नवी दिल्ली: भारतीय स्टार फलंदाज स्मृति मंधानाला (Indian star batsman Smriti Mandhana) सर्व फॉरमॅटमध्ये शानदार कामगिरी केल्याने आयसीसीने 2021चा सर्वश्रेष्ठ महिला क्रिकेटपटू म्हणून निवड (ICC Womens Cricketer of 2021) केली आहे. तिची टक्कर इंग्लंडची टॅमी ब्यूमोंट, दक्षिण आफ्रिकाची लिजेल ली आणि आयरलंडची गॅबी लुईस सोबत होती. परंतु मंधानाने या सर्वांना मागे टाकत हा पुरस्कार आपल्या नावावर केला.
मंधानाने मागील वर्षी शानदार कामागिरी केली होती. इंग्लंड विरुद्ध कसोटी मालिकेच्या दरम्यान बऱ्याच दमदार पारी खेळ्या साकारल्या होत्या. डाव्या हाताची 25 वर्षीय फलंदाजाने 2021 मध्ये 22 आंतरराष्ट्रीय सामन्यात 38.86 च्या सरासरीने 855 धावा केल्या होत्या. परंतु 2021 मध्ये भारतीय महिला संघ काही खास कामगिरी करु शकला नव्हता. मात्र स्मृति मंधानाने आपली धडाकेबाज कामगिरी सुरु ठेवत शानदार फलंदाजी केली होती.
दक्षिण आफ्रिका विरुद्ध मायदेशातील मालिकेत भारतीय महिला संघाला (Indian Women's Team) टी-20 आणि वनडे मालिकेतील एकूण आठ सामन्यात फक्त दोन सामन्यात विजय मिळवता आला होता. तरी देखील या दोन मालिकेत मंधानाने आपल्या बॅटने महत्वपूर्ण असे योगदान दिले होते. वनडे मालिकेतील दुसऱ्या सामन्यात 158 धावांचा भारतीय संघासाठी पाठलाग करताना मंधानाने 80 धावांची महत्वपूर्ण अशी नाबाद खेळी साकारली होती.
त्यानंतर दक्षिण आफ्रीका विरुद्ध टी-20 मालिकेतील शेवटच्या सामन्यात मंधानाने 48 धावांची नाबाद खेळी केली होती. मंधानाने इंग्लंड विरुद्ध त्यांच्या घरच्या मैदानावर खेळल्या गेलेल्या एका कसोटीत पहिल्या डावात 78 धावांची खेळी केली होती. त्यानंतर भारतीय संघ एकमात्र वनडे सामना जिंकू शकला होता. ज्यामध्ये तिने 49 धावांची खेळी केली होती. त्याचबरोबर टी-20 सामन्यात देखील अर्धशतकी खेळी केली होती. ज्यामध्ये तिने 15 चेंडूत 29 धावांची वेगवान खेळी साकारली होती. परंतु तरी देखील भारतीय संघ इंग्लंड विरुद्ध दोन टी-20 सामने पराभूत झाला होता.
ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या मालिकेत देखील मंधाना शानदार फॉर्ममध्ये होती. तिने दुसऱ्या वनडे सामन्यात 86 धावांची धमाकेदार खेळी सैाकारली होती. त्याच्यानंतर डे-नाईट कसोटी सामन्यात 127 धावांची खेळी केली होती. परंतु हा सामना अनिर्णीत राहिला होता. मात्र मंधानाला या सामन्यात प्लेयर ऑफ द मैच हा पुरस्कार मिळाला होती.