मुंबई - आर्यन खान ड्रग्ज (Aryan Khan Drug Case) प्रकरणात NCB SIT ने आरोपपत्र दाखल करण्यासाठी आणखी वेळ मागितला आहे. एनसीबीच्या एसआयटीने 90 दिवसांचा वाढवी अवधी मागितला आहे. 2 एप्रिलपर्यंत एनसीबीला या प्रकरणी आरोपपत्र दाखल करायचे होते. एनसीबीच्या एसआयटीने आज मुंबईच्या सत्र न्यायालयात याबाबत अर्ज केला आहे.
आरोपपत्र दाखल करण्यासाठी लागणार वेळ :आर्यन खानला अटक केल्यानंतर एनसीबीचे तत्कालीन अधिकारी समीर वानखेडे यांच्यावर अनेक आरोप करण्यात आले होते. त्यानंतर या प्रकरणाचा तपास दिल्ली SIT ला देण्यात आला होता. दिल्ली एसआयटीने या प्रकरणाचा तपास सुरू केला. या प्रकरणात आणखी काहीवेळ आरोपपत्र दाखल करण्याकरिता आवश्यक असल्याने वेळ वाढवून देण्यात यावा अशी मागणी सत्र न्यायालयाला केली आहे. या प्रकरणात 18 आरोपींना अटक करण्यात आली होती.
एसआयटीने अनेकांचे जबाब नोंदवले :एनसीबीचे उपमहासंचालक ज्ञानेश्वर सिंह यांच्या नेतृत्वात आर्यन खान ड्रग प्रकरणाचा तपास सुरू आहे. या प्रकरणात मागील महिन्यात समीर वानखेडे यांच्यासह काही अधिकाऱ्यांचा जवाब नोंदवण्यात आला होता. तसेच या प्रकरणातील सर्व आरोपींचे जवाब देखील एसआयटी पथकाने नोंदवले आहेत. आर्यन खानला सोडवण्यासाठी पैसे मागितले असल्याचा आरोप करणारे साक्षीदार यांचादेखील एसआयटीने जबाब नोंदवला होता.
काय आहे प्रकरण? : 2 ऑक्टोबरला एनसीबीने मुंबईतील क्रुझवर सुरू असलेल्या पार्टीवर छापा मारला होता. यावेळी काही जणांकडे ड्रग्ज आढळल्याचा एनसीबीचा दावा होता. याच प्रकरणात त्यावेळी आर्यनसह 8 जणांना अटक करण्यात आली होती. पुढे तब्बल 27 दिवसानंतर आर्यन खानची 30 ऑक्टोबर रोजी आर्थर रोड कारागृहातून सुटका झाली होती. उच्च न्यायालयाने आर्यन खानला अटी व शर्तींवर जामीन मंजूर केला होता. त्यानुसार त्याला प्रत्येक शुक्रवारी मुंबईतील एनसीबी कार्यालयात हजेरी लावावी लागणार होती. आता न्यायालयाने ती अट शिथील केली आहे.