नवी दिल्ली : भारतीय टेनिस स्टार सानिया मिर्झाच्या कारकीर्दीचा अंत पराभवाने झाला. ऑस्ट्रेलियन ओपनच्या मिश्र दुहेरीच्या अंतिम फेरीतील तिच्या पराभवाने सानियाचे चाहते निराश झाले आहेत. ही निराशा केवळ सानियाच्या चाहत्यांपुरतीच मर्यादित नाही, तर तिचा पती पाकिस्तानी क्रिकेटर शोएब मलिकही यामुळे दु:खी आहे. शोएबने केलेल्या भावनिक पोस्टमध्ये त्याची व्यथा स्पष्टपणे दिसून येते. सानिया-बोपण्णा जोडीला अंतिम सामन्यात लुईसा स्टेफनी-राफेल माटोस या ब्राझीलच्या जोडीकडून 6-7, 2-6 असा पराभव पत्करावा लागला होता.
शोएब मलिकची पोस्ट : या स्पर्धेपूर्वीच सानिया मिर्झाने हा सामना आपला शेवटचा ग्रँडस्लॅम असल्याचे जाहीर केले होते. निवृत्तीपूर्वी सानिया यूएईमध्ये आणखी दोन स्पर्धा खेळणार आहे. प्रथम सानिया अबुधाबीमध्ये बेथानी मॅटेक सँड्ससोबत खेळेल. त्यानंतर, दुबई येथे होणाऱ्या WTA 1000 स्पर्धेद्वारे फेब्रुवारीमध्ये मॅडिसन कीजसह तिची कारकीर्द संपेल. फायनलमध्ये झालेल्या पराभवानंतर सानियाचा पती शोएब मलिकने एक भावनिक पोस्ट केली आहे. ज्यामध्ये शोएबने लिहिले आहे की, 'तु क्रीडा क्षेत्रातील सर्व महिलांसाठी आशा आहे. तुझ्या कारकिर्दीत तु जे काही मिळवले आहे त्याचा आम्हाला खूप अभिमान आहे. तु अनेकांसाठी प्रेरणा आहेस. अशीच खंबीर राहा. तुझ्या अतुलनीय कारकिर्दीसाठी खूप खूप अभिनंदन'.
सानिया मिर्झाच्या घटस्फोटाच्या बातम्या :सानिया मिर्झा ग्रँड स्लॅम डबल्समध्ये सहा वेळा चॅम्पियन ठरली आहे. त्यामुळेच या स्पर्धेतील पराभवाने तिच्या चाहत्यांना अधिक त्रास होत आहे. सानियाने तीन मिश्र दुहेरी आणि तीन महिला दुहेरीचे जेतेपद पटकावले आहे. ग्रँड स्लॅम 2016 मध्ये सानियाने ऑस्ट्रेलियन ओपनच्या महिला दुहेरीचे विजेतेपद पटकावले. पण सातवे ग्रँडस्लॅम जिंकण्याचे सानियाचे स्वप्न भंगले. गेल्या काही दिवसांपासून शोएब मलिक आणि सानिया मिर्झाच्या घटस्फोटाच्या बातम्या येत आहेत. पाकिस्तानी मीडियानुसार, सानिया आणि शोएब आता वेगळे झाले आहेत. ते दोघे त्यांचा मुलगा इझान मलिक याचे सहपालक आहेत. पण सध्या दोघेही एकत्र राहत नाहीत. दोन्ही खेळाडूंनी अद्याप या प्रकरणाला अधिकृत दुजोरा दिलेला नाही.
सानियाचे पुरस्कार आणि विजेतेपद :टेनिस स्टार सानियाने अनेक स्पर्धा जिंकून भारताचे नाव उंचावले आहे. टेनिसमधील उत्कृष्ट कामगिरीसाठी तिला अर्जुन पुरस्कार (2004), पद्मश्री (2006), राजीव गांधी खेलरत्न पुरस्कार (2015) आणि पद्मभूषण (2016) ने सन्मानित करण्यात आले आहे. सानिया मिर्झाने ऑस्ट्रेलियन ओपन (2016), विम्बल्डन (2015) आणि यूएस ओपन (2015) दुहेरीत जिंकली आहे. तिने मिश्र दुहेरीत तीन ग्रँडस्लॅम ऑस्ट्रेलियन ओपन (2009), फ्रेंच ओपन (2012) आणि यूएस ओपन (2014) विजेतेपदेही जिंकली आहेत.
हेही वाचा :Axar Patel Marriage : अक्षर पटेलने गुपचूप उरकले लग्न! जाणून घ्या कोण आहे त्याची लाइफ पार्टनर..