मुंबई : राज्यात स्थापन झालेल्या शिंदे-फडणवीस सरकारने सर्वात प्रथम मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेनच्या रखडलेल्या कामांना गती देण्यासाठी सर्व परवान्यांना मंजुरी दिली. तसेच, या कामांना हिरवा कंदीलही दाखवला ( Mumbai Ahmedabad Bullet Train ) आहे. यामुळे मुंबईची आर्थिक राजधानी ही ओळख हळूहळू पुसली जाणार आहे. गुजरातचा नेहमीच महाराष्ट्रावर डोळा राहिला आहे. मुंबई गुजरातला सातत्याने हवी आहे. त्यासाठी ते सर्वतोपरी प्रयत्न करीत आहेत. त्यातीलच हा एक भाग आहे. मात्र, गुजरातमध्ये बसलेल्या नेत्यांच्या प्रति आपली निष्ठा दाखवण्यासाठी महाराष्ट्राच्या अस्मितेवर घाव घालण्याचा प्रयत्न शिंदे-फडणवीस सरकार करीत आहे, असा आरोप काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले ( Congress State President Nana Patole ) यांनी केला आहे.
पूरपरिस्थितीबाबत जनतेचा आक्रोश :राज्यात गेल्या पंधरा दिवसांपासून पावसाचे थैमान सुरू असून, अनेक जिल्ह्यांमध्ये पूरपरिस्थिती निर्माण झाली आहे. राज्यातील संपूर्ण प्रशासकीय व्यवस्था कोलमडली असून, शासनाकडून मदत व्हावी यासाठी जनता आतुरतेने वाट पाहत आहे. मात्र, त्यांच्यापर्यंत कोणत्याही पद्धतीची मदत पोहोचत नाही कारण राज्यात सरकारच अस्तित्वात नाही. दोन माणसांनी चालवलेल्या सरकारमुळे अडचणी निर्माण होत असून, पालकमंत्री नसल्यामुळे जनतेला मायबाप उरलेला नाही, अशी टीकाही पटोले यांनी केली
विधानसभा अध्यक्ष आणि मुख्यमंत्र्यांची निवड अवैध पद्धतीने :राज्यात मुख्यमंत्री आणि विधानसभा अध्यक्ष यांची नियुक्तीच असंवैधानिक पद्धतीने झाली आहे. याला आमचा सातत्याने विरोध आहे. न्यायालय यासंदर्भात आपला निर्णय देईलच. मात्र, अशा पद्धतीने लोकशाहीचा गळा दाबणाऱ्या हुकूमशाहीला आमचा विरोध असून, राजकीय इतिहासात पहिल्यांदाच महाराष्ट्रातील राजकीय पेच प्रसंगासाठी न्यायालयाला मोठे बेंच नेमावे लागले. हे अत्यंत दुर्दैवी आहे महाराष्ट्रासाठी अजिबात भूषणावह नाही, अशी टीकाही त्यांनी केली आहे.