मुंबई - नटरंग, टाईमपास, न्यूड, रंपाट यासारख्या सिनेमाचे दिग्दर्शक रवी जाधव यांच्याकडे दरवर्षी पर्यावरणपूरक गणेशोत्सव साजरा करण्याची परंपरा पाळली जाते. यंदा त्यांच्या गणपतीचे हे 11 वे वर्ष आहे. यंदाच्या गणेशोत्सवासाठी एक खास मूर्ती त्यांनी स्वतः तयार केली आहे.
दिग्दर्शक रवी जाधव यांच्याकडे घरीच बनवलेल्या बाप्पाच्या मूर्तीचे आगमन
दिग्दर्शक रवी जाधव यांच्याकडे दरवर्षी पर्यावरणपूरक गणेशोत्सव साजरा करण्याची परंपरा आहे. यंदाच्या गणेशोत्सवासाठी एक खास मूर्ती त्यांनी स्वतः तयार केली आहे.
रवी जाधव आणि मेघना जाधव हे दोघेही पक्के कलाकार. त्यामुळे बाप्पाची मूर्ती दरवर्षी हातानेच तयार करायची अस त्यांनी ठरवलं होतं. मात्र, त्यांच्या घरात रवी, मेघना आणि त्यांची मुलं प्रत्येकजण एक मूर्ती बनवतात. त्यातील ज्याची मूर्ती सगळ्यात छान असेल तिची दीड दिवस प्राणप्रतिष्ठा केली जाते आणि दीड दिवसांनी या चारही मूर्त्यांचं घरातील कुंडीत एकत्र विसर्जन केलं जातं. त्यानंतर याच कुंडीत एक छान झाड लावून त्याची वर्षभर घरातील सर्व मंडळी काळजी घेऊन ते वाढवतात.
गणेशोत्सवाच्या निमित्ताने आपण पुन्हा निसर्गाला काय देऊ शकतो असा विचार करून गणेशोत्सवाच हे स्वरूप ठरवलं असल्याचं रवीने 'ई टीव्ही भारत'शी बोलताना सांगितले. यंदा कोरोनाच्या पार्श्वभूमीवर गणेशोत्सव साधेपणाने आणि मोजक्या आप्तस्वकियांच्या उपस्थितीमध्ये साजरा करणार असल्याचे त्याने सांगितलं आहे. यासाठी शक्य तेवढे सगळे नियम पाळूनच हा गणेशोत्सव साजरा करावा, असे आवाहन त्याने त्याच्या चाहत्यांना देखील केलं आहे.