नवी दिल्ली- PCB demands compensation : पाकिस्तान क्रिकेट बोर्डानं (पीसीबी) आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेला (आयसीसी) चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 च्या यजमानपदासाठी करारावर स्वाक्षरी करण्याची मागणी केलीय. तसंच भारतानं राजकीय आणि सुरक्षेच्या कारणास्तव पाकिस्तानचा दौरा न केल्यास त्याची भरपाई देण्याची मागणीही पीसीबीनं केलीय.
यजमान करारावर आयसीसीची स्वाक्षरी नाही : पीसीबीच्या एका वरिष्ठ सूत्रानं सांगितलं की, आयसीसीनं चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 स्पर्धेचं यजमानपद म्हणून पाकिस्तानची निवड केलीय. परंतु, अद्याप त्यांच्याशी यजमान करारावर स्वाक्षरी केलेली नाही. पीसीबीचे अध्यक्ष झका अश्रफ आणि मुख्य कार्यकारी अधिकारी (सीओओ) सलमान नसीर यांनी 2025 मध्ये फेब्रुवारी-मार्चमध्ये पाकिस्तानमध्ये चॅम्पियन्स ट्रॉफी आयोजित करण्याबाबत चर्चा करण्यासाठी अहमदाबादमध्ये आयसीसी कार्यकारी मंडळाची भेट घेतल्याचंही सूत्रांनी स्पष्ट केलंय.
आयसीसीनं स्पर्धेबाबत एकतर्फी निर्णय घेऊ नये : सूत्रानं सांगितलं की, 'भारतीय क्रिकेट बोर्डानं पुन्हा आपला संघ पाकिस्तानला पाठवण्यास नकार दिल्याच्या शक्यतेवर पाकिस्तानी अधिकाऱ्यांनी चर्चा केली. कोणत्याही परिस्थितीत आयसीसीनं या स्पर्धेबाबत एकतर्फी निर्णय घेऊ नये, अशी स्पष्ट भूमिका मांडली. या सूत्रानं सांगितलं की, पीसीबीच्या अधिकाऱ्यांनी आयसीसीला सांगितलं होतं, की जर भारतानं सुरक्षेच्या कारणास्तव पाकिस्तानमध्ये खेळण्यास नकार दिला तर जागतिक संस्थेनं स्वतंत्र सुरक्षा एजन्सी नियुक्त करावी. तसंच पीसीबीनं सांगितलंय की, ही एजन्सी भारताव्यतिरिक्त इतर सहभागी संघांच्या सुरक्षेच्या परिस्थितीचं मूल्यांकन करण्यासाठी पाकिस्तान सरकार आणि सुरक्षा अधिकाऱ्यांशी संपर्क साधू शकते. गेल्या दोन वर्षांत अनेक आघाडीच्या संघांनी कोणत्याही सुरक्षेशिवाय पाकिस्तानचा दौरा केल्याचं पीसीबीच्या अधिकाऱ्यांनी सांगितलंय.