अकोला - 'राज्यकर्त्यांनी नेहमीच ओबीसी प्रवर्गातील मतदारांचा वापर मतदानापुरता केला आहे. त्यामुळेच ओबीसींचे राजकीय आरक्षण धोक्यात आले आहे. शिवाय शैक्षणिक आरक्षणही सुपात आहे', असे वंचित बहुजन आघाडीच्या प्रभारी प्रदेशाध्यक्षा रेखा ठाकूर यांनी शनिवारी (17 जुलै) म्हटले आहे.
प्रकाश आंबेडकरांची सर्जरी, रेखा ठाकूर वंचितच्या प्रभारी
वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष ॲड. प्रकाश आंबेडकर यांच्यावर मुंबई येथील खासगी रुग्णालयात बायपास सर्जरी करण्यात आली. त्यापूर्वी आंबेडकर यांनी वंचितच्या प्रदेशाध्यक्ष पदाची जबाबदारी रेखाताई ठाकूर यांच्याकडे सोपवली होती. त्यामुळे वंचितच्या प्रभारी प्रदेशाध्यक्ष रेखा यांनी त्यांच्या विदर्भ दौऱ्याला शनिवारपासून अकोला येथून सुरुवात केली. यानिमित्ताने अकोल्यात आयोजित पत्रकार परिषदेत रेखा ठाकूर बोलत होत्या.
ओबीसीचे शैक्षणिक आरक्षणही धोक्यात?
ओबीसी प्रवर्गाचे राजकीय आरक्षण आता सत्तेत असलेल्या राजकीय पक्षांसह यापूर्वी सत्तेत असलेल्या राजकीय पक्षांमुळेच धोक्यात आल्याचा आरोप त्यांनी केला. शिवाय, 'वेळीच ओबीसी प्रवर्गातील मतदार जागृत न झाल्यास त्यांचे शैक्षणिक आरक्षणही संपुष्ठात येऊ शकते', असेही त्या यावेळी म्हणाल्या.