मुंबई -उत्तर प्रदेशातील लखीमपूर खेरी हिंसाचार प्रकरणी आणि केंद्र सरकारच्या शेतकऱ्यांवरील दडपशाही विरोधात ११ ऑक्टोबरला महाराष्ट्र बंदची हाक दिली आहे. अत्यावश्यक सेवा वगळता, सर्वांनी या बंदमध्ये सहभागी व्हावे, असे आवाहन राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी केले. सह्याद्री अतिथीगृहात पत्रकार परिषदेत ते बोलत होते. दरम्यान, काँग्रेस, राष्ट्रवादी, शिवसेना आणि मित्रपक्षही सहभागी होणार असल्याचे ते म्हणाले. महसूल मंत्री बाळासाहेब थोरात, नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे, कृषी मंत्री दादाजी भुसे, दुग्धमंत्री सुनील केदार यावेळी उपस्थित होते.
महाराष्ट्र मंत्रिमंडळाने उत्तर प्रदेशच्या लखीमपूर खेरी हिंसाचार घटनांमधील मृत्यू झालेल्या शेतकऱ्यांचा शोक व्यक्त करण्यासाठी एक प्रस्ताव पारित केला. मृत्यू झालेल्या शेतकऱ्यांना यावेळी मंत्रिमंडळात दोन मिनिटे उभे राहून श्रद्धांजली वाहिली, अशी माहिती ’मुख्यमंत्री सचिवालय कार्यालयाने दिली. यावर बोलताना जयंत पाटील म्हणाले की, आज मंत्रिमंडळात याप्रकरणाचा खेद व्यक्त करून श्रद्धांजली वाहली. उत्तर प्रदेशच्या लखीमपूर खेरी हिंसाचाराचे पडसाद संपूर्ण देशात पडताना दिसत आहे. याप्रकरणी सर्व विरोधी पक्षाने केंद्र आणि राज्य सरकारला घेरले आहे. भाजप क्रूरपणे शेतकरी आंदोलन चिरडत असून अजूनपर्यंत संबंधितांना अटक देखील केली नाही. याचा देखील निषेध आम्ही करणार आहोत. महाविकास आघाडीने लखीमपूर हिंसाचार विरोधात येत्या ११ ऑक्टोबरला राज्यव्यापी बंद पाळणार आहे. राज्यातील जनतेने भाजपशासित केंद्र सरकारच्या विरोधातील बंदमध्ये सहभागी व्हावे, असे आवाहन मंत्री जयंत पाटील यांनी केले.
हेही वाचा -Cruise Drug Case : अरबाज मर्चंटला ताब्यात घेणारा भाजपचा नेता; नवाब मलिकांचा गौप्यस्फोट
- महाविकास आघाडी सरकार शेतकऱ्यांच्या पाठीशी -
देशात शांततेत सुरू असलेल्या शेतकरी आंदोलनाला आता वर्ष पूर्ण होईल. भाजपकडून ते दडपण्यासाठी शेतकऱ्यांना चिरडत आहे. ही वृत्ती पाहून जनरल डायरची आठवण झाली. या सर्व घटनेचा निषेध करण्यासाठी महाविकास आघाडी सरकार नव्हे तर सर्व पक्ष एकत्र येणार आहेत, असे महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी सांगितले. लखीमपूर खेरीची घटना दुर्दैवी आहे. आजपर्यंत अशी क्रूरतेची घटना कधीही घडली नव्हती. माणुसकीला काळीमा फासणारा हा प्रकार असून या विरोधात आम्ही तिन्ही पक्ष एकत्र आलो आहोत, असे नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगत राज्यव्यापी बंदला शिवसेनेचा पाठींबा असल्याचे जाहीर केले. सातत्याने राज्यात येणाऱ्या नैसर्गिक आपत्तीमुळे शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान होत आहे. अशा परिस्थितीत ही राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शेतकऱ्यांना तात्काळ मदतीचा हात देण्याची भूमिका घेत आहेत. महाविकास आघाडी सरकार शेतकऱ्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभी आहे, असे शिंदे म्हणाले.
- महाविकास आघाडी सरकारची मुसंडी-
जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत भाजपविरोधात महाविकास आघाडी सरकार एकत्र न लढता तिन्ही पक्ष स्वतंत्र लढले. चांगला निकाल लागला, महाविकास आघाडी सरकारने मुसंडी मारली आहे. भाजपच्या विचारांना लोकांनी नाकारल्याने आजच्या निकालावरून स्पष्ट होते, असे एकनाथ शिंदे यांनी सांगितले. जयंत पाटील, बाळासाहेब थोरात यांनी ही निकालाची प्रशंसा केली.
- एनसीबीवरील विश्वासहर्ता संपतेय -
क्रूझवरील ड्रग्स पार्टीवर एनसीबीने छापा टाकून ८ जणांना ताब्यात घेतले. मात्र ही कारवाई भाजपच्या नेत्यांनी केल्याचे फोटो व्हायरल झाले. एनसीबीने स्पष्टीकरण देताना, भाजपच्या नेत्यांमुळे कारवाई करता आली असे म्हटले आहे. मात्र कारवाईचा व्हिडिओ, फोटो पाहिले तर भाजप नेते अग्रेसिव्ह असल्याचे दिसते. एनसीबी अशी काम करतेय, हा मोठा धक्का आहे. भाजपकडून बॉलिवूडला नामोहरम करण्याचा प्रयत्न असून बॉलिवूडने इतर राज्यात निघावे यासाठी हा प्रकार सुरू आहे, असे जयंत पाटील म्हणाले. या प्रकरणाची चौकशी व्हायला हवी. भाजपचे नेते कोणालाही पकडू शकत नाहीत. त्यासाठी पोलीस यंत्रणा आहे. भाजपकडून सातत्याने एनसीबीचा गैरवापर होत असून अशा कारवाईमुळे एनसीबीची विश्वासहर्ता संपत चालली आहे, असेही पाटील म्हणाले.
हेही वाचा -Cruise Drug : एनसीबीच्या कारवाईत सहभागी मनिष भानुशाली, के. पी. गोसावी नेमके कोण?