मुंबई - चित्रपट निर्माता आणि ख्यातमनाम दिग्दर्शक रोहित शेट्टी त्याच्या आगामी 'सिंघम अगेन' चित्रपटाद्वारे पुन्हा एकदा प्रेक्षकांना भुरळ घालण्यासाठी सज्ज झाला आहे. या चित्रपटात दीपिका पदुकोणही झळकणार आहे. यामुळे चित्रपटाबद्दलच्या अपेक्षा गगनाला भिडल्या असून यात अजय देवगण आणि दीपिका बहिण भाऊ असणार असल्याचेही समजते.
'चेन्नई एक्सप्रेस', 'सूर्यवंशी' आणि 'गोलमाल 3' सारख्या ब्लॉकबस्टर हिट चित्रपटाचा ट्रॅक रेकॉर्ड असलेल्या रोहित शेट्टीने या आधी सांगितले होते की त्याच्या आगामी 'सिंघम' चित्रपटात अजय देवगण आणि दीपिका पदुकोण मुख्य भूमिकेत असणार आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार दीपिका पदुकोणचा चित्रपटातील रोल केवळ लेडी सिंघमची भूमिका करण्यापलीकडचा असणार आहे. यात दीपिकाची अजय देवगणच्या बहिणीच्या भूमिकेतही वर्णी लागणार आहे. यात ती कॅमिओ नाही तर तिची व्यक्तिरेखा कथानकात खूप महत्त्वाची असणार आहे.
विशेष म्हणजे अजय देवगण आणि दीपिका पदुकोण यांच्या शिवाय टायगर श्रॉफ 'सिंघम अगेन'मध्ये एक छोटीशी भूमिका साकारेल. हा चित्रपट ऑगस्ट २०२४ मध्ये रुपेरी पडद्यावर प्रदर्शित होणार आहे.
दीपिका पदुकोणच्याकडे सध्या असलेल्या कामचा विचार करता ती सिद्धार्थ आनंद दिग्दर्शित आगामी चित्रपट 'फायटर'साठी सक्रियपणे शूटिंग करत आहे. या चित्रपटामध्ये हृतिक रोशन आणि अनिल कपूर यांच्याही भूमिका आहेत. हा अॅक्शन-पॅक ड्रामा जानेवारी २०२४ मध्ये रिलीज होणार आहे. याशिवाय दीपिका पदुकोण नाग अश्विन दिग्दर्शित 'कल्की २८९८ -AD' मध्ये अमिताभ बच्चन, प्रभास, कमल हासन आणि दिशा पटानी यांसारख्या प्रतिष्ठित कलाकारांसोबत काम करणार आहे. चित्रपटाचा फर्स्ट लूक सॅन डिएगो कॉमिक-कॉन येथे लॉन्च करण्यात आला होता.