बारामती हिंदू धर्मियांच्या महत्वाच्या सणांपैकी एक म्हणजेच गणेशोत्सव Ganeshotsav 2022 अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपला आहे. तब्बल दोन वर्षांनंतर गणेशोत्सव साजरा केला जाणार असल्याने सगळीकडेच आनंदाचं आणि उत्साहाचं वातावरण निर्माण झालं आहे. अष्टविनायक Ashtavinayaka Temple मंदिरांपैकी पुणे जिल्ह्यातील बारामती तालुक्यात असणाऱ्या मोरगाव स्थित मयुरेश्वर मंदिराचा Mayureshwar Temple In Morgan प्रथम मान आहे. काय आहेत मोरगावच्या मयुरेश्वर मंदिराची वैशिष्टे ते पाहू.
मयुरेश्वराचे मंदिर स्वनंदा नावानेही ओळखले जातेपुण्यापासून ५५ किलोमीटरवर असलेले हे मयुरेश्वर मंदिर कऱ्हा नदीच्या काठावर वसले आहे. मयुरेश्वर मंदिराला ४ प्रवेशद्वार आहेत. या प्रत्येक प्रवेशद्वारावर त्या त्या कालखंडातील गणपतीच्या अवताराचे चित्र आहेत. अष्टविनायकांपैकी प्रथम स्थान असणारे हे मंदिर उत्तराभिमुख आहे. या मंदिराला सुमारे ५० फूट उंचीची तटबंदी आहे. मंदिर परिसरात २ उंच अशा दीपमाळा आहेत. तसेच भाविकांनी मंदिरात प्रवेश करताच प्रथम त्यांना ६ फूट उंच असणारा दगडी उंदीर व गणपतीकडे तोंड असणाऱ्या भल्यामोठ्या बसलेल्या नंदीचे दर्शन होते. गणपती मंदिरात नंदी असणारे हे एकमेव मंदिर आहे. हे चित्र पाहता क्षणी असे वाटते की उंदीर व नंदी जणू मयुरेश्वराचे पहारेकरीच आहेत. या मंदिरातील मयुरेश्वराच्या मूर्तीची सोंड डावीकडे वळलेली असून मूर्तीच्या नाभीत व डोळ्यात हिरे जडवले आहेत. तसेच या मूर्तीवर नागाचे संरक्षण छत्र आहे. मंदिरात रिद्धी आणि सिद्धी यांच्याही मुर्त्या आहेत. हा मंदिर परिसर भूस्वनंदा या नावानेही ओळखला जातो. अष्टविनायक तीर्थयात्रेची सुरुवात या मंदिराच्या दर्शनाने केली जाते.
मयूरेश्वर मंदिराची आख्यायिकापूर्वी सिंधू नावाच्या एका असुराने पृथ्वीवर हैदोस माजवला होता. या असुराचा नाश करण्यासाठी देवतांनी गणपतीची आराधना केली. तेव्हा गणपतीने मोरावर आरुढ होऊन सिंधू असुराचा वध केला. त्यामुळे येथील गणपतीला मयुरेश्वर असे नाव पडले. या मंदिरातील मयुरेश्वराच्या मूर्ती संबंधी असेही म्हटले जाते की, ब्रह्मदेवांनी दोन वेळा या मयूरेश्वराची मूर्ती बनवली आहे. पहिली मूर्ती सिंधु असुराने तोडली होती. म्हणून पुन्हा एक मूर्ती बनवण्यात आली. सध्या या मंदिरातील मयूरेश्वराची मूर्ती खरी नसून त्या मूर्तीच्या मागे खरी मूर्ती असल्याचे मानले जाते. पहिली मूर्ती वाळू व लोखंडाचे अंश तसेच हिऱ्या पासून बनवली आहे.