महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

अखेर गडचिरोलीतील 520 पोलीस कर्मचाऱ्यांच्या जिल्हास्तरीय बदल्या; मात्र पोलीस निरीक्षक, उपनिरीक्षक 'वेटींग'वर

राज्यामध्ये पोलीस विभागासाठी सर्वाधिक धोकादायक सेवा म्हणून नक्षलग्रस्त गडचिरोली जिल्ह्यातील सेवेकडे पाहिले जाते. मात्र, या जिल्ह्यात सेवा देऊन कार्यकाळ पूर्ण केल्यानंतरही ऐच्छिक बदलीसाठी प्रतीक्षा करावी लागत असल्याने येथे कार्यरत अनेक पोलीस अधिकाऱ्यांची मानसिकता ढासळली आहे.

पोलीस निरीक्षक, उपनिरीक्षक 'वेटींग'वर
पोलीस निरीक्षक, उपनिरीक्षक 'वेटींग'वर

By

Published : Oct 8, 2020, 4:26 PM IST

गडचिरोली - गेल्या काही महिन्यांपासून बदलीच्या प्रतीक्षेत असलेल्या गडचिरोलीतील 520 पोलीस कर्मचाऱ्यांच्या बदल्यांची यादी सोमवारी जाहीर झाली. त्यामुळे कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे.

अखेर गडचिरोलीतील 520 पोलीस कर्मचाऱ्यांच्या जिल्हास्तरीय बदल्या

दरम्यान, अतिरिक्त पोलीस अधीक्षक (अभियान) म्हणून कार्यरत असलेले अजय कुमार बन्सल यांची पदोन्नतीने सातारा जिल्हा पोलीस अधीक्षक म्हणून मंगळवारी शासनाने बदली केली. यापूर्वी अतिरिक्त पोलीस अधीक्षक (प्रशासन) मोहीत गर्ग यांची रत्नागिरीचे पोलीस अधीक्षक म्हणून बदली केली. असे असले तरी पोलीस निरीक्षक, उपनिरीक्षक संवर्गातील बदल्यांचा मुहूर्त अद्यापही निघालेला नसल्याने या अधिकाऱ्यांमध्ये निराशा पसरली आहे.

पोलीस कर्मचाऱ्यांच्या जिल्हास्तरीय बदल्यांची यादी

कोरोना संकटामुळे यावर्षी पोलिसांच्या बदल्या तब्बल पाच महिने रखडल्या. सध्या राज्यातील वरिष्ठ आयपीएस अधिकाऱ्यांच्या बदल्या होत असल्या तरी पोलीस निरीक्षक, उपनिरीक्षक संवर्गातील बदल्यांचा मुहूर्त अद्यापही निघालेला नाही. जिल्ह्यात कार्यरत अनेक अधिकाऱ्यांचा कार्यकाळ मे महिन्यात पूर्ण झाला. त्यानंतर 31 जुलैपर्यंत बदली होईल, असे सांगण्यात आले होते. मात्र तसे झाले नाही. त्यानंतर 5 ऑगस्ट, 10 ऑगस्ट, 5 सप्टेंबर, 30 सप्टेंबर आणि आता 15 ऑक्टोबरला बदल्यांची यादी जाहीर करण्यात येईल, असे सांगितले जात आहे. त्यामुळे नक्षलग्रस्त गडचिरोली जिल्ह्यात सेवा देऊन कार्यकाळ पूर्ण केल्यानंतरही ऐच्छिक बदलीसाठी प्रतीक्षा करावी लागत असल्याने येथे कार्यरत अनेक पोलीस अधिकाऱ्यांची मानसिकता ढासळली आहे.

राज्यामध्ये पोलीस विभागासाठी सर्वाधिक धोकादायक सेवा म्हणून नक्षलग्रस्त गडचिरोली जिल्ह्यातील सेवेकडे पाहिले जाते. कोणत्याही परिस्थितीसाठी सदैव तत्पर रहावं लागणाऱ्या येथील पोलीस अधिकाऱ्यांना दोन वर्षांचा खडतर काळ पूर्ण केल्यानंतर ऐच्छिक ठिकाणी बदली मिळवण्याची तरतूद राज्य शासनाने केली आहे. मात्र, सद्यस्थितीत ऐच्छिक ठिकाण तर दूरच, कुठेही करा, पण बदली करा अशी 'मूक आर्जव' करण्याची वेळ येथे कार्यरत पोलीस अधिकाऱ्यांवर आली आहे.

हेही वाचा -केंद्रीय सुरक्षा सल्लागार, सीआरपीएफच्या महासंचालकांनी घेतला गडचिरोलीतील नक्षलस्थितीचा आढावा

ABOUT THE AUTHOR

...view details