धुळे-केंद्र सरकारचे धोरण भांडवलदार धार्जीणे असून शेतकरी आणि गरिबांच्या विरोधात आहे. कांदा कोरडवाहू शेतकऱ्यांचे नगदी पीक आहे. कांद्याला भाव मिळाला तर त्यांच्या घरात पैसे येतात. महाराष्ट्र सरकारचा सूड उगवण्यासाठी कांद्यावर निर्यातबंदी आणण्याचा निर्णय घेण्यात आला, ही पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमित शाह यांची खेळी असल्याचा आरोप राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष आणि माजी आमदार अनिल गोटे यांनी केला. कांदा निर्यात बंदी विरोधात राष्ट्रवादीच्या वतीने धुळे कृषी उत्पन्न बाजार समिती बंद करत आंदोलन करण्यात आले.
केंद्र सरकारने कांदा निर्यातीवर बंदी घातल्याने शेतकऱ्यांना विविध अडचणींचा सामना करावा लागत आहे. एकीकडे कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणावर नुकसान सहन करावे लागत असताना दुसरीकडे केंद्र शासनाने कांदा निर्यातीवर बंदी घातल्याने अधिकचे नुकसान सहन करावे लागणार आहे, असे अनिल गोटे यांनी म्हटले.