मुंबई - भाजप आमदार नितेश राणे यांना संतोष परब हल्ला प्रकरणात पोलीस शोधत आहेत. याच प्रकरणाच्या चौकशीसाठी केंद्रीय मंत्री नारायण राणे यांना कणकवली पोलिसांनी पोलीस स्टेशनला हजर राहण्यास सांगितले ( Kankavli Police Notice To Narayan Rane ) आहे. या घटनेचा समाचार घेताना, सरकारने आगीशी खेळ सुरू केला आहे व त्याचा अंजाम नक्कीच भोगावा लागेल असं भाजप नेते सुधीर मुनगंटीवार यांनी सांगितल ( Sudhir Mungantiwar On Narayan Rane Notice ) आहे. मुंबईमध्ये घेतलेल्या पत्रकार परिषदेमध्ये ते बोलत होते.
'सरकारचा आगीशी खेळ.. इसका अंजाम जरूर मिलेगा', मुनगंटीवारांचा इशारा सरकारचा अहंकारच त्यांना बुडवेल महाविकास आघाडी सरकारला ( MVA Government ) सत्तेची मस्ती आहे. सत्तेचा अहंकार आहे व हा अहंकार सरकारला बुडवेलच. पण या १३८ कोटी लोकसंख्या असलेल्या या देशात जे एकूण ७७ केंद्रीय मंत्री आहेत. ज्यामध्ये ३० कॅबिनेट मंत्री आहेत. त्यापैकी नारायण राणे एक आहेत. असे असताना पोलिसांनी याबाबतीत नारायण राणे यांच्याशी दूरध्वनीवरून संपर्क करून माहिती घेता आली असती. परंतु त्यांनी तसं न करता त्यांना नोटीस बजावली आहे. एकंदरीतच सरकारने आता आगीशी खेळ सुरू केला आहे. "जो कानून से बाहर जाके काम करने वाले है, उसको निश्चित रूप से इसका अंजाम मिलेगा," असं वक्तव्य सुधीर मुनगंटीवार यांनी केल आहे.
सरकार सूडाच्या भावनेने वागत आहे
महाविकास आघाडी सरकारने सुडाच्या भावनेने वागायचे ठरवले आहे. विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणीस ( Opposition Leader Devendra Fadnavis ) यांच्याबद्दल एका विधानसभेच्या आमदाराने करोना चे जंतू तोंडात कोंबले जातील, असे विधान केलं होतं. परंतु त्याच्यावर काही कारवाई झाली नाही. १९ जूनला शिवसेना पक्षाचा वर्धापनदिन ( Shiv Sena Anniversary ) साजरा करत असताना "जर कुणी अंगावर आले, तर शिंगावर घेऊ," असं स्वतः पक्षप्रमुख, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे ( CM Uddhav Thackeray ) यांनी सांगितलं होतं. त्यावर कोणतीही कारवाई झाली नाही. जेव्हा दुसऱ्याकडून आपण चांगल्या शब्दांची वर्तणुकीचा अपेक्षा करतो तेव्हा आपणही तसं वागलं पाहिजे. कोणीही मर्यादेच्या बाहेर जाऊ नये. शब्दांचा योग्य उपयोग करावा. प्रत्येकाला स्वतःचा सन्मान आहे. कुणाला ठेच पोहोचेल असे करू नये. पण हे खरे आहे की स्वतः उपयोग करायचा त्याचं समर्थन करायचं व दुसऱ्याने ती चूक केली तर त्याच्यावर गुन्हा दाखल करून त्याला कोठडीत टाकायची भाषा करायची हे चुकीचं आहे. हे करणे म्हणजे इंग्रजां सारखं वागणे आहे. इंग्रज गेले तरी हे सरकार इंग्रजांसारखे वागत आहे. त्यांनी असे वागायचे ठरवले असेल तर, "वक्त का इंतजार होता है!" असा टोमणाही सुधीर मुनगंटीवार यांनी लगावला आहे.
काय आहे प्रकरण
सिंधुदुर्ग जिल्हा बँक निवडणुकीदरम्यान झालेल्या मारहाणीत भाजप आमदार नितेश राणे यांचे नाव पुढे आल्याने त्यांच्यावर कारवाई केली जात आहे. या प्रकरणामध्ये बोलताना नितेश राणे कुठे आहे ते सांगायला मी मूर्ख आहे का? असं वक्तव्य केंद्रीय मंत्री व नितेश राणे यांचे पिता नारायण राणे केलं यांनी केलं होतं. या संदर्भामध्ये नारायण राणे यांना आता कणकवली पोलिसांनी पोलीस स्टेशनला ( Kankavli Police Station ) हजर राहण्यास सांगितले आहे. यामुद्यावरून राजकारण तापले आहे.