणून मागणी केली असेल. त्यामुळे किमान त्यांना आता चांगली झोप तरी लागत असेल, असा खोचक टोलाही शरद पवार यांनी कोणाचे नाव न घेता लगावला आहे. तसेच आज पर्यंतच्या इतिहासात केंद्राने कधीही राज्यातील नेत्याला सुरक्षा पोहोचवली नसल्याचेही पवारांनी यावेळी नमूद केले. कोल्हापूर येथे आयोजित पत्रकार परिषदे मध्ये ते बोलत होते.
राज्यपालांच्या कार्यावर नाराजी-
राज्यपाल नियुक्त आमदार संदर्भात बोलताना शरद पवार म्हणाले, मुख्यमंत्र्यांना एकदा प्रस्ताव दिला की, त्यानंतर राज्यपाल यांनी कधीही हा प्रस्ताव फेटाळला नाही. इथं मात्र दुसरंच काहीतरी दिसत आहे, असे सांगत अप्रत्यक्षरित्या राज्यपाल यांच्या कार्यपध्दतीवरही पवारांनी नाराजी व्यक्त केली.
यशवंतराव चव्हाण यांच्या प्रतिकात्मक पुतळ्याचे अनावरण -
कोल्हापूर जिल्हा परिषदेच्या प्रांगणात माजी मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांच्या पुतळ्याचे राष्ट्रवादीचे नेते खासदार शरद पवार यांच्या हस्ते अनावरण झाले. शिवाय जिल्हा परिषदेच्या चौथ्या मजल्याचे आणि 39 रुग्णवाहिकेंचे सुद्धा त्यांच्या हस्ते आज अनावरण झाले.